राजुऱ्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजुरा मतदारसंघात मिळालेल्या 35 हजार मतांच्या आघाडीने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. विद्यमान आमदार संजय धोटे यांच्याऐवजी नवा चेहरा देता येईल काय, याची चाचपणी भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. माजी आमदार सुभाष धोटे यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
राजुऱ्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ

राजुरा (जि. चंद्रपूर) - लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजुरा मतदारसंघात मिळालेल्या 35 हजार मतांच्या आघाडीने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. विद्यमान आमदार संजय धोटे यांच्याऐवजी नवा चेहरा देता येईल काय, याची चाचपणी भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. माजी आमदार सुभाष धोटे यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 

शेतकरी संघटनेचे माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी आपली उमदेवारी जाहीर करून प्रचाराचे रणशिंगही फुंकले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राजुरा, जीवती, कोरपना आणि गोंडपिपरी या चार तालुक्‍यांचा समावेश या मतदारसंघात आहे. मात्र, प्रत्येक तालुक्‍यातील राजकीय, सामाजिक समीकरणे वेगळी आहेत. विशेष म्हणजे, आजवर आमदार झालेले सर्व राजुरा तालुक्‍यातीलच आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत प्रथमच भाजपने या मतदारसंघात आपले खाते उघडले. त्यावेळी शेतकरी संघटनेचे ऍड. चटप रिंगणात नव्हते. त्यांच्याऐवजी प्रभाकर दिवे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे चटप यांना मानणारा मतदार भाजपकडे वळला. त्याही परिस्थितीत कॉंग्रेसचा केवळ अडीच हजार मतांनी पराभव झाला. आता स्वतः चटप रिंगणात उतरले आहेत. 

लोकसभेत या मतदारसंघातील मतदारांनी कॉंग्रेसला झुकते माप दिले होते. त्यामुळे भाजपची चिंता वाढली. विद्यमान आमदार ऍड. संजय धोटेंऐवजी दुसरा उमदेवार देता येईल काय, याची चाचपणी सुरू आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आघाडी मिळाली होती. 

मताधिक्‍याचे कारण समोर करून धोटेंना बदलविले, तर इतरांनाही तोच न्याय द्यावा लागेल. अन्यथा धोटे समर्थक भाजपविरोधात जाऊ शकतात, अशीही भीती आहे. ऍड. धोटे पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे आहेत. त्यामुळे चटपांकडे जाणारी मते तेच थांबवू शकतात, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. ऍड. धोटेंविषयी मतदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे चटपांनाही भाजपने उमेदवारीची गळ घातल्याची माहिती आहे. मात्र, भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार नाही, यावर चटप ठाम आहेत. 

दुसरीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही उमेदवारी मिळेल, असे गृहीत धरून या मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे. आधीच भाजपमध्ये या मतदारसंघात दोन गट पडले आहेत. अशा परिस्थिती भोंगळे यांना उमेदवारी देऊन गटातटाचे राजकारण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आश्रमशाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा बाऊ करून माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या एका गटाकडून होत आहे. परंतु धोटे यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे कॉंग्रेसच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार सुदर्शन निमकर सध्या दुसऱ्या पर्यायाच्या शोधात आहेत. सेना-भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरल्यास सेनेला सक्षम उमदेवारांचा शोध घेताना बरीच दमछाक करावी लागणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी हवा केलेल्या वंचित आघाडीकडे उमदेवारांची वानवा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com