Girish Mahajan to Decide Nashik Standing Committee Chairman
Girish Mahajan to Decide Nashik Standing Committee Chairman

'गिफ्ट सिटी'ला गेलेले गिरीश महाजन गणेश गितेंना सभापतीपदाचे 'गिफ्ट' देणार?

गिफ्ट सिटी' येथे सहलीला गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांशी 'वन टू वन' चर्चा केल्यानंतर सभापतीपदाचा उमेदवार मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन हे तिघे आज निश्‍चित करणार आहेत

नाशिक : महापालिका स्थायी समितीत भाजपकडे बहुमत असूनही फाटाफुटीच्या भीतीने नगरसेवकांना अहमदाबाद सहलीला पाठवावे लागले आहे. 'कोटीच्या उड्डाणां'ची उघड चर्चा, नगरसेवकांतील नाराजी या या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे तिघे मुंबईत निर्णय घेणार असल्याचे संकेत आहेत. प्रत्यक्षात मात्र यामध्ये गिरीश महाजनांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने हा निर्णय महाजनच घेणार असल्याचे कळते. त्यांचे निकटवर्तीय गणेश गिते यांना सभापतिपदाचे गिफ्ट मिळण्याची शक्‍यता आहे.

'गिफ्ट सिटी' येथे सहलीला गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांशी 'वन टू वन' चर्चा केल्यानंतर सभापतीपदाचा उमेदवार मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन हे तिघे आज निश्‍चित करणार आहेत. मात्र, गिरीश महाजन यांच्याशी संबंध ताणले गेल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमार्गे शिवसेनेत आलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या विरोधात रसद पुरविल्याने गिते यांचे पारडे जड आहे. त्यांची गेले काही महिने महाजनांशी विशेष जवळीक आहे. त्याचे रिटर्न गीफ्ट त्यांना मिळू शकते.

स्थायी समितीत मनसेचे एकमेव सदस्य असलेल्या माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने आतापर्यंत मनसेला गृहित धरलेल्या भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. बुधवारी भाजपकडून गणेश गिते व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समिना मेमन यांनी अर्ज नेल्याने आतापर्यंत तीन उमेदवार झाले आहेत. गुरुवारी दुपारी बारापर्यंत अर्जवाटप सुरू राहील. दुपारपर्यंत अर्ज दाखल केले जाणार आहेत. भाजपकडून एकमेव गणेश गिते यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांचा सभापतिपदासाठी भाजपकडून त्यांचा दावा निश्‍चित झाल्याचे मानले जात आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज घेतला गेलेला नाही.

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा तिढा उच्च न्यायालयात पोचला आहे. दुसरीकडे भाजपमध्ये सभापतिपदासाठी चुरस आहे. शुक्रवारी गुप्त पद्धतीने मतदान होऊन ११ मार्चला न्यायालयासमोर अहवाल सादर होईल. बंद पाकिटातील मतदानाची मोजणी न्यायालयासमोर होईल, त्यानंतर न्यायालय सभापती जाहीर करतील.

दुसरीकडे भाजपमध्ये सभापती पदावरून मतभेद निर्माण झाले आहेत. ठराविक उमेदवाराचेच नाव डोळ्यासमोर ठेवून अन्य सदस्यांना गृहित धरल्याने नाराजी निर्माण झाली. त्यापार्श्‍वभूमीवर गिरीश महाजन यांनी अहमदाबाद येथील हॉटेल गिफ्ट सिटी गाठून मंगळवारी इच्छुकांशी 'वन टू वन' चर्चा केली. काही सदस्यांनी पक्षात किती वर्षांपासून कार्यरत आहोत, याचे दाखले दिले, तर काही सदस्यांनी पक्षात ठराविक लोकच डोळ्यासमोर ठेवून कशी पदे दिली जातात, याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महाजन यांनी बुधवारी अहमदाबाद सोडले. सभापती पदासाठी गणेश गिते यांच्यासह स्वाती भामरे, प्रा. शरद मोरे व प्रा. वर्षा भालेराव यांनी इच्छा व्यक्त केली. आता भाजपचे वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com