जळगाव गाजविलेले इशू सिंधू नगरमध्ये `सिंघम` होणार का?

जळगाव गाजविलेले इशू सिंधू नगरमध्ये `सिंघम` होणार का?

नगर : जळगावचे अनभिषिक्त सम्राट सुरेश जैन यांना गजाआड करून जळगावचे सिंघम म्हणून ओळख असलेले इशू सिंधू आता नगरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आता कोणाकोणाच्या मुसक्या आवळणार, हे काळच ठरविणार आहे. नगर जिल्ह्यातील गुंडगिरी, वाळू तस्करी, राजकीय दबावगट पाहता त्यांना पुन्हा नगरचे `सिंघम` होण्याची संधी मात्र मिळू शकते.

ते ठरले जळगावचे सिंघम

जळगावचे `सिंघम` म्हणून इशू सिंधू यांची ओळख झाली होती. जळगावचे तत्कालिन महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण गोडम या अधिकाऱ्याने कोट्यवधींचा घरकुल घोटाळा उघडकीस आणला होता. पण सत्ताधाऱ्यांनी राजकीय दबावापोटी गेडाम यांची तडकाफडकी बदली केली होती. सिंधू यांनी एका महिन्यात संबंधित प्रकरणाचा छडा लावून जळगावच्या स्थानिक आमदाराला अटक करण्याचे धाडस दाखविले होते. भुसावळ येथील गुन्हेगारी संपविण्याचा धडाका त्यांनी लावला होता. भुसावळमधील भाऊंची दादागिरी मोडून काढणाऱ्या सिंधू यांनी जळगावमधील मोठमोठ्या दादांना गजाआड केले. तत्कालिन आमदार सुरेश जैन यांना गजाआड करणे इतकी सोपी गोष्ट नव्हती. परंतु सर्व शक्यता दूर सारत सिंधू यांनी जैन यांना तुरुंगात डांबले.

नगरचे हे ठरले `सिंघम`

यापूर्वी नगरमधील दादागिरीवर वचक ठेवण्यात यशस्वी ठरलेले व राजकीय नेत्यांना गडाआड करून सिंघम ठरलेले तत्कालिन अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी `नगरचे सिंघम` होण्याचा मान मिळविला. शहरात नगरचे सिंघम असेच फलक अनेकदा झळकले. सिनेस्टाईलने त्यांनी नगरच्या गुंडांना सळो की पळो करून सोडले होते. केडगावच्या भानुदास कोतकरला त्यांनी अटक करून नगरकरांचीच नव्हे, तर महाराष्ट्रात वाहवा मिळविली होती. अजूनही लोक त्यांचे व्याख्यान नगरमध्ये आवर्जन आयोजित करतात.

नगर परिसरातील वाळू तस्करांसाठी प्रसंगी बुलेटवरून अचानक कारवाई करण्यात माहीर असलेल्या उपविभागीय अधिकारी उज्जला गाडेकर यांचाही परिचय लेडी सिंघम म्हणून होत होता. वाळू तस्करांची त्या कर्दनकाळ ठरल्या होत्या. तसेच ब्रिटिश काळातील जमिनीचे हक्क दिले गेलेल्या कुटुंबातील वारसाहक्काचा वाद, जमिनीबाबतची वर्षानुवर्षे रखडलेली प्रकरणे त्यांनी लिलया मार्गी लावली होती. त्यामुळेच नगरच्या लेडी सिंघम म्हणून त्या परिचित झाल्या होत्या.

नगरमध्ये राजकीय आव्हान

नगरमधील राजकारणातील बड्या नेत्यांचे चोचले न पुरवू देण्याचे मोठे आव्हान सिंधू यांच्यापुढे असणार आहे. श्रीगोंदे, कर्जत, राहुरी, पारनेर आदी तालुक्यांतील वाळू तस्करीने बरबटलेली `सिस्टीम` उद्धवस्त करण्याचे काम मोठे आव्हान ठरणार आहे. एेन निवडणुकीच्या काळात ही नियुक्ती असल्याने निवडणुका सुरळीत करण्याबरोबरच राजकीय दबावाला बळी न पडता यापूर्वी जिल्ह्यातील तडीपार केलेल्या हजारो गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तडीपारीचे आदेश देवून त्याची अंमलबजावणी चोखपणे करण्याचे कसब लागणार आहे. साहजिकच नगरचे सिंघम बनण्याची संधी सिंधू यांनाही मिळू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com