गद्दारी केल्यास माझ्या घरचे दरवाजे कायमस्वरूपी बंद : अजित पवार - will closed my doors to treaters : Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

गद्दारी केल्यास माझ्या घरचे दरवाजे कायमस्वरूपी बंद : अजित पवार

जनार्दन दांडगे
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसची उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय घेणे पक्षालाही अवघड जाणार आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापासूनच संबंधितांना योग्य तो इशारा दिला आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना घरचे दरवाजे बंद करणार असल्याच्या त्यांच्या इशाऱ्यानंतर बंडखोरी थांबेल का?

लोणी काळभोर : शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद या दोघांनीही कंबर कसली असली तरी, राष्ट्रवादीतर्फे दोघांपैकी एकालाच मिळणार आहे. उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार असुन, वरील दोघांसह उमेदवारीवरुन पक्षासी कोणीही गद्दारी अथवा गडबड करण्याचा प्रयत्न केल्यास संबधितास माझ्या घराचे दरवाजे कायमस्वरुपी बंद करण्यात येतील, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे दिला.

कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन मंजुर झालेल्या सुमारे दोन कोटी साठ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. 13) सायंकाळी झाले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलतांना अजित पवार यांनी वरील इशारा दिला.

अजित पवार पुढे म्हणाले, शिरूर- हवेलीच्या विद्यमान आमदाराच्या कार्यपद्धतीमुळे येथील आमदार राष्ट्रवादीचाच होणार याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र पक्षाच्या उमेदवारीसाठी अशोक पवार व प्रदीप कंद दोघेही तेवढेच इच्छुक असल्याने, उमेदवारी कोणाला द्यायची या निर्णय खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. या दोघांनाही संधी मिळावी यासाठी एकाने लोकसभा तर एकाने विधानसभा लढवावी असा प्रस्ताव दिला होता. मात्र दोघेही आमदारकी लढविण्यावर ठाम असल्याने, पक्षालाच याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. 

सत्ता स्थापनेसाठी एक एक जागा महत्वाची असल्याने, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षासी गद्दारी अथवा गडबड करण्याऱ्यांना कोणत्याही परीस्थीतीत माफ न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.शिरुर लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही गद्दारी अथवा गडबड करण्याऱ्यांना अजित पवार स्टाईलने कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक पवार होते. दरम्यान कुंजीरवाडीच्या सरपंच अनुराधा कुंजीर व माजी सरपंच संतोष कुंजीर यांनी मागिल तीन वर्षाच्या काळात ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांच्यासाठी दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मिळवल्याबद्दल अजित पवार यांनी भाषनात वरील दोघांचेही खास अभिनंदन केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख