आमदार भारत भालकेंना सुशीलकुमार शिंदेची नाराजी भोवणार?

लोकसभा निवडणुकीपासून आमदार भारत भालके आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्यामध्ये राजकीय अंतर वाढले आहे. त्यातच आमदार भालकेंनी काँग्रेसला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तर काँग्रेस नेत्यांबरोबरच पदाधिकारी ही नाराज झाले आहेत. शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे ही आमदार भालकेंच्या कार्यपध्दतीविषयी व पक्षांतरामुळे कमालीचे नाराज झाले आहेत. शिंदेच्या नाराजीचा आमदार भालकेंना विधानसभा निवडणुकीत कितपत फटका बसतोय, याकडेही आता लक्ष लागले आहे.
Bharat Bhalke - Sushilkumar Shinde
Bharat Bhalke - Sushilkumar Shinde

पंढरपूर : लोकसभा निवडणुकीपासून आमदार भारत भालके आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्यामध्ये राजकीय अंतर वाढले आहे. त्यातच आमदार भालकेंनी काँग्रेसला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तर काँग्रेस नेत्यांबरोबरच पदाधिकारी ही नाराज झाले आहेत. शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे ही आमदार भालकेंच्या कार्यपध्दतीविषयी व पक्षांतरामुळे कमालीचे नाराज झाले आहेत. शिंदेच्या नाराजीचा आमदार भालकेंना विधानसभा निवडणुकीत कितपत फटका बसतोय, याकडेही आता लक्ष लागले आहे.

20014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिलकुमार शिंदेंना पंढरपूर-मंगळवेढ्यातून अपेक्षित मतदान झाले नव्हते. त्यामुळे शिंदे हे गेल्या पाच वर्षापासूनच येथील आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर नाराज होते. पाच वर्षानंतर पुन्हा सुशिलकुमार शिंदे निवडणुकीला सामोरे गेले. परंतु या निवडणुकीत ही भाजपचे  डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यामुळे शिंदे हे कमालीचे नाराज झाले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीत आमदार भारत भालकेंनी पंढरपुरातील शिंदेच्या पदयात्रेला दांडी मारली होती. त्यावेळीही भालकें विषयी शिंदेच्या मनात साशंकता निर्माण झाली होती. 

परंतु शिंदे यांनी आमदार भालकेंची समजूत काढून कामाला लावले होते. परंतु  काँग्रेसचा आमदार असतानाही अपेक्षित मतदान न झाल्याने शिंदे भालकेवर नाराज असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. लोकसभा निवडणुकी नंतर आमदार भालकेंनी सुशिलकुमार शिंदेवर अनेक वेळा अप्रत्यक्ष टिका देखील केली आहे. मंगळवेढा येथे झालेल्या मेळाव्यात भालकेंनी ''पक्षाचे  तिकीट कोणालाही मिळते, परंतु निवडून येण्याची क्षमता लागते'' असा अप्रत्यक्ष टोलाही सुशिलकुमार शिंदेना लगावला होता. आमदार भालके हे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते. परंतु, परिचारकांच्या तीव्र विरोधामुळे भालकेंना भाजपत प्रवेश मिळाला नाही. काँग्रसचे  नेते ही  नाराज असल्याने ऐनवळी आमदार भालकेंनी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.

काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते आमदार भालकेंवर कमालीचे नाराज झाले आहेत.  त्यातूनच जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष शिवाजी काळुंगे यांनी आमदार भालकेंना थेट आव्हान देत काँग्रेसची उमेदवारी पदरात पाडून घेतली. उमेदवारी मागे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून खूप प्रयत्न  झाले  परंतु,  उमेदवारी कायम ठेवण्यात काळुंगे यांना  यश आले. त्यांची उमेदवारी कायम राहिल्याने  वरिष्ठ नेत्यांचाच काळुंगे यांना  आशिर्वाद असल्याचे गुपीत ही आता उघड झाले आहे.

सुशिलकुमार शिंदेंना राजकीय शह देण्यासाठी आमदार भालकेंनीही  आमदार प्रणिती शिंदेच्या शहर मध्य मतदार संघात राष्ट्रवादीकडून जुबेर बागवान यांची उमेदवारी दाखल केल्याची चर्चा होती. परंतु, शिंदे यांनी बागवान यांची समजूत काढून उमेदवारी मागे घेण्यात यश मिळवले. या प्रकरणामुळेही शिंदे -भालके यांच्यात उघड राजकारण झाल्याचे पाहायला मिळाले. 

शिवाजी काळुंगे हे सुशिलकुमार शिंदेचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या पंढरपूर मंगळवेढा येथील समर्थक कार्यकर्त्यांची शक्ती काळुंगेच्या मागे उभी केली जाण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तवली जात आहे.आधीच आडचणीत असलेल्या भालकेंचा  सुशिलकुमार शिंदेच्या नाराजीमुळे आणखी पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी  सुशिलकुमार शिंदेच्या नाराजीचा आमदार भालकेंना कितपत फटका बसणार  हे निवडणुक निकालानंतरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com