`जायंट किलर' धानोरकर पत्नी आणि भावाला आमदारकीसाठी उभे करणार ?

खासदार बाळू धानोरकरपत्नी प्रतिभा किंवा भाऊ अनिल यांना किंवा दोघांनाही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
`जायंट किलर' धानोरकर पत्नी आणि भावाला आमदारकीसाठी उभे करणार ?

नागपूर : चार वेळा खासदार राहिलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना पराभूत करुन "जायंट किलर' ठरलेले आणि कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या विजयाने कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरलेला आहे. त्यामुळेच की काय वणी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून इच्छुकांची गर्दी वाढली असून तब्बल 17 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. पण बाळू धानोरकर मात्र पत्नी प्रतिभा किंवा भाऊ अनिल यांना किंवा दोघांनाही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

राज्यातून एकमेव खासदार असल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे धानोरकर यांचे वजन निश्‍चितच वाढले आहे. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील विधानसभेचे उमेदवार निश्‍चित करताना त्यांची भूमिका महत्वाचीच राहणार आहे. वरोऱ्यातून अनिल धानोरकर आणि वणीतून प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी ते निश्‍चितच पूर्ण जोर लावतील. वणीमध्ये स्वपक्षीयांकडून विरोध झाल्यास तेथे प्रतिभा यांच्याऐवजी माजी नगराध्यक्ष किरण देरकर यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. 

वणी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात आजपर्यंत महिला आमदार झालेली नाही. 1972 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दादा सीताराम नांदेकर यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या विमलताई देवराव गोहोकर लढल्या होत्या. केवळ 94 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यांनंतर एकही महिला उमेदवार येथून लढलेली नाही. पण यावेळी पक्षाकडून महीला उमेदवाराचा विचार होऊ शकतो, असे जाणकार सांगतात. 

वणी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांतून तसे चित्र दिसतेय. या मतदारसंघात वणी, मारेगाव आणि झरी जामनी या तिन तालुक्‍यांचा समावेश आहे. झरी जामनी आदिवासीबहुल तालुका आहे. तरीही येथील उमेदवाराला प्राधान्य दिल्याचे आजवर झालेल्या निवडणुकांमधून दिसते. 

1962 ते 2014 या कालावधीत 12 निवडणुका झाल्या. कॉंग्रेसने आठ वेळा विजय मिळविला, तर चार वेळा पराभव पचवलेला आहे. अपक्ष, कम्युनिस्ट, शिवसेना व भाजपने प्रत्येकी एक वेळा विजय मिळविला आहे. 2014 मध्ये मोदी लाटेनंतर कॉंग्रेसचे अस्तित्व संपल्याचे बोलले जात होते. पण लोकसभेच्या विजयाने कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे तब्बल 17 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये माजी आमदार वामनराव कासावर, नरेंद्र ठाकरे, ऍड. देवीदास काळे, अरुणा खंडाळकर, अनिल देरकर, टिकाराम कोंगरे, मोरेश्वर पावडे, प्रशांत गोहकार, पुरुषोत्तम आवारी, शालिनी रासेकर, राकेश खुराणा, विवेक मांडवकर, प्रमोद निकुरे, संजय खाडे, शेखर शिरभाते, डॅनी सॅन्ड्रावार, तुळशीदास बोनगीनवर यांचा समावेश आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com