कोल्हापुरातील 'दादांची जागा' कोण घेणार?

शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस या आघाडीचे सरकार आल्यानंतर कोल्हापुरात काय काय घडणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापुरातील 'दादांची जागा' कोण घेणार?

कोल्हापूर : विधानसभेच्या निकालानंतर तब्बल 20 दिवसानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम असला तरी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस अशी महाशिवआघाडीचे सरकार येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कॉंग्रेसचा असेल पण त्यावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता जिल्ह्यात लागून राहीली आहे.

शिवसेना-भाजपा युतीच्या 1995 ते 1999 काळात पालकमंत्री पद शिवसेनेकडे होते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर 1999 ते 2014 या काळात राज्यात कॉंग्रेस आघाडीची सत्ता होती. त्यातील पहिले काही वर्षे कॉंग्रेसचे दिवंगत नेते कै. डॉ. पतंगराव कदम हे पालकमंत्री राहीले तर नंतरच्या काळात या पदावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काम पाहीले. 2010 ते 2014 या काळात जिल्ह्यात आमदार सतेज पाटील हे कॉंग्रेसचे मंत्री असूनही त्यांना लातूरचे पालकमंत्रीपद व सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. 2014 साली राज्यात सत्तांतर झाले आणि युतीची सत्ता आली. माजी मंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पहिल्यांदा जिल्ह्याच्या सुपुत्राकडेच पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली. आता भाजपा सत्तेत येण्याची शक्‍यता जवळपास मावळली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने जिल्ह्यातील दहापैकी चार जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसमुक्त झालेल्या या जिल्ह्यात या जागा जिंकल्याने कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव मिळाले आहे. याचे श्रेय आमदार सतेज पाटील यांना जाते. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसची सत्ता येण्याची शक्‍यता आहे. तथापि जिल्ह्याला मंत्रीपद मिळेल का ? याविषयीच पहिल्यांदा उत्सुकता आहे.

राज्याच्या पातळीवर तीन पक्षांचे कडबोळ सांभाळताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यात जागांच्या संख्येवरून मिळणाऱ्या मंत्रीपदाची संख्याही मर्यादित असणार आहे. सद्यस्थितीत मंत्रीपदासाठी कॉंग्रेसचे निष्ठावंत म्हणून पी. एन. पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांनीही मोठी "फिल्डींग' मंत्रीपदासाठी लावली आहे. तथापि अजून या तिन्हीही पक्षात मुख्यमंत्रीपदापासून ते इतर पदांचा फॉर्म्युलाच निश्‍चित नाही. हा फॉर्म्युला निश्‍चित झाल्यानंतर कॉंग्रेसला किती मंत्रीपदे मिळणार आणि त्यात कोल्हापुरात कोणाला संधी मिळणार हे प्रश्‍न आहेतच. पण पालकमंत्रीपद हे कॉंग्रेसच्या वाट्याला असल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा मंत्री हेच कोल्हापुरचे पालकमंत्री असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com