अश्‍विनी बिद्रे बेपत्ता असतानाही त्यांची प्रशासनाने का बदली केली ? - Why did administration Tranffered Ashwini Bidre When she was missing ? | Politics Marathi News - Sarkarnama

अश्‍विनी बिद्रे बेपत्ता असतानाही त्यांची प्रशासनाने का बदली केली ?

सरकारनामा
सोमवार, 21 जानेवारी 2019

अश्विनी बिद्रे या जिवंत आहेत, हे दाखविण्यासाठीच नागरी हक्क संरक्षण विभागाने त्यांची बदली करुन या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला सहकार्य केल्याचा आरोप बिद्रे यांचे पती राजु गोरे यांनी केला आहे.

नवी मुंबई  :  सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे  एप्रिल 2016 पासून बेपत्ता झालेल्या असताना त्यांची  मे 2017 मध्ये वर्धा जिह्यातील नागरी हक्क संरक्षण पथकात बदली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 इतकेच नव्हे तर 5 जून 2017 रोजी त्यांना बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचा प्रताप देखील नागरी हक्क संरक्षण विभागाने केला आहे. 

अश्विनी बिद्रे या जिवंत आहेत, हे दाखविण्यासाठीच नागरी हक्क संरक्षण विभागाने त्यांची बदली करुन या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला सहकार्य केल्याचा आरोप बिद्रे यांचे पती राजु गोरे यांनी केला आहे.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील आरोपीला पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणाऱया नागरी हक्क संरक्षण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खलिद, तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक महेश पाटील यांच्यावर अश्विनी बिद्रेच्या हत्याकांडाचे पुरावे नष्ट करणे आणि आरोपीला मदत करणे याबाबतचे गुन्हे दाखल करण्याची मागणी राजु गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यू पश्‍चात त्यांच्या कुटुंबियांना अथवा वारसांना मिळणारे लाभ मिळविण्यासाठी अश्विनी बिद्रे यांचे पती राजु गोरे यांनी गत महिन्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाकडे पत्रव्यवहार केला होता. 

यावेळी अश्विनी बिद्रे यांची 31 मे 2017 मध्ये वर्धा येथील नागरी हक्क संरक्षण विभागात बदली करण्यात आल्याचे तसेच त्यांना कोकण परिक्षेत्रातून बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे या एप्रिल 2016 मध्ये बेपत्ता झाल्या असताना, तसेच आरोपी अभय कुरुंदकर व त्याच्या अन्य साथिदारावर 31 जानेवारी 2017 रोजी खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल झाला असताना देखील अश्विनी बिद्रे यांची बदली करुन त्या जिवंत  आहेत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न नागरी हक्क संरक्षण विभागाने केल्याचे त्यांच्या कृत्यावरुन दिसून येत असल्याचे राजु गोरे यांचे म्हणणे आहे.

अश्विनी बिद्रे यांचा अखेरचा पगार जून 2016 मध्ये ठाणे ग्रामीण मधुन निघाला आहे. त्यानंतर त्या कामावर हजर नाहीत हे कारण पुढे करत त्यांचा पगार बंद करण्यात आला. मात्र वर्षभरानंतर जून 2017 मध्ये नागरी हक्क संरक्षण विभागाने त्यांची कोकण परिक्षेत्रातून परस्पर वर्धा येथे बदली केली.

ही बाब नागरी हक्क संरक्षण विभागाने अश्विनी बिद्रे यांच्या घरी पत्राद्वारे कळविणे आवश्‍यक होते. तसेच एखाद्या पोलीस अधिकाऱयांची एका ठिकाणावरुन दुसऱया ठिकाणी बदली करण्यापुर्वी त्यांचे पुर्वीच्या ठिकाणचे सर्व कामांची पुर्तता होणे आवश्‍यक असते. त्याशिवाय त्यांना दुसऱया ठिकाणी सोडता येत नाही.

या तांत्रिक बाबी असताना व अश्विनी बिद्रे यांचा पगार वर्षभर त्यांच्याच विभागाकडून बंद करण्यात आला असताना देखील त्यांची बदली झालीच कशी? असा प्रश्न राजु गोरे यांनी उपस्थित केला आहे.

अश्विनी गोरे यांचा अखेरचा पगार हा कोकण परिक्षेत्रातुन बंद झाला असून त्याच विभागात त्यांचा पगार सुरु झाल्यानंतरच त्यांची अन्यत्र बदली होणे गरजेचे होते. मात्र नागरी हक्क संरक्षण विभागाने या सर्व तांत्रिक बाबींना फाटा देत त्या जीवंत असल्याचे दाखविण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप राजु गोरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पारीत केला आहे.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे या गायब होण्यामागे अभय कुरुंदकर याचा हात असल्याबाबतचे स्पष्ट पुरावे असतानाही ठाणे ग्रामीण पोलिसांनी अभय कुरुंदकर याला गुन्हे शाखेत कार्यरत ठेवले.

नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जानेवारी 2017 मध्ये कुरुंदकर याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांशी पत्रव्यवहार केला होता. मात्र ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी अभय कुरुंदकर याला पाठिशी घातल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख