who will become kolhapur bjp president? | Sarkarnama

कोल्हापूर भाजपची धुरा चंद्रकांतदादा कोणाकडे सोपविणार?

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

...

कोल्हापूर ः भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत ही निवड प्रक्रिया केव्हाही होऊ शकते. सध्या बूथ कमिट्या आणि मंडल कमिट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

अध्यक्षपदासाठी विद्यमान प्रभारी अध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अशोक देसाई, गणेश देसाई हे इच्छुक आहेत. यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष आहे. दहा महिन्यांत कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होईल. सध्या जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार नाही. त्यामुळे महापालिकेत पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान पेलणारा अध्यक्ष पक्षाला हवा आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, की पक्षात मजबूत स्थान असणाऱ्यांची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भाजपच्या बूथ कमिट्या, मंडल कमिट्यांची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शब्द पक्षात प्रमाण मानला जातो. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा जिल्हाध्यक्ष बदलावा लागला. त्यामुळे चंद्रकांतदादांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या राहुल चिकोडे यांची निवड करण्यात आली. आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. केंद्रात सत्ता असणारा हा पक्ष राज्यात विरोधी पक्षात बसला आहे. जिल्ह्यात यापूर्वी भाजपचे दोन आमदार होते. आता एकही आमदार नाही. जिल्हा परिषदेतील पक्षाचीही सत्ता नव्या समीकरणामुळे धोक्‍यात आहे.

या पार्श्‍वभूमीवर पक्षाला मजबूत करणारा अध्यक्ष हवा आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांचा शब्द पक्षात आजही प्रमाण आहे. त्यामुळे ते आर. डी. पाटील, विजय जाधव, की पुन्हा श्री. चिकोडेंची निवड करतात, की श्री. देसाई यांना पसंती देतात, हेही महत्त्वाचे आहे. प्रदेशाध्यक्षांचे निकटचे सहकारी म्हणून महेश जाधव यांच्यापाठोपाठ श्री. चिकोडे, विजय जाधव यांची नावे घेतली जातात. यापैकी महेश जाधव यांना सत्ता असताना पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद मिळाले. श्री. चिकोडे यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले. विद्याप्रबोधनी, संवेदना या संस्थांचे ते अध्यक्ष आहेत. तसेच, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक अशी विविध पदे भूषविण्याची संधी चिकोडे यांना मिळाली आहे.

विजय जाधव यांना मात्र अद्याप कोणतीच संधी मिळाली नाही. भाजपच्या मुशीतच ते कार्यकर्ते म्हणून घडले आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, तसेच आर. डी. पाटील आणि श्री. देसाई हे दोन अनुभवी चेहरेही त्यांच्याकडे आहेत. आर. डी. पाटील 25 वर्षे नगरसेवक होते. श्री. देसाई यांनी गेली अनेक वर्षे हिंदुत्ववादी विचारसरणीशी एकनिष्ठता ठेवली आहे. तसेच, गेली 12 वर्षे ते पक्षात काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याही नावाबाबत विचार होऊ शकतो. येत्या आठ ते दहा दिवसांत केव्हाही ही निवड होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख