Will Narendra Modi's iron grip over party will get loose ? | Sarkarnama

मोदींची पोलादी पकड सैल होणार का ?  

मृणालिनी नानिवडेकर
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

.

मुंबई: विविध पक्षातील अनेक पंचाहत्तरी पार नेत्यांना लोकसभा लढवायची आहे .  भाजपमधील देखील अनेक  ज्येष्ठांना  तरूण मतदारांचे प्रतिनिधीत्व  करायचे आहे . 

पण  भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर मार्गदर्शक मंडळात जाण्याचा दंडक केला आहे. मोदींची पोलादी पकड सैल झाली तरच या नियमात खंड पडेल.

ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते राम नाईक यांनी तरूण अभिनेता गोविंदाशी दिलेली लढत एकेकाळी रंगली होती. त्याचप्रमाणे भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा गाजवलेली आहे . पण प्रश्न आहे  पक्षाला गरज असण्याचा आणि पक्षाने संधी देण्याचा . भाजपला आता पाच राज्यांचे निकाल आल्यानंतर उमेदवाराचे इलेक्टीव्ह मेरिट पाहावे लागेल . त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना सरसकट मार्गदर्शन मंडळात पाठवता येणार नाही . 

 भारत हा तरूणांचा देश आहे,2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांचे वय असेल म्हणे सरासरी 30 वर्षे पण या तरूणांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्रात तरी सर्वच पक्षात अनुभवी नेते सज्ज होत आहेत.

 मध्यप्रदेश,छत्तीसगड आणि राजस्थान या तीन हिंदीहार्टलॅण्ड राज्यात कॉंग्रेसची सरशी होणार असे भाकीत एक्‍झिट पोलने केल्यावर एकेकाळी खासदारअसलेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा लढण्याची तयारी जोराने सुरू केली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारशिंदे यांना सोलापूर या जुन्या लोकसभा मतदारसंघात लढण्याची इच्छा असल्याने त्यांनी तयारी सुरू केली होतीच . 

आता लातूर हा मराठवाडयातील मतदारसंघही बदलत्या परिस्थितीत भाजपला साथ देणार नाही असे वाटत असल्याने शिवराज पाटील यांनीही आपण लढण्यास तयार आहोत असे स्पष्ट केले असल्याचे समजते. माणिकराव गावीत,सुरूपसिंग नाईक अशा ज्येष्ठांनीही आपापली बाजू अजमावून पहाण्यास प्रारंभ केला आहे.  

तर दादर वडाळा धारावी या क्षेत्रातील लोकसभा मतदारसंघात एकनाथ गायकवाड यांच्याशिवाय कोणताही उमेदवार नाही असे चित्र आहे.या सर्व नेत्यांची वये लक्षात घेता तरूण तुर्कांनी आम्हाला संधी मिळणार तरी कशी असा प्रश्‍न करण्यास प्रारंभ केला आहे.युवक कॉंग्रेसला आठ लोकसभा मतदारसंघात संधी दया अशी मागणी प्रारंभीच समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील , विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर असे ज्येष्ठ नेते लोकसभेत जाण्याची संधी मिळाली तर तयार असल्याचे स्पष्ट करीत आहेत. 

शिवसेनेत गजानन किर्तीकर हे सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख