कार्यकर्त्यांची मुलांप्रमाणे काळजी घेणाऱ्या वहिनीसाहेब ! - wife of sanjay dhotre | Politics Marathi News - Sarkarnama

कार्यकर्त्यांची मुलांप्रमाणे काळजी घेणाऱ्या वहिनीसाहेब !

श्रीकांत पाचकवडे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

गेल्या 35 वर्षांच्या सामाजीक, राजकीय जीवनात खासदार संजय धोत्रे यांनी आजपर्यंत निष्ठावंत कार्यकर्ते जोडण्याचे काम केले. त्यांच्या या कार्यात कधी उघडपणे तर कधी पडद्यामागे राहून सुहासिनीताईंची भक्कम साथ मिळाली. त्यामुळेच कार्यकर्त्यांना आपल्या मुलांप्रमाणे जीव लावणाऱ्या वहिनीसाहेब म्हणून त्यांची राजकीय पटलावर ओळख निर्माण झाली आहे. 
 

अकोला : आपल्या नेत्यासाठी दिवस-रात्र झटणारा कार्यकर्ता हीच राजकीय पुढाऱ्यांची खरी ताकद असते. अशा कार्यकर्त्यांची काळजी आपल्या मुलांप्रमाणे घेत त्यांच्या सुख-दुखाःत मायेची फुंकर घालण्याचे काम भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांच्या सौभाग्यवती सुहासिनीताई धोत्रे अविरतपणे करीत आहेत. राजकारणात उंची वाढली की कार्यकर्त्यांचा गोतावळाही वाढतो. हाच गोतावळा सांभाळत त्यांची काळजी घेतली जात असल्याने सुहासिनीताई कार्यकर्त्यांसाठी वहिनीसाहेब बनल्या आहेत. 

राजकारणांमध्ये यशाची उत्तंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या नेत्याचे नाव होते. मात्र या नेत्यांना मोठे करणारे जे अनेक घटक असतात, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्यांची सौभाग्यवती. खासदार संजय धोत्रे यांच्या सुविद्य पत्नी सुहासिनीताई धोत्रे यांची राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आजवरची कारकीर्द अशाच पद्धतीने घडली आहे. दर्यापूर तालुक्‍यातील जैनपुर येथील सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते भालचंद्र उर्फ बाप्पूसाहेब कोरपे यांची कन्या असलेल्या सुहासिनीताईंचा संजय धोत्रे यांच्याशी 1983 मध्ये विवाह झाला. आमदार असलेले वडील श्‍यामरावजी धोत्रे यांचा सहकार व राजकारणाचा वारसा संजय धोत्रे पुढे नेत होते. हे करीत असताना यशस्वी उद्योजक म्हणुनही त्यांची वाटचाल सुरू होती. 

पतीच्या व्यस्त सामाजिक, राजकीय जीवनात त्यांच्या कामात सहभागी होत कार्यकर्ते सांभाळण्याची जबाबदारी आपसुकच सुहासिनीताईंवर आली. संजय धोत्रे 1999 मध्ये मुर्तिजापूर विधानसभेचे आमदार आणि सलग अकोल्याचे खासदार म्हणून विजयी झाल्यावर खासदार धोत्रे यांचा व्याप वाढत गेला. मंत्रालय, संसद भवनात वाढते दौरे, मतदार संघातील कार्यक्रमांचे अत्यंत व्यग्र असे वेळापत्रक झाले. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्ते सांभाळण्याचे काम अनेक वर्षांपासून सुहासिनीताई यशस्वीपणे करीत आहेत. दिवसभर घरी येणाऱ्या नागरिक, कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवित त्यांना चहा-पाणी, नास्ता देत त्यांचा योग्य पाहुणचार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

कार्यकर्त्याच्या घरी मंगल कार्य निघाले तर त्याला आर्थिक मदत करण्यापासून ते प्रत्यक्ष कार्यात पुढे राहून कामे करण्यापर्यंत सुहासिनीताईंची नेहमीच धडपड सुरू असते. संजुभाऊ कधी कार्यकर्त्यांवर रागावले तर वहिनींनी समजूत घालून कार्यकर्ते जोडून ठेवलेल्याचे अनेक किस्से आहेत. अनेक वेळा तर काही कार्यकर्ते संजुभाऊंना थेट काम न सांगता वहिनींना आपली कामे सांगतात. आणि त्या सुद्धा तेवढ्याच तत्परतेने स्वीय सहाय्यकांना सांगून कार्यकर्त्यांची कामे पूर्ण करून घेतात. 

सांस्कृतीक, धार्मिक, शैक्षणीक व सामाजीक उपक्रमांमध्ये त्यांचा वाढता सहभाग असतो. भाजप महिला आघाडी, केव्हीके, मराठा मंडळाच्या माध्यमातून महिला सबलीकरण, युवतींना मार्गदर्शन, महिला मेळावे घेत सुहासिनीताई सामाजीक बांधणीचे कार्य जोमाने करीत आहेत. सुखात तर सर्वच जण सोबती असतात. पण, दुखाःत सहभागी होत भक्कम पाठबळ देणाऱ्या नेत्यांची साथ कार्यकर्ते कधीच सोडत नाहीत. गेल्या 35 वर्षांच्या सामाजीक, राजकीय जीवनात खासदार संजय धोत्रे यांनी आजपर्यंत निष्ठावंत कार्यकर्ते जोडण्याचे काम केले. त्यांच्या या कार्यात कधी उघडपणे तर कधी पडद्यामागे राहून सुहासिनीताईंची भक्कम साथ मिळाली. त्यामुळेच कार्यकर्त्यांना आपल्या मुलांप्रमाणे जीव लावणाऱ्या वहिनीसाहेब म्हणून त्यांची राजकीय पटलावर ओळख निर्माण झाली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख