निपुण विनायक जरा भोगे - तुकाराम मुंडेंचा आदर्श घेणार का  ?

महापालिका आयुक्ताना किती अधिकार असतात आणि त्यांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते? हे कृष्ण भोगे यांनी दाखवून दिले होते म्हणून आज २० - २५ वर्षांनीही त्यांचे नाव निघते . भोगेंनी महापालिकेचे जकातीचे उत्पन्न एका वर्षात दुप्पट करताना अनेकांची खाबुगिरी बंद केली होती . बोगस कामे करणारे अधिकारी निलंबित आणि बडतर्फ करण्याचा त्यांनी धडाकाच लावला होता .
Nipun Vinayak
Nipun Vinayak

औरंगाबादः महापालिकेचे आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी दोन दिवसांपुर्वी आपण महापालिकेत न बसण्यामागे दलालांचा वावर हे कारण सांगत वाद ओढावून घेतला.  याबाबत निपुण विनायक यांनी सध्या नाशिकचे महापालिका आयुक्त असलेल्या तुकाराम मुंडेंचा आदर्श घ्यायला हवा . 

दलालांचा वावर असल्यामुळे आपण महापालिकेत बसत नाही असे विधान केल्यानंतर आता आयुक्‍त निपूण राजकारणी आणि सर्वसामान्य नागरीक अशा दोघांच्याही डोळ्यावर आले आहेत. महापालिकेत दलालांचे राज्य कुणाच्या आर्शिवादाने चालते हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतीषाची गरज नाही. पण ते रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच जर हतबलता दर्शवत असतील तर लोकांनी कुणाकडे जायचे हा खरा प्रश्‍न आहे.   

दलाल आणि भ्रष्ट लोकांना चाप लावून सर्वसामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठीच सरकारकडून आयुक्‍तांची नियुक्ती केली जाते. तुकाराम मुंडे जेथे बदलून जातील तेथे आधी स्वच्छता अभियान हाती घेतात . भ्रष्ट अधिकारी आणि दलालांचे ते कर्दनकाळ बनतात तर सर्वसामान्य नागरिकांचे ते तारणहार बनतात . सध्या नाशिकमध्य भाजपची महापालिकेत सत्ता आहे . तेथेही नगरसेवक विरोधात गेलेले असताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्यावर ते दणकावुन काम करीत आहेत . 

निपुण विनायक यांनी जर औरंगाबाद शहरात दलालांविरुद्ध आणि भ्रष्टचाराविरुद्ध  मोहीम हाती घेतली तर सर्वसामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील . सर्वसामान्य नागरिकांना टाळण्यापेक्षा त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यावर निपुण विनायक यांनी भर द्यायला हवा . औरंगाबादच्या राजकीय नेत्यांना नियमावर बोट ठेवून कारभार कसा  केला जातो याचा धडा द्यालाच हवा . निवडणुका तोंडावर आलेल्या असताना तुमची बदली राजकारणी करू शकणार नाहीत . 

औरंगाबाद शहरात सध्या वास्तव्यास असलेले ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनीही निपुण विनय यांच्या  वक्तव्यावर आश्चर्य नोंदवले आहे .  दलालांना घाबरून महापालिकेत जाण्याचे टाळणे चुकीचे आहे हे सांगताना त्यांनी निपुण विनायक यांना दररोज तीन तास सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीसाठी कार्यालयात वेळ राखून ठेवावा असा ज्येष्ठत्वाचा सल्ला जाहीरपणे दिला आहे . हे तर 'चोराना भिऊन पोलिसांनी पोलीस स्टेशन  मधून पळ काढण्यासारखे 'असल्याची त्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे . 

निपुण विनायक यांनी कृष्ण भोगे यांची भेट घ्यायला हवी . कृष्णा भोगे महापालिका आयुक्त असताना त्यांनी बोगस काम करणारे दलाल कंत्राटदार थेट काळ्या यादीत टाकलेले होते . त्या कंत्राटदारातील काहीजण आज महापालिकेच्या राजकारणात सक्रिय झालेले दिसतात . 

