नाईक आणि देशमुखांचे मनोमीलन शिराळ्यात रूचेल?

नाईक आणि देशमुखांचे मनोमीलन शिराळ्यात रूचेल?

पुणे : सांगली जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजीराव देशमुख आणि शिवाजीराव नाईक या  गुरूशिष्याच्या जोडीची अनेक वर्षे चर्चा होती.  मात्र १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यात फूट पडली. नंतर एकदा एकी झाली पण त्या एकीतून राजकीय गणिते उभारता आली नाहीत आणि ती एकीही फार काळ टिकली नाही.

काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर काही महिन्यांतच त्यांचे सुपूत्र सत्यजित देशमुख भाजपमध्ये आले आहेत. आता त्याना मागचं सगळं विसरून पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवाजीराव नाईक यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात नाईक आणि देशमुख यांच्यातला नवा राजकीय घरोबा कसा असेल हे आगामी काळातच कळेल.

सांगली जिल्हा परिषदेचे सलग बारा वर्षे अध्यक्ष म्हणून काम केलेल्या शिवाजीराव नाईक यांना काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना त्याना डावलून शंकरराव चरापले यांना उमेदवारी मिळाली. मग नाईक यांनी बंडखोरी केली. ते विजयी झाले. या निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांना शिवाजीराव देशमुख यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी फत्तेसिंगराव नाईक यांनी मदत केली होती.

नाईक आमदार झाल्यावर त्यानी युती सरकारला पाठींबा दिला.युती सरकारमध्ये ते मंत्री झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतली. त्यांनी शिवाजीराव देशमुख यांचे सुपूत्र सत्यजित देशमुख यांचा पराभव केला.

नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे आणि जयंत पाटील यांचे जमले नाही. फत्तेसिंग नाईक यांचाही गट त्यांच्यापासून दुरावला. २००४ ची निवडणूक त्यानी अपक्ष लढवली, तेव्हाच्या तिरंगी लढतीत  त्यांनी मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांचा पराभव केला. २००९ ची  विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसकडून लढवली. त्या निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवाचे कवित्व बरेच दिवस सुरू राहीले. सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी मानसिंगराव नाईक यांचा प्रचार केला असा आरोप शिवाजीराव नाईक यांच्या गटाकडून होत राहिला. २०१४च्या निवडणुकीत शिवाजीराव नाईक सत्यजित देशमुख आणि मानसिंगराव नाईक अशी तिरंगी लढत झाली.या लढतीत मतविभागणीचा फायदा शिवाजीरावांना झाला.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी करून शिवाजीराव नाईक यांच्याशी तगडी लढत देण्याचे आडाखे आघाडीकडून बांधले जात असतानाच अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीत काम केलेल्या शिवाजीराव देशमुख यांचे सुपूत्र आणि नाईक यांचे कट्टर विरोधक सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजप मजबूत झाली आहे

मात्र नाईक आणि देशमुख हे दोघे काँग्रेसमध्ये असताना असेच मनोमीलन झाले होते. तेव्हा कार्यकर्त्यांना ते मनोमीलन रुचले नव्हते. त्याचा परिणाम शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला होता .त्यामुळे हे वरवरचे आहे की मनापासून याची चर्चा सूरु आहे. शिवाजीरावांचे पारंपरिक विरोधक मानसिंगराव नाईक पुन्हा शड्डू ठोकून तयार आहेत. त्यामुळे शिराळ्यात एक नाईक आणि एक देशमुख एकत्र आले तरी दुसरा नाईक काय खेळी करणार, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com