युती साकारणार कॉंग्रेसमुक्त सोलापूरचे स्वप्न 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत "उत्तर'मधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, "दक्षिण'मधून सहकारमंत्री सुभाष देशमुख व "शहर मध्य'मधून दिलीप माने यांना शिवसेना-भाजपच्या युतीतून संधी मिळाली आहे.
युती साकारणार कॉंग्रेसमुक्त सोलापूरचे स्वप्न 

सोलापूर  : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत "उत्तर'मधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख, "दक्षिण'मधून सहकारमंत्री सुभाष देशमुख व "शहर मध्य'मधून दिलीप माने यांना शिवसेना-भाजपच्या युतीतून संधी मिळाली आहे. 

यंदा दोन्ही देशमुखांसोबत शिवसेनेने माजी आमदार दिलीप माने यांच्यासारख्या सर्वसमावेशक व तगड्या उमेदवाराला मैदानात उतरविले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसमुक्त सोलापूर शहराचे स्वप्न साकार होईल, असा विश्‍वास महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. 

2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले. महेश कोठे व मोहिनी पत्की यांच्या मतविभागणीत कॉंग्रेसला प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून आमदारकीची लॉटरी लागली. हिंदुत्ववादी मतांच्या विभागणीची ती रुखरुख आजही कार्यकर्त्यांना सतावत आहे. यंदाच्या निवडणुकीत सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर युतीचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. शिवसेना व भाजप एकत्रित असल्याने युतीच्या मतांची विभागणी टाळली जाणार आहे. 

पालकमंत्री देशमुख व सहकारमंत्री देशमुख या दोघांच्या माध्यमातून शहर मध्यमधून दिलीप माने शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्‍वास व्यक्त होत आहे. 

यंदाच्या निवडणुकीत राज्यभर बंडखोरांची संख्या अधिक असून बंडखोरीचा फटका युतीच्या उमेदवाराला बसू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. युतीच्या एकत्रित प्रचाराच्या माध्यमातून राज्यभरात बंडखोरांचे आव्हान मोडीत काढण्याचा मास्टरप्लॅन शिवसेना-भाजपने आखला आहे. यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसमुक्त सोलापूरसाठी महायुतीचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. 

विखुरलेली शिवसेना एकवटली 

सोलापूर शहरात शिवसेनेची ताकद मोठी आहे. 2004 मध्ये शिवशरण पाटील यांच्यानंतर सोलापुरातून शिवसेनेचा आमदार कधीही विजयी झाला नाही. तब्बल 15 वर्षांतून शहर मध्यमधून दिलीप माने यांच्या माध्यमातून शिवसेनेचा आमदार विधानसभेत पाठविण्यासाठी सोलापुरातील नवे व जुने शिवसैनिक एकवटले आहेत. माजी आमदार माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नव्या व जुन्या शिवसैनिकांमध्ये संवाद व समन्वय निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. माने यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरमधील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. 

"शहर मध्य'मधील ताकद शिवसेनेची 

"शहर मध्य'मध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. 2009 मध्ये पुरुषोत्तम बरडे यांना 26 हजार मते मिळाली होती. 2014 मध्ये महेश कोठे यांना 33 हजार मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला आमदारकीचा घास थोडक्‍यात हिरावून गेला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना शहर मध्यमधून 30 हजारांचे मताधिक्‍य मिळाले आहे. शिवसेना-भाजप एकत्रित लढल्यास येथून शिवसेनेचा आमदार चांगल्या मताधिक्‍याने विजयी होऊ शकतो, असा विश्‍वास शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे. लोकसभेतील युतीचा हाच जोश विधानसभेतही कायम ठेवण्यासाठी महायुतीने व्यूहरचना आखली आहे.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com