आता राज्यात सत्ताधारी कोण? शिवसेना की एकत्र लढलेली आघाडी? - Who Will Form Govenrment in Maharashtra Shivsena or Congress-NCP Alliance | Politics Marathi News - Sarkarnama

आता राज्यात सत्ताधारी कोण? शिवसेना की एकत्र लढलेली आघाडी?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

राज्यात सत्ता संघर्षाने आता नवे वळण घेतले असून सर्वाधिक जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाने आपण सरकार स्थापन करु शकत नसल्याचे कळवले आहे. आता राज्यपाल महायुती म्हणून लढून भाजप खालोखाल जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी बोलावणार की एकत्र लढलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, याची उत्सुकता आहे.

मुंबई - राज्यात सत्ता संघर्षाने आता नवे वळण घेतले असून सर्वाधिक जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाने आपण सरकार स्थापन करु शकत नसल्याचे कळवले आहे. आता राज्यपाल महायुती म्हणून लढून भाजप खालोखाल जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी बोलावणार की एकत्र लढलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, याची उत्सुकता आहे.

मुख्यमंत्रीपद आणि ५० -५० टक्के मंत्रीपदे यावरुन शिवसेना -भाजपमध्ये संघर्ष सुरु होता. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम होती. अखेर आज सायंकाळी भाजपने शिवसेनेच्या हातात दिलेला आपला हात काढून घेतला. भाजप सरकार स्थापन करु शकत नाही, असे भाजपने राज्यपालांना कळवले. त्यामुळे आता राज्यात सरकार कोण स्थापन करणार हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. 

शिवसेनेकडे ५६ आमदारांचे बळ आहे. तर महाआघाडीकडे १०५ आमदारांचे बळ आहे. महायुती म्हणून सरकार स्थापन करण्याची वेळ आली असती तर युतीचे बळ १६२ आमदारांचे होते. पण आता ती शक्यता मावळली आहे. शिवसेना अद्याप महायुतीतून बाहेर पडलेली नाही. दुसरीकडे महाआघाडी एकत्र आहे. म्हणूनच राज्यपाल अद्यापही महायुतीत असलेल्या शिवसेनेला बोलावणार की एकत्र असलेल्या आघाडीला सत्ता स्थापन करण्यास सांगणार हा प्रश्न आहे. 

राजकीय तज्ज्ञांच्या मते शिवसेनेला प्रथम महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करावी लागेल. त्यांचे जे खासदार केंद्रात मंत्री पदावर आहेत, त्यांचा राजीनामा द्यावा लागेल व त्यानंतर आघाडीला पाठिंब्यासाठी अधिकृत विनंती करावी लागेल. अद्याप पर्यंत तरी तसे घडलेले नाही. दुसरीकडे शिवसेनेकडून आम्हाला अधिकृत प्रस्ताव आलेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसनेही सांगितले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार की राज्य राष्ट्रपदी राजवटीच्या दिशेने जाणार याबाबत उत्सुकता आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख