संभाजी भिडेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाराच अडकला पोलिसांच्या जाळ्यात

भिडे यांनी कोरोनापिडीत रुग्णांना बरे करण्याबाबत केलेल्या दाव्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे पत्र घेऊन पाटील बुधवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात गेले होते.
sambhaji bhide
sambhaji bhide

पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांना बरे करण्याचा दावा करणाऱ्या संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी गेलेल्या एका संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 

हेमंत बाबुराव पाटील (वय 50, रा.टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस हवालदार नवनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कलम 188 नुसार संचारबंदी आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पाटील हे भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष आहेत. भिडे यांनी कोरोनापिडीत रुग्णांना बरे करण्याबाबत केलेल्या दाव्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे पत्र घेऊन पाटील बुधवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात गेले होते. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत संबंधीत बाब अत्यावश्‍यक सेवेत लागू होत नसल्याने पाटील यांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे विशेष शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी याबाबत बंडगार्डन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सिलेंडरचा काळा बाजार करून जादा दराने विक्री 

शहरात संचारबंदी सुरू असताना सिलेंडरचा बेकायदेशीररीत्या साठा करुन ग्राहकांना जादा दराने सिलेंडरची विक्री करण्यात येत असल्याची दुसरी घटना शहरामध्ये घडली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने 33 हजार रुपयांचे सिलेंडर जप्त करून विनापरवाना विक्री करणाऱ्याविरुद्ध अत्यावश्‍यक वस्तु कायद्यान्वये चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

अमित सुगंधचंद गोयल (वय 30, रा.कोडियाड सोसायटी, सुंदराबाई शाळेजवळ, चंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या गॅस एजन्सी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथीलर सागर पार्क, लेन नंबर दोन येथे एका गॅस एजन्सी धारकाकडून अत्यावश्‍यक वस्तु कायद्याचा भंग करून 796 रुपये किंमतीचा घरगुती सिलेंडर ग्राहकांना एक हजार रुपयांना विक्री करीत असल्याची खबर पोलिस कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद यांना मिळाली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी बनावट ग्राहक पाठवून सिलेंडर खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोयल हा ग्राहकांना मुळ किंमतीऐवजी जादा दराने ग्राहकांना सिलेंडर विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना विचारण्यात आला. त्यावेळी त्याच्याकडे गॅस सिलेंडर विक्रीचा कोणत्याही कंपनीचा अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून विविध गॅस कंपन्यांचे भरलेले 16 गॅस सिलेंडर, रोकड, 48 ग्राहक कार्ड असा एकूण 33 हजार 733 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान खडकी परिसरात याच पद्धतीने बेकायदा गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या गॅस एजन्सी चालक, मालक व कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा याच प्रकारची घटना घडली. पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड, विवेक सिसाळ, कर्मचारी सुरेंद्र साबळे,संदिप मुंढे, दिपक चव्हाण,मोहन वाळके,आबा गावडे अन्न पुरवाठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केली.

नागरीकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी पोलिसांकडून आता सोसायट्यांना पत्र 

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी आता पोलिसांनी शहरातील सोसायट्यांना त्यांच्या सभासदांनी विनाकारण बाहेर न पडण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. तसेच सोसायटीबाहेर ये-जा करणाऱ्या सभासदांची नोंदणी ठेवण्यास बजावले आहे. 

शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही नागरीक वेगवेगळी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरीकांनी त्यांच्या घरांमधून बाहेर पडू नये, यासाठी पोलिसांनी सोसायट्यांच्या अध्यक्षांना सुचना दिल्या आहेत. त्याबाबतचे पत्र सोसायटीच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. सोसायटी सभासदांनी अनावश्‍यक कारणास्तव बाहेर जाऊ नये, अतिमहत्वाचे कारण असल्यास पोलिसांची परवानगी घ्यावी, सोसायटी अध्यक्षांनी भाजीपाला, किराणा, दूध विक्रेत्यांशी समन्वय ठेवून माल घरपोच मिळेल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, सोसायटीबाहेर ये-जा करणाऱ्या नागरीकांची वेळेनुसार नोंदणी करावी, नागरीकांनी खासगी वाहनांचा वापर करु नये, पायी फिरण्यासाठी, प्राण्यांना फिरविण्यासाठी बाहेर पडू नये, स्विमींग पुल, जीम, उद्याने, क्‍बल हाऊस, वाचनालये बंद ठेवावीत, सफाई कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटाझर, मास्क उपलब्ध करून द्यावा, सोसायटीत वास्तव्य करताना सोशल डिस्टन्सींग ठेवावे, या स्वरुपाच्या सुचना विविध पोलिस ठाण्यांनी त्यांच्या हद्दीत येणाऱ्या सोसायट्यांना दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com