युवक काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्यांना बळ देणार : सत्यजित तांबे - Will empower active youth congress workers : Satyajeet Tambe | Politics Marathi News - Sarkarnama

युवक काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्यांना बळ देणार : सत्यजित तांबे

सरकारनामा
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

"युवक कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत राज्यभरातील सक्रीय कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. मात्र सक्रीय कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका राहील. सर्वांना सोबत घेऊन संघटनात्मक वाटचाल करत पक्षाविषयीचा जिव्हाळा युवकांमध्ये वृद्धींगत करण्यावर भर राहील. त्यासाठीचा कार्यक्रम लवकर जाहीर केला जाईल.'' 
- सत्यजीत तांबे (युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष) 

 

नाशिक :  राज्य आणि केंद्रातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने युवकांमध्ये नैराश्‍याचे वातावरण आहे. या नैराश्‍यातून बाहेर काढून युवकांना आश्‍वासक बनवत त्यांना कॉंग्रेसच्या विचारधारेशी जोडण्यात येईल, असे युवक कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले. 

नागपूरमध्ये संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते . 

सत्यजीत तांबे  गेल्या पंधरा वर्षांपासून एन. एस. यु. आय., युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सक्रीय आहेत. आमदार विश्‍वजीत कदम यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कालावधीत त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते  भाचे आहेत .  आमदार डॉ. सुधीर तांबे व संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचे ते चिरंजीव आहेत . 

सत्यजीत यांनी दोनवेळी नगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी नगर शहर मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्याशी थेट संपर्क त्यांचा राहिला आहे. संघटनात्मक कामकाजातून त्यांनी राज्यभर मित्र जोडले आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये निकाल जाहीर झाला असला, तरीही सत्यजीत हे संगमनेरमध्ये असतानाही त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. 

नागरी विकास, अंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर विशेष अभ्यास असल्याने सत्यजीत यांच्याकडून युवक कॉंग्रेसच्या बळकटीकरणाविषयीच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्यजीत म्हणाले, की ज्येष्ठांचा आशिर्वाद आणि युवकांचा विश्‍वास यातून प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर संघटनात्मकदृष्ट्या मोठी जबाबदारी मिळाली असल्याने युवकांना एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. गट-तटाशिवाय युवक पक्षाशी जोडले जावे यावर भर राहील. आमदार विश्‍वजीत कदम यांनी संघटनात्मक मोठे काम उभे केले आहे. हे काम पुढे नेले जाईल. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख