Will Aditya Thakrey Contest Assembly Election From Rural Constituency | Sarkarnama

आदित्य ठाकरे ग्रामीण भागातून निवडणूक लढविणार?

दीपा कदम
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवायची झाल्यास कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज , उत्तर महाराष्ट्रातील जळगाव ग्रामीण किंवा मालेगाव बाह्य (नाशिक) हे मतदारसंघ सुरक्षित असल्याचे आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघाची निवड करणाऱ्या टिमचे निष्कर्ष आहेत. मुंबईतील वरळी, शिवडी आणि वांद्रे हे तिन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल असणारे आहेत. स्थानिक शिवसैनिकांकडून तर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात आहे.

मुंबई : शिवसेनेचा शहरी चेहरा बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असून ग्रामीण भागातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढविल्यास त्यांना कसा प्रतिसाद मिळू शकतो याची चाचपणी केली जात आहे. आदित्य ठाकरेंचे संसदीय व्यवस्थेतील पदार्पण सुरक्षित मतदारसंघाबरोबरच शिवसेनेला शहरी चेहरा देण्याच्या पलिकडे व्यापक असावे यासाठी आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवावी, यासाठी मतदारसंघाची पाहणी करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढवायची झाल्यास कोल्हापूर, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज , उत्तर महाराष्ट्रातील जळगाव ग्रामीण किंवा मालेगाव बाह्य (नाशिक) हे मतदारसंघ सुरक्षित असल्याचे आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघाची निवड करणाऱ्या टिमचे निष्कर्ष आहेत. मुंबईतील वरळी, शिवडी आणि वांद्रे हे तिन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी अनुकूल असणारे आहेत. स्थानिक शिवसैनिकांकडून तर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात आहे. आदित्य ठाकरेंसाठी शहरातील हे सुरक्षित मतदारसंघ जरी असले तरी राज्याचे नेतृत्व करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागातून निवडणूक लढविल्यास त्याचे वेगळे मोल असेल, असा निष्कर्ष आदित्य ठाकरेंसाठी काम करत असलेल्या विशेष टिमने काढला आहे.

राज्याचे नेतृत्व करण्यासाठी मुंबई बाहेर पडून ग्रामीण भागाशिवाय नाळ जोडल्याशिवाय गत्यंतर नसल्यानेच आदित्य ठाकरे ग्रामीण भागाचे दौरे करत आहेत. यानिमित्ताने आदित्य ठाकरेंसाठी ग्रामीण भागातून निवडणूक लढविल्यास कोणते मतदारसंघ योग्य ठरू शकतात याची पाहणी करण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये नुकत्याच आलेल्या महापूरामध्ये शिवसेनेने पक्ष म्हणून मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी काम केले. महाराष्ट्राच्या राजकारणात झेंडा रोवण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षविस्तार करण्याची आवश्‍यकता शिवसेनेला वाटते आहे. 

2014 च्या निवडणूकीतही शिवसेनेचे 6 आमदार कोल्हापूरमधून निवडून आल्याने कोल्हापूर आदित्य ठाकरेंसाठी अधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जात आहे. विदर्भात मोदी लाटेमध्ये देखील शिवसेनेच्या दोन जागा निवडून आल्या होत्या. त्यामध्ये यवतमाळमधील दिग्रज मतदारसंघातून शिवसेनेचे संजय राठोड हे विधानसभेवर निवडून गेले होते. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. भविष्यात भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी विदर्भामध्ये पाय घट्‌ट रोवण्यासाठी आदित्य ठाकरेंसाठी दिग्रज मतदारसंघ महत्त्वाचा मानला जात आहे. 

जळगाव (ग्रामीण) मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील सलग 3 वेळा निवडून आल्याने हा मतदारसंघही अधिक सुरक्षित मानला जात आहे. 2014 च्या निवडणूकीत मालेगाव (बाह्य) या मतदारसंघातून शिवसेनेचे दादा भुसे यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करताना जवळपास दुप्पट मते मिळवली होती. या मतदारसंघातून सलग तीन वेळा भुसे निवडून आले असल्याने शिवसेनेसाठी हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जात आहे.

हे देखिल वाचा -

सुप्रिया सुळेंना त्रास देणाऱ्या टॅक्सी दलालाविरुद्ध रेल्वे मंत्रालय करणार कारवाई

शिवसेनेचा लांडगेंच्या मतदारसंघावर दावा; भाजप इच्छुकांचीही मोर्चेबांधणी
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख