Will Shivsainiks Accept Dhanraj Mahale Again | Sarkarnama

शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना प्रवास केलेल्या धनराज महालेंना कार्यकर्ते स्विकारतील की परतफेड करतील?

संदीप मोगल 
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार धनराज महाले यांनी शिवसेनेला केलेला 'जय महाराष्ट्र' अवघा सहा-सात महिनेच टिकला. महाले यांनी हातावर 'शिवबंधन' बांधल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही हाती भगवा घेतल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले. एकीकडे लोकसभेनंतर शिवसेनेला उमेदवारासाठी पळापळ करावी लागेल किंवा एकनिष्ठ राहिलेल्या नवोदितांना संधी द्यावी लागेल, अशी अवस्था होती. मात्र, दोन्ही माजी आमदारांच्या प्रवेशानंतर आता नवख्या व एकनिष्ठ राहणाऱ्यांना संधी नसल्यात जमा आहे.

नाशिक : लोकसभेच्या उमेदवारीसाठी माजी आमदार धनराज महाले यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत पक्षांतर केले. त्यानंतर विधानसभेच्या उमेदवारीसाठी एका रात्रीत शिवबंधन बांधले. उमेदवारीसाठी त्यांनी झटपट पक्षांतर केले. यावेळी व्यासपीठावरुन प्रतिस्पर्धी पक्षांना दुषणेही दिली. त्यांची पुन्हा घरवापसी झाली तरी कार्यकर्त्यांना ते रुचेल काय? नेते विसरले तरी कार्यकर्ते उमेदवारांनी दिलेली दुषणे विसरतील काय? हा संभ्रम आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाली तरी कार्यकर्ते या उमेदवारांना स्विकारतील काय याची सध्या चर्चा आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार धनराज महाले यांनी शिवसेनेला केलेला 'जय महाराष्ट्र' अवघा सहा-सात महिनेच टिकला. महाले यांनी हातावर 'शिवबंधन' बांधल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही हाती भगवा घेतल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले. एकीकडे लोकसभेनंतर शिवसेनेला उमेदवारासाठी पळापळ करावी लागेल किंवा एकनिष्ठ राहिलेल्या नवोदितांना संधी द्यावी लागेल, अशी अवस्था होती. मात्र, दोन्ही माजी आमदारांच्या प्रवेशानंतर आता नवख्या व एकनिष्ठ राहणाऱ्यांना संधी नसल्यात जमा आहे. या दोघांशिवाय शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून भास्कर गावित, सदाशिव गावित, एकनाथ गायकवाड, एकनाथ खराटे हे चौघे इच्छुक आहेत. त्यांच्यात आता एकनिष्ठ विरुध्द दलबदल करणारे अशी विभागणी झाली आहे. यातील कोणाला उमेदवारी मिळते याचीच उत्सुकता आहे.

मतदारसंघात सध्या सर्वाधिक इच्छुक शिवसेनेत आहेत. यामुळे भविष्यातील नाराजीचा फायदा झिरवाळ यांना होणार की शिवसेना इतरांना जिल्हा परिषदेचे गाजर दाखवून खूश करून विधानसभा मारून नेणार, हे काही दिवसांत समजणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील घडामोडींमुळे नेतेमंडळी संधी शोधात असले, तरी याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो केवळ निष्ठावंत नेते व कार्यकर्त्यांना. 

राष्ट्रवादीमधून पुन्हा शिवसेनेत येणाऱ्या धनराज महाले व कॉंग्रेसबरोबर संबंध बिघडल्यानंतर भाजपसोबत अनेक दिवस सलगी असलेल्या व आता शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या रामदास चारोस्कर यांच्यामुळे कार्यकर्ते मात्र कमालीचे अस्वस्थ असले, तरी आता पुन्हा एकनिष्ठ राहून काम करावे लागणार आहे. म्हणजेच 'पक्ष बदलले नेत्यांनी व परतफेड करणार मात्र कार्यकर्ते' अशी अवस्था सध्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख