सत्तार समर्थक नंदकिशोर सहारे यांची माघार कुणाच्या पथ्यावर? 

सत्तार समर्थक नंदकिशोर सहारे यांच्या उमेदवारी अर्जामुळे वेगळ्या चर्चेला सुरूवात झाली होती. आपल्याकडे शंभरहून अधिक सदस्य असल्याचा दावा करत अब्दुल सत्तार यांनी सहारे यांची उमेदवारी दाखल केली होती. परंतु केवळ दबावतंत्र म्हणून सत्तार यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहारे यांनी माघार घेतल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले.
सत्तार समर्थक नंदकिशोर सहारे यांची माघार कुणाच्या पथ्यावर? 

औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आमदार अब्दुल सत्तार समर्थक नंदकिशोर सहारे यांनी माघार घेतली. सहारे यांची माघार आता कुणाच्या पथ्यावर पडते हे येत्या 19 तारखेला स्पष्ट होईल. औंरगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी एकूण आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. महायुतीचे अंबादास दानवे, आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांच्यासह अब्दुल सत्तार यांचे खंदे समर्थक सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकिशोर सहारे, राजेश टापे यांचे समर्थक एकनाथ चिमणे, कन्नडचे नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांचे समर्थक अब्दुल जावेद अब्दुल वाहेद यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

यापैकी सत्तार समर्थक नंदकिशोर सहारे यांच्या उमेदवारी अर्जामुळे वेगळ्या चर्चेला सुरूवात झाली होती. आपल्याकडे शंभरहून अधिक सदस्य असल्याचा दावा करत अब्दुल सत्तार यांनी सहारे यांची उमेदवारी दाखल केली होती. परंतु केवळ दबावतंत्र म्हणून सत्तार यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहारे यांनी माघार घेतल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. आता मैदानात अंबादास दानवे, बाबुराव कुलकर्णी यांच्यासह माजी नगरसेवक शहानवजा अब्दुल रेहमान खान हे तीन उमेदवार आहेत. त्यामुळे दानवे विरुध्द कुलकर्णी अशी थेट लढत येत्या 19 तारखेला पहायला मिळेल. 

सत्तार समर्थक कुणाच्या गळाला?
सत्तार यांनी शंभर सदस्य आपल्याकडे असल्याचा दावा केला असला तरी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघाशिवाय जिल्ह्यातील काही तालुक्‍यात त्यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. साधरणता 40 ते 50 सदस्य सत्तार यांच्याकडे असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात बंड पुकारल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याचा सूड सत्तार महायुतीचे दानवे यांना मदत करून उगवणार? की मग आघाडीच्या बाबुराव कुलकर्णी यांना मदतीचा हात देणार याबद्दल तर्क लढवले जात आहेत. 

कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडूण आलेले पण, सध्या सत्तार यांच्या सोबत असलेल्या जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांची मते आपल्याला मिळावीत यासाठी बाबुराव कुलकर्णी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपुर्वी त्यांनी सिल्लोडमध्ये जाऊन सत्तार यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. तर दुसरीकडे सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 20 ऑगस्टला सिल्लोड मतदारसंघात येणार आहे. याचवेळी सत्तार यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल असे बोलले जाते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्तार आपले वजन कुणाच्या पारड्यात टाकतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com