काँग्रेसमधील संघर्ष गडकरींच्या पथ्यावर पडणार?

भाजपचे 'हेवी वेट' नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून कोणाला लढवायचे, असा मोठा प्रश्‍न सध्या कॉंग्रेसला भेडसावत आहे. कॉंग्रेसमधील गटबाजी विकोपाला गेली आहे. विजयापेक्षा फक्त आपल्या गटाला उमेदवारी मिळावी आणि पक्षावर आपलेच नियंत्रण राहावे, यासाठीच कॉंग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. ही बाब गडकरींना तूर्तास दिलासा देणारी आहे.
Nitin Gadkari - Vikas Thakre - Babanrao Taywade - Prafulla Gudhe - Vilas Muttemwar
Nitin Gadkari - Vikas Thakre - Babanrao Taywade - Prafulla Gudhe - Vilas Muttemwar

नागपूर : भाजपचे 'हेवी वेट' नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून कोणाला लढवायचे, असा मोठा प्रश्‍न सध्या कॉंग्रेसला भेडसावत आहे. कॉंग्रेसमधील गटबाजी विकोपाला गेली आहे. विजयापेक्षा फक्त आपल्या गटाला उमेदवारी मिळावी आणि पक्षावर आपलेच नियंत्रण राहावे, यासाठीच कॉंग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. ही बाब गडकरींना तूर्तास दिलासा देणारी आहे.

नागपूर एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. भाजपने राममंदिरासाठी सुरू केलेल्या कारसेवेने राजकीय चित्र बदलले. कॉंग्रेस सोडून भाजपात दाखल झालेल्या बनवारीलाल पुरोहित यांनी 1996 च्या निवडणुकीत सर्वप्रथम भाजपला विजय मिळवून दिला. मात्र, पुरोहित यांनी लवकरच भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसने नागपूर ताब्यात घेतले. 1998 ते 2009 पर्यंत सलग चारवेळा विलास मुत्तेमवार यांनी भाजपला पराभवाची धूळ चारली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन गडकरी लोकसभा लढण्याची घोषणा करीत शहराच्या आंतरमशागतीला सुरुवात केली.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केलेल्या विकास कामांमुळे गडकरींचे नाव तसेही घराघरात पोहचले होते. मुत्तेमवार यांचा दीर्घ कार्यकाळ आणि कार्यशैलीची गडकरींच्या कामाशी तुलना होऊ लागली. त्या बळावर 2014 मध्ये गडकरी तब्बल दोन लाख 84 हजाराच्या मताधिक्‍याने निवडून आले. पराभवाच्या जबर धक्‍क्‍याने कॉंग्रेस खचली आणि विधानसभा व नंतर महापालिकेत पार भूईसपाट झाली.

साडेचार वर्षांपासून गडकरींच्या विकास कामांचा झंझावात शहरात सुरू आहे. मुख्यमंत्री, सहा आमदार, महापालिका सोबतीला आहे. मात्र, नोटाबंदी, जीएसटी, सामाजिक ताणतणावाने केंद्र सरकारच्या विरोधात बऱ्यापैकी असंतोषाला जन्म दिला आहे. मुस्लिम, अनुसूचित जाती, हलबा समाजामध्ये अविश्‍वासाचे वातावरण आहे. थोडाफार ओबीसी समाजही नाराज आहे. गडकरींना याचा त्रास होऊ शकतो. मात्र, मुत्तेमवारांच्या विरोधात अर्धी कॉंग्रेस उघडपणे समोर आली आहे. गडकरींच्या विरोधात नव्या दमाचा उमेदवार देण्याची मागणी ते करीत आहेत.

याकरिता ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांचे नाव रेटले जात आहे. जात ही त्यांची जमेची बाजू. गुडधे अभ्यासू असले तरी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच मतदारसंघात गुडधे यांना पराभूत केले होते. दुसरीकडे शहराध्यक्षांसह अर्धी कॉंग्रेस मुत्तेमवारांकडे आहे. मी (मुत्तेमवार) नको असेन तर शहराध्यक्ष विकास ठाकरे किंवा बबनराव तायवाडे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. एकुणच कॉंग्रेसने कोणालाही उमेदवारी दिली तरी एकमत होणार नाही, असे चित्र कॉंग्रेसमध्ये आहे आणि सरकारविरोधी असंतोषाच्या वातावरणातही गडकरींना कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदी मदत करणारी ठरेल, असे सध्याचे चित्र आहे.

2014 चे मतविभाजन
नितीन गडकरी (भाजप) 5,87,767 (विजयी)
विलास मुत्तेमवार (कॉंग्रेस) 3,02, 919
मोहन गायकवाड (बसप) 96,433
अंजली दमानिया (आप) 69,081

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com