will maratha youth understand feeling of trupti desai | Sarkarnama

मी पण मराठ्यांचीच लेक आणि सून; पण? : तृप्ती देसाई यांची खंत तरुण समजून घेतील?

महेश जगताप
गुरुवार, 26 मार्च 2020

एखाद्या महिलेविषयी खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नाही. सर्वच तरुणांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे. 

पुणे : मला ट्रोल करणारे आणि अश्लील शिव्या देणारे, आईवरून शिव्या देणारे, छत्रपतींचे फोटो वापरतात. त्यांचं नाव घेतात. मग तुम्ही हे शिकला आहात का? माझी बदनामी करणारे 80 टक्के मराठा तरुण आहेत. मी पण मराठ्यांचीच लेक आणि सून आहे. छत्रपतींची शिकवण मराठे विसरायला लागलेत, असे आता म्हणावे लागत असल्याचे परखड मत ट्रोल करणाऱ्यामळे दुखावलेल्या  भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी मांडले आहे. त्यांनी आपली पोस्ट छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे दोघांनाही टॅग केली आहे. त्यावर आता हे दोघे काय उत्तर देणार, याकडे लक्ष आहे. 

एखादी महिला सामाजिक काम करते, एखाद्या विषयावर आवाज उठवते तिला ट्रोल करायचं ,तिची आणि त्यांची कधी भेट ही झालेली नसते तरी तिच्या विषयी माहीत नसलेल्या खोट्या गोष्टी शेअर करून तिची बदनामी करायची, चारित्र्यहनन करायचे. आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करायचा आणि या सगळ्यात आघाडीवर मराठा समाज आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मला हे कधी लिहायचं नव्हतं. कारण मराठ्यांची बदनामी होईल म्हणून, पण लिहावं लागतंय, कारण छत्रपतींची शिकवण मराठा विसरायला लागलेत आणि आपल्याच आई बहिणीला शिव्या द्यायला लागलेत, अशी संतप्त भावना देसाई यांनी समाजमाध्यमावर मांडल्या आहेत. माझी एखादी गोष्ट पटली नाही तर तुम्ही नक्कीच विरोध केला पाहिजे. परंतु एखाद्या महिलेला इतका त्रास द्यायचा ,इतके बदनाम करायचे की तिने आत्महत्या केली पाहिजे. अशा रीतेने तिच्यावर बोललं जातं, अशी खंत देसाई यांनी बोलून दाखवली .

महाराज आज आपण पाहिजे होतात, आज नक्कीच एक लढवय्या स्त्री म्हणून माझा सन्मान नक्कीच आपण केला असतात आणि अशा तरुणांचे जे महिलांचा अपमान, चारित्र्यहनन करतात त्यांना तुमच्या पद्धतीने शिक्षा केली असती-असे भावनिक मत देसाई यांनी मांडले. त्यांच्या या भावनिक पोस्टवर सर्वांनीच विचार करायला हवा, एवढे मात्र खरे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख