भाजप गडचिरोली व अकोल्याचा उमेदवार बदलणार?

विदर्भातील दहा जागा जिंकणारी भाजप यंदा गडचिरोली व अकोल्याचा उमेदवार बदलण्याच्या विचारात आहे. येथील खासदारांबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा अहवाल पक्षाला प्राप्त झाला असून, पर्यायी उमेदवार शोधण्यात येत असल्याचे समजते.
भाजप गडचिरोली व अकोल्याचा उमेदवार बदलणार?

नागपूर :  विदर्भातील दहा जागा जिंकणारी भाजप यंदा गडचिरोली व अकोल्याचा उमेदवार बदलण्याच्या विचारात आहे. येथील खासदारांबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा अहवाल पक्षाला प्राप्त झाला असून, पर्यायी उमेदवार शोधण्यात येत असल्याचे समजते.

गडचिरोलीचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास भाजप पराभूत होण्याचा धोका आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचाही नेते यांना विरोध आहे. त्यामुळे आमदार देवराव होळी यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्याही नावावर चर्चा केली जात आहे. माजी मंत्री राहिलेले आत्राम सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असले तरी अडगळीतच आहेत. आघाडीच्या काळात मंत्रिपद काढून घेतल्याने तसेही ते पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे लोकसभेची ऑफर दिल्यास ते सहज भाजपात येऊ शकतात. त्यामुळे गडचिरोलीत होळी किंवा आत्राम यांच्यापैकी एक नाव पक्के असल्याचे समजते.

गडचिरोलीप्रमाणे अकोला मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. खासदार संजय धोत्रे निवडून येत असले तरी त्यांच्याविषयी मतदारांमध्ये नाराजी आहे. मात्र, येथे भाजपकडे सक्षम उमेदवार नाही. राज्यमंत्री रणजित पाटील यांचे नाव मध्यंतरी पुढे आले होते. त्यानंतर सुरेश हावरे पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी येथून लढण्याची घोषणा केली आहे. जातीय समीकरण लक्षात घेता धोत्रे यांचे नशीब पुन्हा फळफळू शकते. सध्या भाजपचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.

भंडाऱ्यात मेंढे किंवा फुके
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपला भंडारा-गोंदिया मतदारसंघ गमवावा लागला. तो परत आपल्याकडे खेचून आणण्यासाठी सुनील मेंढे किंवा आमदार परिणय फुके यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाणार आहे.

वर्ध्यात तडसच
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांना नारळ देणार असल्याची जोरदार चर्चा होती. भाजपमधून अनेकांनी सागर मेघे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. तसा शब्दही त्यांना दिला होता. मात्र, वर्धा येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडींमुळे आता मेघे यांनी लढण्यास नकार दिला आहे. याशिवाय तडस यांना उमेदवारी नाकारल्यास तेली समाजाची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. याचा परिणाम इतरही मतदारसंघावर पडण्याची शक्‍यता असल्याने तडस यांना कायम ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com