पिंपरी-चिंचवडला कॅबिनेट मिळण्याची शक्यता कमी; राज्यमंत्री मिळाले,तर महेशदादांची लॉटरी लागणार?

मागच्या टर्मला हुलकावणी दिलेले मंत्रीपद यावेळी,तरी पिंपरी-चिंचवडला मिळणार का याची आस शहरवासियांना पुन्हा लागली आहे. शहराच्या इतिहासात आतापर्यंत साधे राज्यमंत्रीपदही मिळाले नसून हा बॅकलॉग यावेळी भरून काढण्यात यावा, अशी सर्वच राजकीय पक्षांची मागणी व इच्छा आहे.
Mahesh Landge
Mahesh Landge

पिंपरी : मागच्या टर्मला हुलकावणी दिलेले मंत्रीपद यावेळी,तरी पिंपरी-चिंचवडला मिळणार का याची आस शहरवासियांना पुन्हा लागली आहे. शहराच्या इतिहासात आतापर्यंत साधे राज्यमंत्रीपदही मिळाले नसून हा बॅकलॉग यावेळी भरून काढण्यात यावा, अशी सर्वच राजकीय पक्षांची मागणी व इच्छा आहे.

मात्र, दोन नंबरचे मंत्री असलेले चंद्रकांतदादा पाटील हे पुण्यातून निवडून आल्याने त्यांचे कॅबिनेट नक्की आहे. तर, राज्यमंत्रीही पुण्यातून भरले जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे पिंपरीला जिल्ह्याच्या वाट्याचे राज्यमंत्रीपद येण्याची शक्यता आहे. ते मिळाले, तर तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील भोसरीचे आमदार महेश लांडगेंना संधी  मिळेल,असा राजकीय जाणकारांचा होरा आहे.

पिंपरी-चिंचवड पालिकेत २०१७ ला बहुमताने प्रथमच भाजपची सत्ता आणल्याचे बक्षीस म्हणून शहराला मंत्रीपद देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. दोन महिन्यांसाठी तरी, ते मिळेल,असे शहराचे कारभारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सांगितले होते. त्यामुळे शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारात शहराला मंत्रीपद मिळेल,अशी आशा होती. पण, ते मावळला देण्यात आले आणि शहराला मंत्रीपदाचे गाजर मिळाले. मात्र, यावेळी ते मिळण्याच्या आशा अधिक वाढल्या आहेत. कारण जिल्ह्यातून पर्यावरण व कामगार राज्यमंत्री झालेले भाजपचे बाळा भेगडे यांचा मावळमध्ये पराभव झाला आहे. 

अशीच गत शिवसेनेचीही झाली आहे. त्यांचे राज्यमंत्री विजय शिवतरे यांनाही पुरंदरमध्ये हार पत्करावी लागली आहे.त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याचा मंत्रीपदाचा कोटा यावेळी पिंपरी-चिंचवडला मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत.त्यासाठी प्रबळ व पात्र दोन दावेदार शहरात आहेत. त्यातील लक्ष्मण जगताप यांनी आमदारकीची हॅटट्रिक केली आहे. तर, दुसऱ्यांदा  आमदार झालेले लांडगे हे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले भाजपचे आमदार आहेत. शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार झाल्याने त्यांचा जिल्ह्यातून मंत्री होण्याची शक्यता कमी आहे.

दुसरीकडे लांडगेंना मंत्री करणे ही भाजपची अपरिहार्यताही ठरणार आहे. कारण भाजप व मित्र पक्षाचे तीन मंत्री आणि पालकमंत्री असतानाही पक्षातील मतांच्या टक्केवारीमध्ये पुणे जिल्ह्यात विधानसभेला कमालीची घट झाली आहे. आमदार कमी झाले आहेत. परिणामी 'मास लीडर' असलेल्या लांडगेंना मंत्रीमंडळात संधी दिल्यास भाजपची ग्रामीण आणि शहरी भागातील पकड मजबूत होईल, तसेच दोन्ही काँग्रेसची घोडदौड नियंत्रणात ठेवता येईल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी बांधला आहे. नवीन चेहरा, तरुणांमध्ये कमालीची क्रेझ, राजकीय अचूक व्यवस्थापन व मुख्यमंत्र्यांचा विश्वासू सहकारी आदी बलस्थानांमुळे लांडगे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवडला पहिला मंत्री मिळण्याची शक्यता आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com