विधान परिषदेच्या उमेदवारीत पटोले घेणार माणिकराव ठाकरेंची विकेट?  - Will Nana Patole beat Manikrao Thakre for MLC ticket ? | Politics Marathi News - Sarkarnama

विधान परिषदेच्या उमेदवारीत पटोले घेणार माणिकराव ठाकरेंची विकेट? 

सुरेश भुसारी 
गुरुवार, 28 जून 2018

माणिकराव ठाकरे यांनीही जोरदार तयारी चालविली आहे. परंतु मोहन प्रकाश यांची प्रदेश कॉंग्रेस प्रभारी पदावरून उचलबांगडी झाल्याने माणिकराव ठाकरे यांची दिल्लीतील बाजू काहीसी लंगडी पडल्याचे बोलले जात आहे.
 

 

नागपूर :  पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी घोडे दामटले आहे. पटोले भारी पडल्यास विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या उमेदवारीवर संक्रांत येऊ शकते. 

येत्या 16 जुलैला विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. कॉंग्रेसचे तीन सदस्य निवृत्त होत आहेत. यात माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे व संजय दत्त यांचा समावेश आहे. कॉंग्रेसच्या संख्याबळानुसार केवळ दोन सदस्य निवडून येऊ शकतात. दुसऱ्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. 

या स्पर्धेत आता नाना पटोले यांनी उडी घेतल्याने माणिकराव ठाकरेंच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते माणिकराव ठाकरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. 

नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु प्रफुल्ल पटेल यांनी भविष्यातील तोटा ओळखून राष्ट्रवादीकडे ही जागा कायम राखली. विधानसभेच्या निवडणुकीला अद्यापही सव्वा वर्ष असल्याने नाना पटोले यांनी विधान परिषदेत जाण्याची तयारी चालविली आहे. उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासाठी पटोले सध्या दिल्लीत आहेत.

 त्यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्रचे प्रभारी मल्लिाकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पटोले यांच्या या उमेदवारीच्या चर्चेला वेग आला आहे. सहा महिन्यापूर्वी पटोले यांनी भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला व लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडीला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावल्याने पटोले यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींमध्ये सुद्धा "सॉफ्ट कॉर्नर' असल्याचे समजते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख