कुर्ल्यात शिवसेनेचे मंगेश कुडाळकर पुन्हा यश मिळवणार ?

परंपरागत कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघावर मध्यंतरी काहीकाळ शिवसेनेचेही वर्चस्व होते. मोदीलाटेचा फायदा घेऊन पुन्हा येथे शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून हा मतदारसंघ सतत ताब्यात ठेवण्याची सुवर्णसंधी सेनेसमोर चालून आली आहे.
Mangesh Kudalkar - Jyotsna Jadhav
Mangesh Kudalkar - Jyotsna Jadhav

त्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला कुर्ला विधानसभा मतदारसंघ हा असा एकमेव आहे की जो मध्य रेल्वेच्या पूर्व उपनगरांमध्ये आहे. हा मतदारसंघ इतकी वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र गेल्यावेळी मोदीलाटेचा फायदा घेऊन शिवसेनेने तेथे ताबा मिळवला. आता येथील शिवसेनेची पकड पक्की झाली आहे. 

येथे शिवसेनेने संघटना आणि कार्याच्या जोरावर वर्चस्व स्थापित केले असून मंगेश कुडाळकर हे विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत. 2 लाख 73 हजार मतदार असलेल्या या कुर्ला विधानसभा क्षेत्रात संमिश्र जाती धर्माचे मतदार आहेत. त्यातच हा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदार संघ आहे. सध्याचे चित्र पहाता यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात प्रमुख लढत असून शिवसेना सलग दुसऱ्यांदा विजय संपादन करील, असे वातावरण दिसत आहे.

या मतदारसंघावर कॉंग्रेस तसेच सेनेसह अन्य विरोधकांचे आलटून पालटून वर्चस्व राहिले आहे. खरे पाहता येथील नेहरूनगर या मराठीबहुल भागात पूर्वीपासून शिवसेनेचे संघटन आहे व नाईक कुटुंबियांनी चांगली कामे करून लोकांना आपलेसे केले आहे. तीच परंपरा आता कुडाळकर चालवीत आहेत. येथे पूर्व आणि पश्‍चिम असा भुयारी मार्ग बनविण्यात शिवसेनेला यश आले असून सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोड मुळेही वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे. 

म्हाडा इमारतीतील रहिवाशांचे बहुतेक प्रश्न आमदारांनी सोडविले असून दांडगा जनसंपर्क असलेले व मृदुभाषी अशी त्यांची ओळख तयार झाली आहे. जिल्हाधिकारी जमिनीवरील लोकांना न्याय देत शासकीय आदेश जारी करत पुर्नविकासाचा मार्ग मोकळा करण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांनी स्वदेशी मिलमधील गिरणी कामगारांना न्याय मिळवून दिला. सध्या कुर्ल्यातील पुर्नविकासासोबत रस्त्यांचे रुंदीकरण, कुर्ला स्टेशन परिसर विकसित करणे, हिंदू आणि मुस्लिम बांधवांसाठी स्मशानभूमी आणि दफनभूमीची व्यवस्था करणे आणि कुर्ला टर्मिनलचा विकास करणे ही कामे पूर्ण होणे गरजेचे आहे.

कॉंग्रेस लाटेत सन 2009 मध्ये येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिलिंद कांबळे हे 41 हजार 891 मतांनी आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा कुडाळकर हे दुसऱ्या स्थानावर होते. कांबळे यांनी पाच वर्षे पुष्कळ प्रयत्न करूनही त्यांना मतदारसंघावर फारशी छाप पाडता आली नाही. त्यामुळे 2014 मध्ये कुडाळकर यांना मागील पराभवाची परतफेड करता आली. त्या निवडणुकीत मिलिंद कांबळे यांची प्रचंड घसरण होऊन ते भाजप, एमआयएमनंतर चौथ्या स्थानावर गेले. यामुळे यावेळी त्यांचा पत्ता कापला गेला असून राष्ट्रवादीकडून डॉ ज्योस्ना अनिल जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. 2 लाख 73 हजार मतदार असलेल्या या कुर्ला मतदार संघात दलित, मुस्लिम मतांची संख्याही लक्षणीय आहे. येथील नगरसेवकांपैकी प्रत्येकी दोन शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यामुळे इथे युतीचे पारडे नक्कीच जड आहे.

येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस नबाब मलिक कुटूंबियांमुळे मजबूत आहे आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले नबाब मलिक आणि मिलिंद कांबळे यांच्यातही फारसे सौहार्दाचे वातावरण नाही. आज कप्तान आणि डॉ सईदा या मलिक यांच्या घरातील सदस्य नगरसेवक असून गेल्या काही महिन्यांपासून डॉ. जाधव यांनी कामास सुरुवात करीत उमेदवारी मिळवण्यासाठी ताकद पणाला लावली. जाधव यांनी उमेदवारीची लढाई जिंकली असली तरी त्यांची पुढची लढाई याहीपेक्षा पुष्कळ कठीण आहे. शिवसेना आणि भाजपा यात युती झाल्यामुळे आता शिवसेनेला ही जागा सहज जिंकता येईल, असे मतांचे आकडे सांगतात. एमआयएम आणि वंचीत आघाडी सोबत समाजवादी पक्ष येथे उमेदवार देणार असून याचा अप्रत्यक्ष फायदा युतीलाच होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com