Will BJP prefer to play on front foot or back foot ? | Sarkarnama

भाजप सोमवारी  फ्रंट फूटवर खेळणार की बॅक फूटवर ? 

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असे आज रात्रीच जाहीर केले तर शिवसेनेला भाजपशी हातमिळवणीशिवाय अन्य पर्याय राहणार नाही .

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेचा निमंत्रण आज सायंकाळी दिले आहे. सत्ता स्थापन करण्याचे राज्यपालांचे निमंत्रण स्वीकारायचे की सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवायची या संदर्भात निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक उद्या दुपारी होणार आहे.

या बैठकीत भाजपा काय निर्णय घेणार याकडे राज्यातील जनतेचेच नव्हे तर शिवसेना तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लक्ष लागून राहिले आहे.

सत्ता स्थापण्यासाठी भाजपाकडे सध्या आवश्‍यक संख्याबळ नाही. शिवसेनेची मनधरणी करणे. त्यासाठी त्यांच्या अटी मान्य करणे किंवा राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसशी जवळीक साधता येते का पाहणे या पलिकडे कोणताही अन्य पर्याय भाजपाकडे नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली भूमिका पाहता शिवसेनेशी पुन्हा सलोखा होणे सध्यातरी अवघड आहे. 

काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणार नाही असे आज रात्रीच जाहीर केले तर शिवसेनेला भाजपशी हातमिळवणीशिवाय अन्य पर्याय राहणार नाही . पण काँग्रेस नेते मुरब्बी असून ते शिवसेना आणि भाजपचे पूर्ण फाटल्याशिवाय आपले कार्ड ओपन करणार  नाही .  त्यासाठीच कॉंग्रेसने आपले आमदार थेट जयपूरला नेऊन ठेवले आहेत. 

राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसात घेतलेली भूमिका पाहता राष्ट्रवादीजवळ जाणेही भाजपसाठी  अवघड आहे. विधानसभा निवडणुकीतच्या काळात भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट केले. नेते फोडले . ईडीचा  बडगा उगारला . त्यामुळे आता या दोन पक्षांच्या नेत्यातून विस्तवही जात नाही असे चित्र आहे . 

त्यामुळे भाजपासमोर मोठे आव्हान असून उद्याच्या बैठकीत प्रामुख्याने यावरच चर्चा होण्याची शक्‍यता आहे.रात्रीतून शिवसेनेची मनधरणी यशस्वी  झाली तर भाजपा सत्ता स्थापनेबाबत विचार करू शकते. अन्यथा सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दर्शविण्याखेरीज भाजपाकडे अन्य मार्ग दिसत नाही.

दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर बोलणी करायची झाल्यास कोण बोलणार याबाबत भाजपात संभ्रमाचे वातावरण आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्याकडून कुणीही शिवसेनेबरोर बोलण्याची शक्‍यता नाही. बोलायचे झाले तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा थेट गृहमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुढाकार घेतला तर ऐनवेळी काही मार्ग निघू शकतो.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख