शरद पवारांनी नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना काय सल्ला दिला?

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र माजी खासदार नितेश आणि आमदार निलेश राणे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. या दोन्ही मुलांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सल्ला दिला आहे. या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला हे दोन्ही पुत्र अमलात आणणार का?
शरद पवारांनी नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना काय सल्ला दिला?

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या `झंझावात` या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली आहे. राणे यांनी शून्यातून सुरू केलेल्या राजकीय प्रवासाचे कौतुक करताना त्यांनी राणे यांच्या दोन्ही पुत्रांनाही एक सल्ला दिला आहे. हा सल्ला जर त्यांनी अमलात आणला तर त्यांचा अभ्युदय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राणे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते मुंबईत दोन दिवसांपूर्वी झाले. त्या वेळीही पवार यांनी राणे यांचे मनापासून अभिनंदन केले. पवार यांच्याबद्दल आपल्याला नितांत आदर असल्याचा उल्लेख राणेंनी पुस्तकात अनेक ठिकाणी केला आहे.

राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी स्वतः पवार हे त्यांना तीन वेळा भेटले होते. मात्र पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने कोणताही किंतु न बाळगता आपल्याला तीन वेळा स्वतः येऊन भेटणे, यामुळे राणे यांनाच खंत वाटली. चौथ्या वेळी राणे यांनी स्वतःहून पवार यांना फोन केला आणि त्यांची भेट पवारांच्या पुण्यातील घरात झाल्याचे राणे यांनी पुस्तकात नोंदविले आहे. तसेच पवार यांनी आपल्याला गृहमंत्रिपद देऊ केले होते, असेही राणे यांनी लिहिले आहे. या प्रस्तावाला तत्कालीन गृहमंत्री आऱ. आर. पाटील आणि छगन भुजबळ या नेत्यांनी विरोध दर्शविल्याचाही राणेंचा दावा आहे. 

राणे यांच्या पुस्तकाला पवार यांनी प्रांजळपणे प्रस्तावना लिहिली आहे. राणेंचे गुणदोष, चुकलेल्या राजकीय खेळी याबाबतही त्यांनी टिप्पणी केली आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे राणे यांच्या डावपेचाला कसे तोडीस तोड उत्तर देत होते, याचाही उलगडा पवार यांनी यात केला आहे. 

पवार म्हणतात, ``राणेंच्या राजकीय प्रवासातील सगळी नाटय़मय वळणे मी जवळून पाहिली आहेत. कोणत्याही वळणावर त्यांचे आणि माझे संबंध सौहार्दाचे राहिले आहेत. त्यांचा आक्रमकपणा सर्वपरिचित आहे. तळागाळातून हिमतीने उभे राहून, तावून-सुलाखून तयार झालेल्या व्यक्तीच्या ठायी असा आक्रमकपणा असतोच. पण, सामान्य माणसांबद्दल असलेली आत्मीयता आणि अनुकंपादेखील भरभरून असते. पण, ती दिसण्यासाठी जवळ जावे लागते. नारायणराव नावाच्या फणसातले मधुर-रसाळ गरेदेखील त्यांच्या सान्निध्यात गेल्याशिवाय कळत नाहीत. सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे,``असा शब्दफुलांचा वर्षाव त्यांनी प्रस्तावनेत केला आहे.

 ‘झंझावात’ हे आत्मचरित्र वाचताना त्याची साक्ष आपणास पटेल. माझे आणि नारायण राणे यांचे आपुलकीचे नाते आहे. आमची औपचारिक अथवा अनौपचारिक कधीही भेट होवो, त्यांना माझ्याप्रति असणारा स्नेहादर नेहमीच दिसून येतो. मागील गणेशोत्सव काळात त्यांच्या जुहू किना-याजवळच्या घरी जाणे झाले. डिसेंबर महिन्यात कणकवली येथील घरीसुद्धा गेलो. राजकीय क्षेत्रात अशा अनौपचारिक भेटी झाल्या की, विविध चर्चाना उधाण येतं; राजकीय पटलावर वेगवेगळे तरंग उमटतात; माध्यमांतून अनेक तर्कवितर्क लढवले जातात. नारायणरावांच्या अस्तित्वाची दखल घेतली गेली नाही, असे कधी घडत नाही,``असेही पवार यांनी नमूद केले आहे.

या प्रस्तावनेत चार वाक्ये पवार यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल लिहिले आहेत. ``त्यांच्या प्रचंड कार्यबाहुल्यात सतत काळजी वाहणारी, खंबीरपणे साथ देणारी अर्धागिनी सौ. नीलमताई पत्नी म्हणून त्यांना लाभली आहे,`` अशा शब्दांत नीलम वहिनींबद्दल पवार यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांचे पुत्रे निलेश आणि नितेश यांनाही मार्गदर्शनाचे चार शब्द सांगितले आहेत.

``निलेश आणि नितेश हे दोन्ही मुलगेदेखील राजकारणात स्वत:ला सिद्ध करत आहेत. वडिलांमधील आक्रमकता, अनुकंपा, अनन्यसाधारण धडाडी, विनम्रता आणि मुख्य म्हणजे अभ्यासू वृत्ती हे गुण त्यांनी जोपासले, तर त्यांचाही अभ्युदय निश्चित आहे,`` असे पवार यांनी खात्रीपूर्वक लिहिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com