Will ShivSena Give Vijay Patil Vasai's candidature ? | Sarkarnama

काँग्रेसमधून येताच विजय पाटलांना वसईत शिवसेनेतर्फे उमेदवारी !

संदीप पंडित
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

..

विरार : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश घेणाऱ्याची संख्या वाढली असतानाच आज वसईतील कॉंग्रेसचे दिग्गज्ज आणि प्रदेश सचिव विजय पाटील यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पाटील यांच्या प्रवेशामुळे त्यांना शिवसेनेतून वसईमधून विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.

वसई विधानसभेसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळेल, म्हणून काही वर्षांपासून विजय पाटील प्रयत्नशील होते; परंतु कॉंग्रेस मात्र आमदार हितेंद्र ठाकूर आणि बविआबरोबर राहत असल्याने कॉंग्रेसमधून उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे लक्षात येताच अखेर पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर मनसेचे माजी तालुका प्रमुख प्रफुल्ल ठाकूर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेश सचिव असलेल्या पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे वसईमध्ये मात्र शिवसेनेची उमेदवारी कोणाला, हा प्रश्‍न उभा राहिला आहे. शिवसेनेतर्फे आतापर्यंत माजी आमदार विवेक पंडित, सायमन मार्टिन यांची नावे चर्चेत असताना आता विजय पाटील यांचेही नाव पुढे आल्याने शिवसेनेतून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख