भाजपचा भाषिक समतोल कायद्याच्या कचाट्यात? 

भाजपने मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद प्रभाकर शिंदे आणि गटनेतेपद विनोद मिश्रा यांना देण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र दिले आहे; परंतु भाजपचा हा भाषिक समतोल अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.
 will bjp lingual balance in mumbai legally challenged 
will bjp lingual balance in mumbai legally challenged 

मुंबई : भाजपने मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद प्रभाकर शिंदे आणि गटनेतेपद विनोद मिश्रा यांना देण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र दिले आहे; परंतु भाजपचा हा भाषिक समतोल अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

विरोधी पक्षनेताच त्या पक्षाचाही नेता असतो; त्यामुळे आतापर्यंत दोन व्यक्तींची निवड झालेली नाही. त्याचबरोबर सध्या विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे असल्याने तांत्रिक अडचण येणार आहे. दरम्यान, यासंदर्भात वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ, असा इशारा भाजपने दिला आहे.

मुंबई महापालिकेत 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या काळात भाजप हा शिवसेनेचा मित्रपक्ष होता. 2014 मध्ये केंद्रात सत्ता येताच भाजपने मुंबईत हातपाय पसरायला सुरुवात केली. शिवसेना व भाजप यांनी 2017 मधील महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे 85 आणि भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर महापौरांच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. भाजप पहारेकऱ्याची भूमिका बजावेल; विरोधी पक्षात बसणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडे आले. या पदावर रवी राजा यांची नियुक्ती झाली. 

आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने विधानसभेत भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बाजूला बसणारा भाजप आता विरोधी बाकांवर आहे. त्याबाबत गुरुवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, सरचिटणीस सुनील कर्जतकर, आमदार सुनील राणे, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्या उपस्थितीत बैठक झाली. 

या बैठकीत गटनेतेपदासाठी विनोद मिश्रा आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाकर शिंदे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. उपनेतेपदी उज्ज्वला मोडक व रिटा मकवाना यांची नावे जाहीर करण्यात आली असून, तसे पत्र महापौरांना देण्यात आले आहे. सभागृहात घोषणा झाल्यानंतर ही नियुक्ती अधिकृत मानली जाते.

वेळ पडल्यास न्यायालयात : प्रवीण दरेकर
फक्त पहारेकऱ्याच्या भूमिकेत राहून चालणार नसून, भाजप आता खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाच्या "मोड'मध्ये गेला आहे. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महापालिका सभागृहात व रस्त्यावर आवाज उठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी अनेक वर्षे नगरसेवक असलेले प्रभाकर शिंदे यांना विरोधी पक्षनेतेपदाची जबादारी देण्यात आली आहे. ते या पदाला न्याय देतील, असे प्रवीण दरेकर म्हणाले. विरोधी पक्षनेतेपद सांविधानिक पद आहे. सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्यालाच हे पद द्यावे लागते. हा आमचा नैसर्गिक हक्क आहे. न्यायालयीन प्रक्रियेत कायद्यात असेल त्याप्रमाणे होईल, असे सांगत दरेकर यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

भाजपचे पत्र आले आहे; मात्र अजून ते वाचले नाही. याबाबत कायदेशीर बाबी तपासल्या जातील. त्यानंतर सचिव विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. 
- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महापालिका. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com