....  मग विनायक मेटे महायुतीत कसे राहणार ? 

आचारसंहितेपूर्वी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या समर्थकांना विविध महमंडळांवर नेमणूका देण्यात आल्या आहेत. मात्र, युतीत बीड विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याची असून आता जयदत्त क्षीरसागर यांनी प्रवेश केल्याने त्यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
Mete-with-CM
Mete-with-CM

बीड : महायुतीतल्या इतर सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपदे आणि समर्थकांना सत्तेचा वाटा मिळाला. केवळ अपवाद ठरले ते शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे.

त्यातच आता त्यांना हवी असलेली बीड विधानसभेची जागाही शिवसेनेलाच सोडावी लागणार अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत केवळ मुख्यमंत्र्यांशी जवळीक एवढ्या निकषावरच ते महायुतीत राहणार का, वेगळा निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

१५ वर्षे आघाडीत राहीलेले विनायक मेटे मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुढाकाराने भाजपमध्ये आले. विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या चिन्हावर बीडमधून उमेदवारी देण्यात आली. निसटता पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा परिषदेवर घेण्यात आले. यानंतर मात्र त्यांचे आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे बिनसत गेले. परिणामी त्यांच्या मंत्रीपदाच्या शपथविधीचा मुहूर्त काही निघाला नाही. 

इतर घटक पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपदे आणि समर्थकांना विविध ठिकाणी सत्तेत वाटा मिळाला. मात्र, शिवसंग्राम अपवाद राहीली. जिल्ह्यात पालकमंत्र्यांसोबत असलेल्या वादामुळे स्थानिक पातळीवरील विकास निधीत अडचणी आल्या. तर, राज्यात मंत्रीपद मिळाले नसले तरी त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपदाच्या माध्यमातून थोडीबहुत कसर भरुन निघाली.

तर, मुख्यमंत्र्यांनीही आपल्या पातळीवर विनायक मेटे यांनी सुचविलेल्या विकास प्रकल्पांना निधी दिला. मंत्रीपद मिळाले नसले तरी समाजाचे आरक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना असे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कामांमुळे आपण समाधानी असल्याचे मेटे सांगतात.

 दरम्यान, आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांच्या समर्थकांना विविध महामंडळांवर स्थान मिळाले आहे. या टर्ममध्ये मंत्रीपद मिळाले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत बीडची जागा महायुतीत त्यांच्या शिवसंग्रामला सुटेल असा त्यांच्या समर्थकांचा विश्वास आहे. मागच्या विधानसभेत झालेल्या निसटत्या पराभवातून धडा घेऊन ते जोरदार तयारीही करत आहेत. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे त्यांच्या विधानसभा उमेदवारीच्या वाटेत मोठीच अडचण झाली आहे.

 वास्तविक युतीमध्ये बीडची जागा शिवसेनेच्याच वाट्याची आहे. मात्र, क्षीरसागरांपूर्वी या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार नसल्याने महायुतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एखाद्या जागेची आदलाबदल करुन ही जागा मेटेंसाठी सोडून घेतील असे वाटत होते. पण, आता क्षीरसागरांसारखा मातब्बर नेता पक्षात आल्याने शिवसेना ही जागा कदापी सोडेल असे चित्र नाही. 

त्यातच लोकसभेचा निकाल पाहता पालकमंत्री पंकजा मुंडे त्यांना ताकदीने विरोध करतील. त्यामुळे मंत्रीपदही मिळाले नाही आणि आता महायुतीत बीडची जागाही मिळणार नसेल तर मेटे महायुतीत थांबतीलच कशाला, असा अंदाज व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात वजन टाकले होते. त्याचा परिणाम म्हणून इतर पाच मतदार संघात ७० हजारांपासून ते २० हजारांपर्यंत मताधिक्क्य घेणाऱ्या भाजपचा उधळलेला वारु बीडमध्ये अडला गेला.

त्यातून काही वेगळी वाट निघेल असे वाटलेले असताना गुरुवारी निकालानंतर विनायक मेटे यांनी राज्यातील विजयाबद्दल पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन केले. आता मेटेंची पुढची वाट काय याकडे लक्ष लागले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com