संदिपान भुमरेंच्या आमदारकीची पाचवी टर्म, आता तरी मंत्रीपद मिळणार का ? 

ग्रामीण भागाचे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीपान भुमरे यांच्यासारख्या एकनिष्ठ शिवसैनिकाचा उद्धव ठाकरे सन्मान करणार का याकडे मराठवाड्याचे लक्ष्य लागले आहे .
sandipan_bhumre
sandipan_bhumre

औरंगाबाद : पैठणचे आमदार संदिपान भुमरे शिवसेनेचे राज्यातील सर्वात सीनियर आमदार झाले आहेत.  ते पाचव्यांदा शिवसेनेतर्फे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 

2019 मध्ये शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेले आहेत त्यामध्ये संदिपान भुमरे आणि भास्कर जाधव हे दोघेजण सिनिअर मोस्ट आहेत. या दोघांच्या आमदारकीची ही  पाचवी टर्म आहे .  यामध्ये भास्कर जाधव हे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेले होते.  त्यानंतर दोन टर्म ते  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता त्यांनी या निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश केलेला आहे . 

त्यामुळे सतत शिवसेनेमध्ये राहून आमदार म्हणून पाचव्यांदा निवडून आलेले संदिपान भुमरे राज्यामध्ये एकमेव आमदार आहेत. 

संदिपान भुमरे ते पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये 1995 पासून सातत्याने शिवसेनेतर्फे आमदार म्हणून निवडून येत आहेत . 2009 चा अपवाद वगळता त्यांनी सातत्याने आमदार म्हणून निवडून येण्यात  यश मिळवलेले आहे. संदीपान भुमरे हे लो प्रोफाइल नेते आहेत. त्यांचे संघटनकौशल्य उत्तम आहे. गेल्या ३०-३५ वर्षांपासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. तसेच साखर कारखानदारही आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्याने शिवसेना-भाजप युतीला नऊ -शून्य अशी आघाडी निर्विवाद आघाडी मिळवून दिली.  त्यामध्ये शिवसेनेचे सहा आमदार निवडून दिलेले आहेत . 

शिवसेनेने गेल्या पंचवार्षिकमध्ये औरंगाबाद जिल्ह्याला राज्य मंत्रिमंडळ मध्ये स्थान दिलेले नव्हते.  भारतीय जनता पक्षाने मात्र औरंगाबाद जिल्ह्यातून हरिभाऊ बागडे यांना विधानसभेचे अध्यक्ष केले तर शेवटच्या काळामध्ये अतुल सावे यांनी राज्यमंत्री केले .  अशाप्रकारे औरंगाबादचे महत्त्व भाजपनेही कायम राखले होते .

यावेळी शिवसेनेतर्फे  औरंगाबाद मध्यमधून  प्रदीप जैस्वाल  निवडून आले. त्यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. त्यांनी औरंगाबादचे खासदारपदी भूषविलेले आहे . औरंगाबाद पश्चिम मधून संजय शिरसाट, पैठणमधून  संदिपान भुमरे , कन्नडमधून उदयसिंह राजपूत आणि वैजापूरमधूनरमेश बोरनारे हे सहा आमदार आहेत . 

औरंगाबाद जिल्ह्यात तर संदीपान भुमरे सिनिअर आमदार आहेतच ,शिवाय राज्यातही ते शिवसेनेचे सर्वाधिक पाच टर्म असलेले आमदार आहेत . 

राज्यातील शिवसेनेचा विचार केला तर एकनाथ शिंदे, संजय राठोड, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे आणि अनिल बाबर हे  सहा जण जण चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 

शिवसेनेतर्फे सध्या निवडून आलेले  तेरा जण तिसऱ्यांदा  आमदार झाले  आहेत . यामध्ये रवींद्र वायकर , प्रताप सरनाईक, सदा सरवणकर ,  डॉक्टर बालाजी किणीकर , शंभूराजे देसाई ,भरत शेठ गोगावले, संजय शिरसाट , राजन साळवी , ज्ञानराज चौगुले , संजय रायमुलकर , दीपक केसरकर , चिमणराव पाटील आणि अब्दुल सत्तार असे यांचा समावेश आहे. 


शिवसेनेतर्फे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या मध्ये सुनील प्रभू , अजय चौधरी ,रमेश लडके ,प्रकाश सुर्वे, प्रकाश फातरपेकर, सुनील राऊत, मंगेश कुडाळकर, वैभव नाईक , संजय पोतनीस ,शांताराम मोरे ,प्रकाश आबिटकर, किशोर पाटील ,राहुल पाटील आणि शहाजी पाटील यांचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटन विस्तार झपट्याने होतो आहे. ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने शरद पवार यांच्याकडे आकृष्ट होतोय . हर्षवर्धन जाधव यांनीही लोकसभेला शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले होते . त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागाचे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीपान भुमरे यांच्यासारख्या एकनिष्ठ शिवसैनिकाचा उद्धव ठाकरे सन्मान करणार का याकडे मराठवाड्याचे लक्ष्य लागले आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com