मी पोलिसांच्या अंगावर पैसे कशाला फेकेन, आशा बुचकेंचा सवाल : IPS दलाल यांनी दावा फेटाळला - why I throw money on police, ask Asha buchke | Politics Marathi News - Sarkarnama

मी पोलिसांच्या अंगावर पैसे कशाला फेकेन, आशा बुचकेंचा सवाल : IPS दलाल यांनी दावा फेटाळला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 30 मार्च 2020

आशा बुचके आपण प्रशासनाच्या मदतीसाठी फिरत असल्याचा दावा केला. 

पुणे : कोरोना साथीच्या विरोधात जुन्नरमध्ये संचारबंदी सुरू असताना फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाडीतून प्रवास करून पोलिसांच्या अंगावर दंडाची रक्कम फेकणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आशा बुचके यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. सहायक पोलिस अधीक्षक व प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आॅंचल दलाल यांनी शो करत पोलिसांना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला, असा आरोप त्यांनी केला. 

दलाल यांनी सारे आरोप फेटाळले असून एफआयआरमध्ये जे काही लिहिले आहे, ते खरे आहे. त्यांनीच पोलिसांना धमकी दिल्याने गुन्हा दाखल करावा लागल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी बुचके यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बोलताना बुचके म्हणाल्या की मी पोलिसांच्या अंगावर पैसे कशाला फेकेल? लक्ष्मीचा अपमान करण्याची आपली संस्कृती नाही. जिल्हा परिषदेचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद पांडे यांनी मला जुन्नरमध्ये जे स्थलांतरीत येत आहेत त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठीची विनंती केली होती. त्यासाठी मी जुन्नर तालुक्यात अनेक होस्टेल, शिक्षणसंस्था यांना भेटी दिल्या. सुमारे 600 खोल्यांची व्यवस्था त्या दिवशी मी केली. अनेक सरकारी अधिकारी त्या वेळी माझ्यासोबत होते. अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका यांच्या समस्या मी सोडवल्या. या साऱ्याचा रिपोर्ट घेऊन मी तहसीलदारांना भेटण्यासाठी जुन्नरकडे निघाले होते.

त्या वेळी फॅन्सी नंबर प्लेटरवरून माझी गाडी पोलिसांनी अडवली. त्यावेळी आॅंचल दलाल त्या वेळी तेथे होत्या. मी सरकारी मदतीसाठीच प्रवास करत होते, हे वारंवार सांगूनही त्यांनी माझी गाडी सोडली नाही. आयुषप्रसाद पांडे यांनाही मी फोन केला आणि दलाल यांच्याकडे दिला. मात्र त्यांना `लेडी सिंघम` व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी सारा `शो` केला. त्यांना मराठी नीट कळत नव्हते. मी दोनशे रुपये दंड भरण्याची तयारी दाखवली होती. पण पोलिसांकडे आॅनलाइन सुविधा नव्हती. त्यावर मी पोलिसांकडे विचारणा केली. नंतर माझ्यासोबतच्या व्यक्तींनी तो दंड भरलाही. दोनशे रुपयांची नोट पोलिसांच्या अंगावर फेकलेली नाही. पोलिसांनी नंतर मला पावती आणून दिली, असे बुचके यांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितले.

बुचके यांचे सर्व आरोप दलाल यांनी फेटाळले. त्यांनी अनेक वरिष्ठांना फोन लावले. मला मराठी उत्तम समजते. त्यामुळे ते ज्या काही बोलत होत्या, त्याचा साऱ्याचा अर्थ समजत होता. त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला, असे दलाल यांनी सांगितले. 

जुन्नर पोलिस ठाण्याचा कार्यभार असलेल्या दलाल या 2018 च्या बॅंचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे प्रशिक्षण सुरू असून त्यांच्याकडे जुन्नर पोलिस ठाण्याचा चार्ज देण्यात आला आहे. त्यांचे पती  प्रशिक्षणार्थी आयएएस असून ते मंचर विभागाचे उपविभागीय अधिकारी आहेत. त्यांचे बंधू शेखर हे साताऱ्याचे जिल्हाधिकारी आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख