राज ठाकरे यांचा नेम बरोबर लागणार का?

मनसेच्या आज होत असलेल्या महाअधिवेशनाच्या निमित्ताने एका जाणकाराने या पक्षाच्या बदलत्या राजकीय शैलीविषयी व्यक्त केलेले हे विचार.
raj thackray
raj thackray

मनसेचे पाहिले महाअधिवेशन हे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी होत आहे. या अधिवेशनाच्या अनेक दिवस आधीपासून एकाच चर्चेने जोर धरला आहे की मनसे हिंदुत्वचा स्वीकार करणार का? मनसे आपला झेंडा बदलणार का? मनसेच्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत आहे.  या महाअधिवेशनाच्या निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन व वातावरण निर्मित मनसेने केले. मुंबईत ठिकठिकाणी मोठे होर्डिंग व कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत आहे. मागील तीन महिन्यांत महाराष्ट्रतील सत्ताकारणातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अशक्य वाटणाऱ्या आघाड्यांनी जन्म घेतला. हे करतांना जवळपास सर्वांनीच आपली वैचारिक भूमिका बाजूला ठेवून केवळ राजकीय लाभ यावरच जोर दिलेला आहे.


या सर्व गोष्टी जनता पाहत आहे व याबद्दल त्यांच्या प्रतिक्रियाही तीव्र आहेत. सरकार स्थापनेसाठी सेनेला हिंदूत्व बाजूला ठेवावे लागले. काॅंग्रेसला धर्मनिरपेक्षतेपेक्षा सत्तेतील सहभाग महत्त्वाचा ठरला. या पार्श्वभूमीवर मनसेदेखील वैचारिक कात टाकत आहे.

सध्या जगात ब्राझील, अमेरिका अशा अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचे राज्यकर्ते सत्तेत आहेत. भारतातही सध्या उजव्या विचारसरणीचे वारे वाहत आहे. ही बाब या साऱ्या राजकारण्यांना नव्याने विचार करण्यास भाग पाडत आहे.
राज ठाकरे हे आपल्या अचूक टायमिंग बद्दल ओळखले जातात. परंतु मागील काही वर्षांत त्यांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांना अपेक्षित असे राजकीय यश भेटले नाही.  या अवघड काळात अनेक सहकारी ज्यांचा राजकीय उदय च राज ठाकरेंमुळे झाला होता, ते पक्षाच्या पडत्या काळात सोडून गेले. जिथे चलती आहे तिथे जाऊन सामील झाले.

पक्षाची भूमिका बदलते अथवा पूर्ण वेळ कार्यक्रम दिला जात नाही, असे अनेक आरोप हे मनसेवर होत असतात. परंतु इंग्रजी म्हणीप्रमाणे Someone's loss is someone's gain, तसे सेनेने बाजूला ठेवलेले हिंदुत्व हे मनसे साठी मोठी संधी आहे. हे चाणाक्ष अशा राज ठाकरेंनी नक्कीच हेरले असणार. राज ठाकरे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व. त्यामुळे त्यांनाही बदलेल्या राजकारणत उजव्या विचारसरणीचे महत्त्व लक्षात आले असेल. तसेच हिंदुत्ववादी मतदारांना सुद्धा एक आक्रमक चेहरा असा हवा आहे. कारण सेनेचे हिंदुत्व जरी असले तरी उद्धव हे आक्रमक नाहीत व भाजपचे हिंदुत्व हे `सबका साथ सबका विकास` असा मुखवटा पांघरलेले आहे.

दुसरीकडे अतिशय आक्रमक आणि प्रखर भूमिका घेऊन राज यांच्यापेक्षा कमी करिश्मा असलेल्या नेत्यांनाही राजकीय यश या महाराष्ट्रात मिळाले.या सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ओवेसी बंधू. आज महाराष्ट्रत त्यांचा एक खासदार, दोन आमदार आणि अनेक नगरसेवक आहेत. हे यश डोळ्यात भरण्यासारखे आहे. आज तरी त्या तोडीस असलेले आक्रमकता ही महाराष्ट्र त केवळ राज ठाकरे यांच्याकडे आहे. राहिला मुद्दा भूमिका बदलण्याचा. तर त्याचा भारतात मोठाच इतिहास आहे. एकमेकांविरोधात तीव्र प्रचार करून वेगवेगळे लढून नंतर एकत्र आलेले ताजे उदाहरण म्हणजे कर्नाटकात झालेली कुमारस्वामी व काँग्रेस युती.  त्यानंतर नितीशकुमार आणि भाजप यांनीही अनेक उलट्यासुलट्या उड्या मारत सत्तेसाठी एकत्र आले. महाराष्ट्रातील महाआघाडी हे एकदम ताजे उदाहरण. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात विळ्याभोपळ्याचे सख्य. त्यांनीही लोकसभा निवडणूक एकत्र लढविली. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर हिंदुत्व हा मुद्दा महाराष्ट्रात आक्रमकतेने घेणाऱ्या नेत्याची पोकळी राज ठाकरेंना खुणावत आहे. त्यामुळेच ते आता वैचारिक भूमिका बदलण्याच्या भूमिकेत आहेत.  आता हे टायमिंग राज आणि मनसेला तारणार का, याची उत्सुकता राहणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com