हर्षवर्धन जाधवांची जीभ का घसरली ? 

Abdul_ Sattar Harshwardhan_Jadhav
Abdul_ Sattar Harshwardhan_Jadhav

औरंगाबादः"सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का',असे  विधान  शिवसेनेचे माजी आमदार आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांना उद्देशून का केले याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे . 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मतदारसंघातील नागद येथील प्रचार सभेत बोलतांनाचा एक व्हिडिओ आज सोशल मिडियावर व्हायरल झाला.

यामध्ये लोकसभा निवडणुकीत जाधव यांच्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला आणि मुसलमान खासदार झाल्याच्या आरोपावर जाधव यांनी पलटवार केला.

सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांच्या प्रचारासाठी सभेचा उल्लेख करत जाधव यांनी शिवसैनिकांना " सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का' असा प्रश्‍न विचारला. विशेष म्हणजे अशा प्रकारचे विधान जाधव यांनी नागद, बनोटी, करंजखेड, गोंदेगांव येथील सभांमध्ये पण केले होते. 

 शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते चवताळून उठावेत आणि त्याच्याकडून ऐन निवडणुकीच्या काळात तोल सुटून एखादी मोठी चूक घडावी यासाठी हर्षवर्धन यांनी शिवसेनेवर हा बाउन्सर सोडला असावा . पण अजून तरी  तरी शिवसेनेने हर्षवर्धन जाधव यांना मतदारांची सहानुभूती मिळावी किंवा विशिष्ठ मतदार त्यांच्या मागे एकगठ्ठा जावा असे कोणतेही पाऊल उचलेले नाही . 

मराठा आरक्षणाच्यामुद्दयावर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना आमदारकीचा राजीनामा दिला होता . लोकसभा निवडणुकीत शिवसेनेविरुध्द बंडखोरी केल्यानंतर जाधव यांनी संपर्ण राज्यातील प्रसिध्दी माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.  तसेच अटीतटीच्या लढतीत हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाने एम आय एम चे इम्तियाज जलील खासदार झाले होते . 

मुस्लिम मतदारांना आकृष्ट करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीची आठवण या पद्धतीने  मतदारांना करून दिली असे मानले जात आहे. तसेच कन्नड आणि सिल्लोड हे मतदारसंघ जवळजवळ आहेत . अब्दुल सत्तार यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने सत्तार यांच्यामुळे कन्नड मधील मुस्लिम मतदार शिवसेनेकडे जाऊ नये अशी हर्षवर्धन जाधव यांचे इच्छा असावी असे बोलले जाते . 

कन्नड विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्यासमोर शिवसेना-भाजप महायुतीचे उदयसिंग राजपूत, राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे संतोष कोल्हे, भाजप बंडखोर अपक्ष किशोर पवार यांचे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सूक असलेले शिवसैनिक, कोल्हे आणि पवार यांच्या उमेदवारीमुळे जाधव यांच्या मतांमध्ये होणारे विभाजन पाहता जाधव यांच्यासाठी यावेळची निवडणूक अवघड झाली आहे.

प्रसारमाध्यम, वृतपत्रांकडून बेदखल करण्यात आल्याने हर्षवर्धन बैचन होते. यातूनच त्यांनी पब्लिसिटी स्टंटसाठी वरील विधान केल्याचे बोलले जाते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी " हर्षवर्धन जाधव यांनी औकातीत राहावे' अशा संयमीत भाषेत आपली प्रतिक्रिया दिला आहे. कुठल्याही प्रकारचा अतितायीपणा न करता हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत पराभूत करून धडा शिकवायचा अशी भूमिका शिवसेनेने घेतलेली दिसते.


याशिवाय हर्षवर्धन जाधव यांचा अनेकदा बोलताना  आणि वागताना तोल सुटतो .   ते थोडे मनस्वी स्वभावाचे असून परिणामांची पर्वा न करता ते आक्रमक भाषा वापरताना दिसलेले आहेत .  त्यामुळे  भावनेच्या भरात भडकूनही ते बोलले असावेत असे काहींना वाटते . कारणे काहीही असोत तुर्तास प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून चर्चेत राहण्यात हर्षवर्धन जाधव यशस्वी ठरले असेच म्हणावे लागेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com