महापालिका आयुक्ताना  किती अधिकार असतात आणि त्यांनी मनावर  घेतले तर काय होऊ शकते?  हे कृष्ण भोगे यांनी दाखवून दिले होते म्हणून आज २० - २५ वर्षांनीही त्यांचे नाव निघते . भोगेंनी  महापालिकेचे जकातीचे उत्पन्न एका वर्षात दुप्पट करताना अनेकांची खाबुगिरी बंद केली होती . बोगस कामे करणारे अधिकारी निलंबित आणि बडतर्फ करण्याचा त्यांनी धडाकाच लावला होता . 

तुकाराम मुंडे यांनी नवी मुंबई असो कि पुणे  बस वाहतूक महामंडळ असो भ्रष्ट आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा आसूड ओढला होता . त्यामुळे नागरिक त्यांच्या सदैव पाठीशी असतात . विनायक तुम्ही देखील असेच काही नियमाचे आणि कायद्याचे चार शब्द बोला अशी नागरिकांची अपेक्षा आहे . 

तुम्ही मुंडे - भोगेंचा मार्ग स्वीकारला तर जास्तीत जास्त काय होईल तर तुमची बदली  होईल . जसे मांजर कितीही उंचावरून पडले तर चारीही पायावर पडते आणि चालायला लागते तसे आय ए एस अधिकाऱ्यांचे असते . त्यांची बदली दुसरीकडे कुठे मोठ्या पदावरच करावी लागते . तिथेही बंगला , गाडी , नौकर चाकर दिमतीला असतातच . मग कशाला डगमगायचे ? तुम्ही जालना जिल्हा परिषदेत चांगले काम केले होते . त्याच्या आठवणी लोक अजून सांगतात . मग औरंगाबादला जरा तुमच्या कार्य नैपुण्याचे दर्शन घडवायला काय हरकत आहे ? 


शहरात कचऱ्याच्या प्रश्‍नाने आग लावलेली असतांना दिल्लाहून स्वच्छता अभियानात 'निपुण' असलेल्या डॉ. निपुण विनायक यांची नेमणूक औरगाबादेत महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास आग्रहावरून त्यांना इथे आणण्यात आल्याची देखील चर्चा होती. 

नव्या आयुक्‍तांनी मुंबईहून औरंगाबादला येतांनाच विमानातूनच आपल्या कामाला सुरुवात केल्याचे पाहूण औरंगाबादकरांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला होता. विमानात निपुण यांनी औरंगाबादचे कोण कोण आहेत असा प्रश्‍न करत मी तुमच्या शहराचा नवा महापालिका आयुक्त, तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे चिठ्ठीवर लिहून द्या, मी त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करीन असे आश्‍वासक शब्द त्यांनी तेव्हा काढले होते. 

त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याच्या प्रश्‍वावरून सुरु असलेले राजकारण रोखण्यात निपूण यांना यश येईल आणि शहरवासियांची कचराकोंडीतून मुक्तता होईल अशी आशा होती. पण गेल्या चार महिन्यातील महापालिका आयुक्‍ताचा कारभार आणि त्यांची काम करण्याची पध्दत पाहता जनतेचा भ्रमनिरास झाला असेच म्हणावे लागेल. 


पहाटे सायकलिंग, मॉर्निंग वॉकला जातांना कधी साफसफाईची तर कधी ज्येष्ठ नागरीकांची भेट घेऊन त्यांनी विचारपूस करत असल्याचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हायरल करत आपण जनतेची कशी काळजी घेतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक देखील झाले. पण नव्याची नवलाई संपली . 


शहराला दोन महिने आयुक्त नसतांना जशी परिस्थीती होती तशीच आजही कायम आहे. कचरा प्रश्‍नात निपूण यांनी हात घातला खरा, पण त्यात आपलेच हात खराब होण्याचा धोका ओळखून त्यांनी सावध पावित्रा घेतला. शंभर कोटी रस्त्यांच्या रखडलेल्या निविदा, समांतर जलवाहिनेचे त्रांगडे आणि अजूनही आवासून उभा ठाकलेला कचऱ्याचा प्रश्‍न जैसे थे आहे. त्यामुळे निपुण विनायक यांनी आता टॉप गियर टाकला हवा . कारवाईचा बडगा उगारीला हवा अशे नागरिकांची अपेक्षा आहे . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com