औरंगाबाद पश्‍चिम मतदारसंघात अटीतटीची लढत; तरीही शिवसेना गड राखणार?

शहरातील तीन मतदारसंघापैकी पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाची लढत अटीतटीची झाली. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांनी जोर लावल्याने त्याचा थेट फटका शिवसेनेचे संजय शिरसाट यांना बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. शहरी भागात शिंदे यांनी बऱ्यापैकी मतदान घेतले असले तरी शिरसाट यांना ग्रामीण भाग तारणार असे दिसते. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी स्वंतत्र लढल्याचा फायदा देखील शिवसेनेला होऊ शकतो.
Raju Shinde - Arun Borde - Sanjay Shirsat
Raju Shinde - Arun Borde - Sanjay Shirsat

औरंगाबाद : शहरातील तीन मतदारसंघापैकी पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाची लढत अटीतटीची झाली. भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांनी जोर लावल्याने त्याचा थेट फटका शिवसेनेचे संजय शिरसाट यांना बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. शहरी भागात शिंदे यांनी बऱ्यापैकी मतदान घेतले असले तरी शिरसाट यांना ग्रामीण भाग तारणार असे दिसते. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी स्वंतत्र लढल्याचा फायदा देखील शिवसेनेला होऊ शकतो. अटीतटीची लढत असली तरीही शिवसेना हा गड राखणार आणि संजय शिरसाट विजयाची हॅटट्रीक साजरी करणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

गेल्या सलग दोन निवडणुकीत शिवसेनेने पश्‍चिम विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. गेल्या निवडणुकीत संजय शिरसाट यांचे मताधिक्‍य घटले असले तरी ते विजयी झाले होते. यंदा विद्यमान आमदारांच्या विरोधात काहीसा नाराजीचा सूर असला तरी सक्षम पर्याय मतदारांसमोर नसल्याने ते महायुतीच्याच मागे गेल्याचे चित्र आहे. पूर्व- मध्य मतदारंसघातील बंडखोरी मागे घेण्यात युतीच्या नेत्यांना यश आले तसे पश्‍चिम मध्ये ते आले नाही, किंबहुना शिंदे यांना युतीतील नाराज गटांनीच बळ दिल्याची देखील चर्चा होती.

शिंदे यांच्या प्रचारात भाजपचे स्थानिक पदाधिकारी उघडपणे प्रचार करतांना दिसत होते. संजय शिरसाट यांनी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे तक्रार करून देखील राजू शिंदे यांच्यावर पक्षाने कुठलीच कारवाई केली नाही. यावरून शिंदे यांना भाजपचा छुपा पाठिंबा होता हे सिध्द होते. या बळावरच शिंदे यांनी सेनेच्या शिरसाट यांना पश्‍चिमची लढत काहीसी अवघड केली आहे. शहरी भागात शिंदे यांनी युतीची मते शिरसाट यांच्यापासून वळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले. पण शेवटच्या टप्यात ग्रामीण भागातील बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, दौलताबाद आदी भागात शिवसेनेने शक्तीपणाला लावत मतदान करून घेतल्याचे बोलले जाते.

या भागात संजय शिरसाट यांच्याबद्दल नाराजी असली तरी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून आधी पक्षाचा विचार करा असे आवाहन नेत्यांनी केल्यामुळे शेवटच्या क्षणाला या भागातून सेनेला बुस्ट मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे संजय शिरसाट काठावर का होईना पास होतील आणि शिवसेना तिसरा विजय पश्‍चिमध्ये मिळवेल, असे दिसते.

वंचित-एमआयएम आपसांतच भिडले...
एमआयएमकडून अरुण बोर्डे, तर वंचित बहुजन आघाडीकडून संदीप शिरसाठ मैदानात होते. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याचा फटका दोघांनाही बसल्याचे चित्र आहे. बोर्डे यांना त्यांच्या प्रभाव असलेल्या भागातून दलित मतदान मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी ग्रामीण आणि इतर भागात मात्र वंचितमुळे त्यांना नुकसान झाल्याचे दिसते. तर संदीप शिरसाट हे सुरुवातीपासूनच प्रचारात पिछाडीवर होते. आमखास मैदानावर प्रकाश आंबेडकर यांची झालेली जाहीर सभा हाच त्याच्या प्रचाराचा प्रमुख भाग राहिला.

लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते वंचितला मिळाली नाही या प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाचा फायदा काही प्रमाणात संदीप शिरसाट यांना होऊ शकतो. पण तेवढी मते विजयासाठी पुरेशी ठरणार नाहीत. शिवाय मतदानाच्या दिवशी शेवटचे दोन तास शिल्लक असतांना एमआयएमकडून बोगस पत्रक वाटून वंचितने एमआयएमला पाठिंबा दिल्याची अफवा पसरवण्यात आली होती, त्याचा फटका देखील वंचितला बसू शकतो.

पाठिंब्याचे पत्रक बोगस आहेत, हे सांगेपर्यंत वेळ निघून गेली होती. संदीप शिरसाट यांनी स्वतः प्रकाश आंबेडकरांच्या कानावर हा प्रकार घातला होता. तेव्हा आपण असे कुठलेही पाठिंब्याचे पत्र काढलेले नाही, तुम्ही पोलीसांत तक्रार करा असा सल्ला त्यांना देण्यात आला होता. एकंदरित दलित-मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यामुळे शिवसेना विरुध्द अपक्ष राजू शिंदे यांच्यातच खरी लढत झाली. शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे युतीचे पारंपारिक मतदान मोठ्या प्रमाणावर संजय शिरसाट यांच्याकडे वळण्याची अधिक शक्‍यता आहे.

राजू शिंदे अपक्ष असले तरी त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साथ दिली असली, तरी पक्षाचे अधिकृत चिन्ह नसल्याचा फटका त्यांना बसण्याची शक्‍यता आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्यामुळे पश्‍चिममधून मधुकर सांवत यांना उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाचे कमळ चिन्ह असल्यामुळे थोड्याच दिवसातील प्रचारात सावंत यांना 54355 मते मिळाली होती. एमआयएम पुरस्कृत गंगाधर गाडे, कॉंग्रेसचे जितेंद्र देहाडे अशी चौरंगी लढत असतांना शिवसेनेच्या शिरसाट यांनी 6927 मतांनी विजय मिळवला होता. यावेळी मतदारसंघात फारशी वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे मताधिक्‍य घटले, तरी शिवसेना गड राखेल असा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com