Why opposition leaders not projecting Rahul Gandhi as Prime minister candidate ? | Sarkarnama

स्टालिन म्हणतात राहुल गांधी भावी पंतप्रधान;पण इतर नेते गप्प का?  

सरकारनामा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

.

नवी दिल्ली : द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव सोमवारी एकतर्फी घोषित करून टाकले. आजही त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. पण भाजपविरोधी पक्षांच्या एकाही मोठ्या नेत्याने स्टॅलिन यांच्या भूमिकेचे समर्थन केलेले नाही.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या विषयावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश सिंह यांच्या उत्तर प्रदेशच्या राजकारणातील महत्त्व निर्विवाद आहे. या तिनीही नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे. 

हे तीन मध्यप्रदेश, राजस्थानातील कॉंग्रेसच्या सत्ताग्रहण सोहळ्यासाठी गैरहजर राहिले होते. या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधीच्या नेतृत्वगुणांचे कौतुक असले तरी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारीवर शिक्कामोर्तब केलेले नाही.
तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आणि नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुला यांनी या विषयावर मौन बाळगलेले आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने विजय मिळविला असता तरी भाजपने कडवी लढत दिली आहे.2014 मध्ये जशी भाजपची आणि मोदींची लाट दिसत होती तशी लाट काही कॉंग्रेस व राहुल गांधींच्या बाजूने अद्याप दिसून येत नाही.

कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे जेवढे दुर्बळ राहतील तेवढे प्रादेशिक पक्षांचे आणि कॉंग्रेसच्या मित्रपक्षांचे बार्गेनिंग पॉवर जादा असते.  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत या मित्रपक्षांना  कॉंग्रेस दुर्बल असेल तर काँग्रेसकडून  जादा जागा मिळवणे शक्‍य होते. पण कॉंग्रेस पक्षाला आधीपासूनच नेतृत्व देऊन मोठेपणा मान्य केला तर जागा वाटपात कॉंग्रेस मित्रपक्षांना वाकवून घेऊन मनमानी जागावाटप करू शकते ही भीती या नेत्यांना वाटत असावी.

याशिवाय यावेळी कॉंग्रेस किंवा भाजपच्या बाजूने लाट नसली तर लोकसभा निवडणुकीचे निकाल त्रिशंकू म्हणजे कोणालाही निर्विवाद बहुमत न देणारे राहू शकतात. असे झाले तर एच.डी. देवेगौडा यांच्याप्रमाणे 25-30 खासदारांच्या जोरावर आणि अन्य प्रादेशिक पक्षांच्या पाठबळावर पंतप्रधान होण्याची अनेक नेत्यांची महत्त्वाकांक्षा आहे. ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेशसिंह-मुलायमसिंह ही आघाडीवर असलेली नावे आहेत.

त्यामुळे राहुल गांधी यांना सहजासहजी आत्ताच पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मान्यता द्यायला कोणी तयार दिसत नाही. कॉंग्रेसला स्वच्छ बहुमत मिळाले नाही तर भाजपला रोखण्यासाठी राहुल गांधी यांना बाजूला थांबायला सांगून एखाद्या प्रादेशिक नेत्याचे नाव ऐनवेळी पुढे रेटण्याची व्यूहरचना या मित्रपक्षांची असू शकते.

त्यामुळे सध्यातरी स्टॅलिन यांच्या सुरात सुर मिळायला कोणी तयार नाही.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख