50-50 टक्के फॉर्म्युल्यावर अमितभाई का गप्प ? 

50-50 टक्के फॉर्म्युल्यावर अमितभाई का गप्प ? 

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी नेमकं काय ठरलं होतं हे अमितभाई शहा, उद्धव ठाकरे यांनाच ठाऊक. त्या बैठकीनंतर फडणवीस म्हणाले होते की यापुढे सरकार आल्यानंतर पद आणि समानता राखण्याचा प्रयत्न केला जाईल. जर युतीमध्ये काही गोंधळ झालाच तर अमितभाई आणि उद्धवजी दोघे मिळून निर्णय घेतील. वास्तविक आज राज्यात चौदा दिवस गोंधळ सुरू असताना अमितभाई का गप्प आहेत. ते पुढे येऊन का सांगत नाही की आपलं हे हे ठरलं होतं म्हणून !

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागून चौदा दिवस उलटल्यानंतरही भाजप-शिवसेनेच्या महायुतीचे सरकार स्थापन झाले नाही. उद्या शेवटचा दिवस आहे. भाजपने जर उद्या सत्ता स्थापनेसाठी दावा केला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते. शिवसेनेने आजही भाजपला फटकारले. 2019 च्या लोकसभेवेळी जे ठरलं होतं ते द्यायची तयारी दाखवा. मला खोट पाडू नका. पण, 50-50 चा फॉर्मुला ठरला होता की नाही हे सांगा तर चर्चा करू या ! अन्यथा काही उपयोग नाही या भूमिकेवर ठाकरे आले आहेत. 

शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढले असतानाही भाजप सत्ता स्थापन करण्यास का घाबरत आहे. 2014 पासून देशात बलाढ्य अशा भाजपने अनेक राज्यात भाजपला बहुमत नसतानाही फोडाफोडी करून सरकारे स्थापन केली आहेत. पण, महाराष्ट्रात तसे घडताना दिसत नाही. जर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरविले तर भाजप सरकार सत्तेवर येऊ शकते हा समजही आज महाराष्ट्राने खोटा ठरवून दाखविला. 

हरियाना आणि महाराष्ट्राची एकावेळी निवडणूक झाली. यापूर्वी दोन्हीकडे मोदी लाटेत भाजपची सरकारे आली होती. महाराष्ट्रात 122 च्या पुढे न गेलेल्या भाजपला शिवसेनेचा टेकू घेऊनच सरकार चालवावे लागले. आता 2019 मध्ये भाजप 105 वर आला. हरियानातही तेच झाले तेथेही बहुमत मिळाले नाही. मोदी-शहांची जादू चालली नाही. मी पुन्हा येणार अशी गर्जना करणारे नव महाराष्ट्राचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसही मॅजिक फिगर गाठू शकले नाहीत. नशीब शिवसेना-भाजप हातात हात घालून लढले अन्यथा दोघांनाही शंभराच्या आतच समाधान मानावे लागले असते. 

राज्यातील मतदारांनी विशेषत: भाजपला धडा शिकविला आहे. स्पष्ट बहुमत दिले नाही. शिवसेनाही कमी झाली. म्हणजे जनादेश महायुतीला आहे पण, भाजप किंवा शिवसेनेला एकट्याला सत्ता दिली नाही. दिल्लीत मोदींवर विश्वास ठेवून भाजपला बहुमत दिले. तसे राज्यात झाले नाही. तुमचे एकट्याचे नको मिळून सरकार चालवा. तुमच्यावर अंकुश हवा असा आजच्या जनादेशाचा अर्थ काढावा लागेल. उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व. ते भाजप आणि प्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर का भडकले. याची कारणेही आहेत. 

2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी पुन्हा युती करताना आणि गळ्यात गळे घालताना दोन्ही पक्षात तह झाला होता. या तहाची माहिती खुद्द फडणवीस यांनी जाहीररीत्या माध्यमांना दिली होती. त्यावेळी शहा,ठाकरे यांच्यात बंद दाराआड बैठक झाली होती. या बैठकीत काय ठरले होते. याची यादी वाचता येणार नाही असे फडणवीस म्हणाले होते. त्यावेळी ते असेही म्हणाले होते, की गेल्या पाच वर्षात जे काम केले आहे. त्यामुळे लोक आमच्या मागे आहे. यापुढे सरकार आल्यानंतर पद आणि समानता राखण्याचा प्रयत्न केला जाईल. जर युतीमध्ये काही गोंधळ (कन्फ्यूज झालाच तर हा मुख्यमंत्र्यांनी वापरलेला शब्द ) झालाच तर अमितभाई आणि उद्धवजी दोघे मिळून निर्णय घेतील. चर्चेने प्रश्‍न सोडविले जातील. हे सर्व फडणवीस यांनी म्हटले होते. 

