Will BJP successful in attracting congress and NCP MLAs? | Sarkarnama

सत्ताधारी भाजपाच्या गळाला कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आमदार लागणार का? 

महेश पांचाळ : सरकारनामा न्युज ब्युरो 
सोमवार, 27 मार्च 2017

शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न: धनंजय मुंडे 
राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार या राजकीय पुड्या आहेत. फोडाफोडीचे वातावरण निर्माण करुन सत्तेत असलेल्या शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. 

एकही आमदार फुटणार नसल्याचा कॉंग्रेस राष्ट्रवादीचा दावा 
भाजपामध्ये येण्यास अनेक उत्सुक : रावसाहेब दानवे 

मुंबई:तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना, अशी स्थिती शिवसेनेलासोबत घेवून राज्यात सत्ता चालविणाऱ्या भाजपा सरकारची झाली असून, अलिकडील शिवसेनेच्या विरोधी कारनाम्यामुळे राज्य सरकार स्थिर करण्यासाठी इच्छुक कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना पक्षात घेण्याबाबत भाजपा सकारात्मक असल्याचे भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. चक्क विरोधकांना पक्षात घेण्याची राजकीय पुडी आहे की येणाऱ्या काळात फोडाफोडीच्या राजकारणाला उत येणार आहे, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. यासंदर्भात भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते पदाधिकाऱ्यांना काय वाटते हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न. 

राज्यात सरकार स्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न : रावसाहेब दानवे 
सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपाकडून सर्व शक्‍यता पडताळून पाहिल्या जात आहे. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथे भाजपाला मिळालेले यश तसेच नुकत्याच झालेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर वन स्थितीत असल्याने अन्य पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपात येण्यास उत्सुक आहेत. राज्यातील सरकार स्थिर असावे आणि पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जे कोणी इच्छुक आहेत, त्याबाबतीत पक्षाच्या पातळीवर सामुहिक विचार करुन निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 

भीतीपोटी बातम्या पसरविल्या जात आहे: सुनील तटकरे 
यंदाचा अर्थसंकल्प मांडताना सत्ताधारी भाजपाला संख्याबळ असतानाही भीती निर्माण झाली होती. या भीतीपोटी कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, अशा बातम्या जाणीवपुर्वक पसरविल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. आम्ही एकसंघ आहोत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. 

शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न: धनंजय मुंडे 
राष्ट्रवादीचे आमदार भाजपात जाणार या राजकीय पुड्या आहेत. फोडाफोडीचे वातावरण निर्माण करुन सत्तेत असलेल्या शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. 

जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपाकडून : रत्नाकर महाजन 
उचलली जीभ लावली टाळ्याला अशी भाजपाची रित आहे. मध्यावधी निवडणुका झाल्या तर 200 आमदार निवडून येतील असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या नेत्यांना हवा कशी निर्माण करायची याची कला अवगत आहे. जणू काही राजकारण आपल्यासाठी मोकळे आहे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. 
पक्षांतर्गत बंदी कायदा असताना गोव्यामध्ये मनोहर पर्रिकर यांनी एक फॉर्म्युला पुढे आणला. विरोधी पक्षाच्या आमदाराला पक्षात आणून मंत्री करायचे आणि नंतर आमदार म्हणून निवडून आणायचे. हाच पर्रिकरांचा फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरण्याचा भाजपा प्रयत्न करणार आहे का? इतर राजकीय पक्षांचे आमदार आणि नेते आपल्या संपर्कात आहे असे सांगून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपाकडून केले जात असून कॉंग्रेसचा कोणीही आमदार भाजपाच्या संपर्कात नाही, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख