काँग्रेसला मनसेच्या इंजिनाची जोड पुण्यात मिळेल का?

भाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात कॉंग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यात वाट्याला असलेली ही एकमेव जागा कॉंग्रेसला निकराने लढावी लागणार आहे.
काँग्रेसला मनसेच्या इंजिनाची जोड पुण्यात मिळेल का?

खासदार, आमदार, शंभर नगरसेवक अशी 'गल्ली ते दिल्ली' शतप्रतिशत सत्ता असणाऱ्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा, ऐन चढावर 'मनसे'च्या इंजिनाची मिळालेली जोड आणि पारंपरिक मतदारांची साथ असणारी कॉंग्रेस अशी पुण्यातील लढत आहे. भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासारखा तगडा, कसलेला उमेदवार रिंगणात उतरवून कुस्ती मारायचीच संकल्प केलाय. तर, कॉंग्रेसने पुन्हा एकदा 'निष्ठावंत' कार्यकर्ता अशी ओळख असणाऱ्या माजी आमदार मोहन जोशी यांच्यावर आपली सारी पुंजी लावली आहे. त्यामुळे सुरवातीला एकतर्फी समजली जाणारी लढत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात लक्षवेधी बनली आहे.

भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जुनी असल्याने राज्यात मंत्री झाल्यानंतरही त्यांनी तयारी केली ती लोकसभेचीच. त्यामुळे पुण्यातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याला त्यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात भर दिला. या काळात झालेली कामे हाच त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू राहिला आहे. मेट्रोचे प्रत्यक्षात सुरू झालेले काम, पीएमआरडीएची स्थापना, विकास आराखड्यास राज्य सरकारची मिळालेली मान्यता, शिवाजीनगर ते हिंजवडी हा स्वतंत्र मेट्रो मार्ग, पुणे-मुंबई हायपर लूप, रिंगरोड, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास मिळालेली मान्यता या बापट यांच्या जमेच्या बाजू सांगितल्या जातात.

दुसरीकडे कॉंग्रेसने पुण्यात भाजपच्या हाती सर्व सत्तासूत्र असतानाही त्यांना शहरातील प्रश्‍न सोडविण्यात अपयश आल्याचा मुद्दा लावून धरलेला आहे. जोशी यांनी थेट बापट यांच्यावर व्यक्तिगत आरोप करीत ही निवडणूक कॉंग्रेस अधिक गांभीर्याने लढवत असल्याचे दाखवून दिले. पुण्यात राष्ट्रवादीची ताकदही चांगली आहे. बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला कॉंग्रेसची गरज असल्याने पुण्यात राष्ट्रवादी जोशी यांचा प्रामाणिक प्रचार करीत आहे. सध्या राज ठाकरे यांच्या सभांनी धमाल उडवली आहे. पुण्यात सिंहगड रस्त्यावर राज यांची सभा होत आहे. 'मनसे'चे पुण्यात सुमारे लाखभर मतदार आहेत, त्याचा लाभ कॉंग्रेसला होण्याची आशा आहे. यंदाची लढत बापट-जोशी अशी थेट असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्‍यता नाही.

भाजपची पुण्यात ताकद असली, तरीही त्यांनी प्रचारात शिवसेनेला सोबत घेऊन योग्य समन्वय ठेवला आहे. पक्षाची स्वतःची पन्ना प्रमुखांची यंत्रणा संपूर्ण शहरात आहे. बापट अनेक वर्षे पुण्याचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांना पुणेकरांची नाडी माहिती आहे. त्यामुळे त्यांची प्रचारयंत्रणाही शिस्तबद्ध काम करताना दिसते. आतापर्यंत पुण्यातील लोकसभेचा निकाल हा एकूण देशात वातावरण काय आहे, याचा अंदाज घेतच लागलेला दिसतो. त्यामुळे पुणेकरांचा यंदाचा कौल कोणासोबत असणार, याबाबत उत्सुकता आहे.

उमेदवारांची बलस्थाने
गिरीश बापट
- पालकमंत्री म्हणून मार्गी लावलेले प्रकल्प
- पक्षाची मजबूत प्रचार यंत्रणा
- मतदारसंघामध्ये चांगला जनसंपर्क

मोहन जोशी
- राष्ट्रवादी, मनसेची साथ
- निष्ठावंत कार्यकर्ता अशी प्रतिमा
- विविध समाजघटकांशी एकरूप

मतदारसंघातील प्रश्‍न
- वाहतुकीची सतावणारी कोंडी
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुरवस्था
- पाणीपुरवठ्याच्या वितरणातील दोष
- झोपडपट्टी पुनर्वसनाचे रखडलेले प्रकल्प

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com