देशात पुन्हा मोदी सरकार आले. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक झाली. निकाल लागले. भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. सरकार युतीचे स्थापन होणार होते. मात्र दिवाळीदिवशी फडणवीस म्हणाले, की फॉर्मुल्यात अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे काही ठरले नव्हते. मुख्यमंत्री भाजपचाच होणार. त्यामुळे उद्धव ठाकरे संतप्त झाले. जे ठरले होते ते ठरलेच नाही असे फडणवीस सांगत आहे. ते मला मान्य नाही असे ते म्हणाले. 

नेमकं काय ठरलं होतं हे शहा आणि ठाकरे यांनाच माहीत. वास्तविक आज युतीत गोंधळ असताना अमितभाई का गप्प आहेत. ते पुढे येऊन का सांगत नाही की आपलं हे हे ठरलं होतं म्हणून. मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलं होतं की नव्हतं याचे स्पष्टीकरण ते का देत नाही हा प्रश्‍न जनतेला पडलेला आहे. इकडे ठाकरे-फडणवीसांमध्येच कलगीतुरा सुरू आहे. त्या बैठकीला शहा-ठाकरे होते या दोघांनी राज्यातील जनतेसमोर येऊन खरे काय ते सांगितले पाहिजे. युतीतील गोंधळ अमितभाई आणि उद्धवजी सोडवतील असे म्हणणारे मुख्यमंत्री आज याबाबत का बोलत नाही. अमितभाई का पुढाकार घेत नाही हा प्रश्‍नही आहे. 

अमितभाईनी 50-50 टक्‍क्‍याचा फॉर्मुल्याचा शब्द दिलेला असावा असाही अर्थ कोणी काढत असेल तर चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. वयाची 75 गाठल्यानंतर सत्तापद सोडून मार्गदर्शक करण्याची पद्धत भाजपत सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75 वर्षाचे होतील तेव्हा त्यांचा राजकीय वारसदार कोण याबाबतही अधूनमधून चर्चा होताना दिसते. या चर्चेत शहा आणि फडणवीस यांची नावे आघाडीवर असतात. मोदींचा पाठिंबा आणि संघाचा आर्शिवाद यामुळे फडणवीस हे प्रबळ होतील अशी चर्चाही जडत होती. या पार्श्‍वभूमीवर फडणवीस यांची महाराष्ट्रात फजिती होत असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली काय अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

शिवसेनेने भाजपला वाकविले ? 

"एनडीए'त भाजपबरोबर इतर राज्यात जे काही पक्ष आहेत. त्यांना मोदी-शहा पायघडी घालते. शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्र. तो ही हिंदुत्व मानणारा. तरीही या परममित्राला नेहमीच ते पाण्यात पाहतात. दुसरीकडे अकाली दल असेल किंवा बिहारचे नीतिशकुमार असतील. ते प्रत्येक गोष्टीत भाजपच्या विचारसरणीला विरोध करतात. बिहारमध्ये भाजप जेडीयूसमोर लोटांगण घेते. 

शिवसेनेला केंद्रात आणि राज्यातही दुय्यम पदे दिली गेली. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात निदान तसे तरी नव्हते. शिवसेनेचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष बनले होते. तसे चित्र 2014 पासून युतीत दिसले नाही. आता राज्यात शिवसेनेशिवाय पानही हालू शकत नाही हे जेव्हा उद्धव ठाकरेंच्या लक्षात आले तेव्हा मात्र त्यांनी फणा काढला. हम भी कुछ कम नही ! हे भाजपला गेल्या चौदादिवसात दाखवून दिले. उद्या भाजप शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले तरी शिवसेनेला कमी लेखून चालणार नाही. काही असो भाजपला कधी नव्हे इतके शिवसेनेने वाकविले असा गेल्या चौदा दिवसातील घडामोडीचा अर्थ काढावा लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com