सरदार तारासिंहांच्या अनुपस्थितीत मुलुंडचा गड मिहिर कोटेचा राखणार?

चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या तारासिंह यांना किंवा त्यांच्या मुलाला पक्षाकडून तिकिट मिळेल अशी शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु निवडणुकीच्या ऐन तोंडावर पंजाब महाराष्ट्र सहकारी बॅकेमधील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण खुले झाले आणि समीकरणे बदलली. पीएमसी बॅकेच्या कथित गैरव्यवहाराबाबत माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही खातेदारांसाठी मोहीम उघडली आहे. तारासिंह यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलाचा जनसंपर्क दांडगा आहे आणि मतदारांमध्ये ओळखीचा चेहरा आहे. मात्र तरीही पक्षश्रेष्ठींनी कोटेचा यांना तिकिट दिल्यामुळे विरोधी उमेदवारांना पीएमसी बॅंकेच्या मुद्यावर आक्षेप घेता येणार नाही, असे गणित त्यामागे असल्याचे बोलले जाते.
Sardar Tarasingh - Mihir Kotecha
Sardar Tarasingh - Mihir Kotecha

भाजपच्या सुरक्षित मतदारसंघामधील एक समजला जाणारा मतदार संघ म्हणजे मुंबईचे इशान्येचे प्रवेशद्वार मुलुंड. मराठी आणि गुजराती भाषिक मतदारांचे वर्चस्व मतदारसंघामध्ये नेहमीच राहिले आहे. सलग चार वेळा भाजपचे सरदार तारासिंह आमदार म्हणून निवडून येणे आणि नुकत्याच झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत सहाही जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी होणे हे याचे उत्तम उदाहरण आहे. मुलुंडच्या मतदारांनी नेहमीच भाजपला कौल दिलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीतही भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांचे पारडे जड आहे, अगदी यंदा तारासिंह नसले तरीही.

खरे तर चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या तारासिंह यांना किंवा त्यांच्या मुलाला पक्षाकडून तिकिट मिळेल अशी शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु निवडणुकीच्या ऐन तोंडावर पंजाब महाराष्ट्र सहकारी बॅकेमधील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण खुले झाले आणि समीकरणे बदलली. पीएमसी बॅकेच्या कथित गैरव्यवहाराबाबत माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही खातेदारांसाठी मोहीम उघडली आहे. तारासिंह यांच्याप्रमाणेच त्यांच्या मुलाचा जनसंपर्क दांडगा आहे आणि मतदारांमध्ये ओळखीचा चेहरा आहे. मात्र तरीही पक्षश्रेष्ठींनी कोटेचा यांना तिकिट दिल्यामुळे विरोधी उमेदवारांना पीएमसी बॅंकेच्या मुद्यावर आक्षेप घेता येणार नाही, असे गणित त्यामागे असल्याचे बोलले जाते. 

भाजपचे सहा नगरसेवक एखाद्या विधानसभा मतदारसंघात असण्याचा आणखी एक मान मुलुंड विधानसभा मतदारसंघाला आहे. मात्र या नगरसेवकांपैकी काही आमदारकीच्या तिकिटासाठी उत्सुक होते, असे सांगितले जात होते. सहापैकी प्रभाकर शिंदे यांच्यासह प्रकाश गंगाधरे, समिता कांबळे यांनी आपापल्या प्रभागात प्रभावी कामेही केलेली आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नीलदेखील नगरसेवक आहेत. तरीही यापूर्वी कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात वडाळा-नायगावमधून निवडणुक लढविणाऱ्या मिहिर कोटेचा यांना मुलुंडमधून यंदा संधी देण्यात आली आहे. कोळंबकर यांच्याविरोधात कोटेचा यांनी कडवी झुंज दिली होती. पण थोडक्‍या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आता कोळंबकरही भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे कोटेचा यांना मुलुंड मधून उमेदवारी देऊन पक्षाने त्यांच्यावर एकप्रकारे विश्‍वासच दाखवला आहे.

मुलुंडमधील भाषिक मतदारांमध्ये मराठी आणि गुजराती टक्का नेहमीच महत्वपूर्ण ठरला आहे. गुजराती समाजाचा बहुतांश कल भाजपकडेच असतो. मराठी मतदारांमध्ये नेहमी भाजप-शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेस अशी विभागणी होत असते. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार सत्यवान दळवी दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र सन २०१४ मध्ये सर्वच प्रमुख पक्ष स्वंतत्रपणे लढले. त्यातही भाजपने मुंसडी मारली होती. त्याखाली कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसे असा क्रम होता. मात्र भाजप आणि कॉंग्रेसच्या मतांमध्ये सत्तर हजारांचा फरक होता. त्यामुळे यंदाची निवडणुक खरे तर भाजपची भाजपबरोबरच असेल. कारण मागील मतांचा आकडा पार करुन अधिक मोठ्या मताधिक्‍याने विजयी होण्याचे लक्ष्य भाजपकडे असेल. शिवसेनेशी युती झाल्याने ते गाठणे फारसे कठीण नाही. नवमतदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खूश आहे, त्यामुळे त्याचाही लाभ यंदा भाजपला मुलुंडमध्ये होऊ शकतो.

मनसेच्या हर्षदा चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे, त्यांचा किती प्रभाव पडतो हे पहावे लागेल. तर भाजपने गुजराती कार्ड खेळण्यावर कॉंग्रेसने उत्तर भारतीय हुकमी एक्का पुढे काढला आहे. पक्षाने ज्येष्ठ निष्ठावान कार्यकर्ते व प्रख्यात उद्योगपती गोविंद सिंह यांना उमेदवारी दिली. उत्तर भारतीय मतदारांशी चांगला संपर्क असलेल्या गोविंद सिंह यांनी अनेक नागरिकांना मदत केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडीचे मतदारही येथे आहेत. मात्र ते युतीची मते घेतील असे वाटत नाही. कॉग्रेस-राष्ट्रवादीला मात्र वंचितचा फटका बसू शकतो. भाजपचा सुरक्षित मतदारसंघ असलेल्या मुलुंड विधानसभा भाजपसाठी यंदाही सुरक्षित ठरण्याची शक्‍यता आहे.

सन २०१४ ची मते
भाजप - सरदार तारासिंह - ९३,८५०
कॉंग्रेस - चरणसिंह सप्रा - २८,५४३
शिवसेना - प्रभाकर शिंदे - २६,२५९
मनसे - सत्यवान दळवी - १३,४३२
राष्ट्रवादी - नंदकुमार वैती - ४,८८०
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com