Why is Devendra Fadnavis is confident about BJP's return in Power | Sarkarnama

पुन्हा भाजपचेच सरकार येईल असे फडणवीस कशाच्या जोरावर म्हणतात ?

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

..

पुणे : राज्यात भारतीय जनता पार्टीचेच सरकार येईल, असा विश्‍वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एवढेच नव्हे तर आमदारांचा घोडेबाजार न करता , विरोधी पक्षांची आमदार न फोडता सत्तेवर येण्याची भाषा त्यांनी केली .  इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना कुणाच्या भरवशावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सरकार आणण्याची घोषणा केली याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

सरकार स्थापन केले तरी भाजप  बहुमत कसे सिद्ध करणार ही चर्चा प्रामुख्याने होत आहे. सध्याचे संख्याबळ पाहता भाजप आपल्या १०५ आणि गोलंकेलेया अपक्षांच्या जोरावर १४५ तर सोडा १२५ पर्यंतही जाऊ शकत नाही . काँग्रेस तर भाजपला कधीच पाठिंबा देऊच शकत नाही . 

फडणवीस यांच्या या विश्‍वासामागे काय कारणे असावीत याविषयी राजकीय वर्तुळात विविध शक्यतांचा विचार होतो आहे . पहिली शक्यता  अशी की काँग्रेस पक्ष आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या आणि परप्रांतीयांना विरोधाचा इतिहास असलेल्या शिवसेने बरोबर जाणार नाही . काँग्रेसला मनसे चालत नाही तर हायकमांडला शिवसेना कशी चालेल असा मुद्दा आहे . 

गडकरी आणि  कॉंग्रेसचे स्ट्रॅटेजिस्ट  नेते  अहमद पटेल यांच्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या  भेटीचे रहस्य अजून उलगडलेले नाही .  पण याभेटीत भाजपला अनुकूल ठरणाऱ्या काही गोष्टी घडल्या असाव्यात  अशीही एक चर्चा सुरू  आहे. गडकरी यांच्यासोबत पटेल यांची नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील बाहेर आलेला नाही. काँग्रेस शिवसेनेला मदत करणार नाही असा निष्कर्ष या भेटून निरीक्षक काढीत आहेत . 
भाजपाला दूर ठेवून सरकार स्थापन करायचे झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊन भागणार नाही. त्यांना कॉंग्रेसची मदत लागणार आहे. या परिस्थितीत शिवसेनेच्या सोबत राष्ट्रवादी राहिली तरी कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या सरकारला पाठिंबा देण्यास अद्याप होकार दिलेला नाही.

उलट शिवसेनेला पाठिंबा न देण्याची भूमिका कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतली आहे. भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यातील कॉंग्रेस नेते शिवसेनेला मदत करण्याच्या भूमिकेत असताना पक्षाचे केंद्रीय नेतृत्व त्यास मान्यता द्यायला तयार नाही. 

त्यामुळे काँग्रेसने बाहेरूनही शिवसेनेला पाठिंबा दिला नाही तर शिवसेनेचे सरकार बनूच शकणार नाही , असे भाजप नेत्यांना वाट असावे . 

शिवाय महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली तर 'काळजीवाहू' सरकार बरेच  दिवस चालू शकते . राष्ट्रपती राजवट लागू झाली तर  काही काळाने वातावरण शांत झाल्यावर  शिवसेना नेत्यांशी शांत डोक्‍याने चर्चा करून मार्ग काढण्याचा एक प्रयत्न भाजपाकडून होऊ शकतो. 

 कारणे काहीही असोत पण देवेन्द्र फडणवीस यांनी यावेळी मी पुन्हा येणार असे म्हंटले  नसले तरी भाजपच्या नेतृत्वाखालीच  पुन्हा सरकार सत्तेवर  येणार असे म्हणून शिवसेनेवरील दबाव वाढवला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख