विलासरावांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिल्लीतील `हा` नेता वारंवार वाचवत होता.. : राणेंचा दावा

विलासरावांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिल्लीतील `हा` नेता वारंवार वाचवत होता.. : राणेंचा दावा

पुणे : विलासराव देशमुख हे राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या पदावर अनेकांचा डोळा होता. अनेक अडचणींत असतानाही आणि त्यांच्याबद्दल तक्रारी असूनही त्यांचे मुख्यमंत्रीपद दिल्लीतील एक व्यक्ती वाचवत होती. विलासरावांना देशाच्या राजधानीत एक अदृश्य कवचं होतं. त्यामुळे मला शब्द देऊनही काॅंग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले नाही, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

राणे यांनी आपल्या झंझावात या आत्मचरित्रात काॅंग्रेसच्या नेत्यांनी कशी दिशाभूल केली, यावर सविस्तर लिहिले आहे. काॅग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी आजही नितांत आदर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काॅंग्रेसच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष प्रभा रावा आणि प्रभारी मार्गारेट अल्वा या दोन्ही महिला नेत्यांनी काॅंग्रेसमध्ये आपल्याला सन्मान दिल्याचे राणेंचे म्हणणे आहे. या दोघींसह बाळासाहेब विखे पाटील राणे यांच्या काॅंग्रेस प्रवेशासाठी आग्रही होते.

राणे यांचा काॅंग्रेसमध्ये 30 जुलै 2005 रोजी झाला. त्या आधी 21 जुलै रोजी पहाटे तीन वाजता त्यांची अहमद पटेलांशी भेट झाली. झाली. या भेटीतच त्यांना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं. ``आम्हाला तडकाफडकी मुख्यमंत्रिपद तुम्हाला देता यायचं नाही. पण, तुम्ही त्यासाठी किती वेळ थांबायला तयार आहात, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्या वेळी राणेंनीच त्यांना
लागणारा वेळ विचारला. त्यावर सहा महिने थांबावे लागेल, असे सांगण्यात आले. तोपर्यंत राणे यांनी केंद्रात मंत्रिपद स्वीकारावे अशी आॅफर देण्यात आली. राणेंनी त्यास नकार देत महाराष्ट्रातच राहणार असल्याचे सांगितले. राणेंना कोणते खाते घ्यायला आवडेल, अशी विचारणा झाल्यानंतर त्यांनी महसूल खात्याचे नाव घेतले.

या साऱ्या बाबींसह दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी सोनिया गांधींकडे भेट झाली. महाराष्ट्राशी संबंधित दिल्लीतील नेते या बैठकीला उपस्थित होते. काल रात्री झालेली चर्चा सोनिया गांधींच्या कानावर घालण्यात आली. सोनियांनी तात्काळ आदेश दिले.- `राणेजी को मंत्री बनाओ`

त्यानंतर अनेकदा विलासराव वादात अडकूनही त्यांच मंत्रिपद काढलं गेलं नाही, असं राणेंच म्हणणं आहे. `आपल्या राजेशाही थाटाच्या राहणीमुळे विलासराव आपल्याच समर्थकांच्या आणि मंत्र्यांच्याही रोषाचे धनी होऊ लागले होते, असं निरीक्षण राणे यांनी नोंदवलं आहे. मुंबईचा जलप्रलय, त्यानंतर झालेले साखळी बाॅबस्फोट, त्यानंतर झालेला दहशतवादी हल्ला यामुळे विलासरावांबद्दल असंतोष पसरत होता. मात्र काॅंग्रेस नेते मला दिलेल्या आश्वासनाबाबत काहीच विचार करत नव्हते, असे राणे यांनी म्हटले आहे.

दिल्लीत विलासरावांची पाठराखण करणारी कुणीतरी भक्कम व्यक्ती होती. विलासरावांनी सरकार इतक्या गलथान पद्धतीने चालवूनही त्यांच काहीच वाकडं होत का होत नव्हंत, त्याच रहस्य या व्यक्तीत होतं, असं सांगून राणेंनी या व्यक्तीचं नावही सांगितलं आहे. ती व्यक्ती म्हणजे पक्षाचे खजिनदार अहमद पटेल. ``अहमदभाई जरी माझं सगळं म्हणणं तपशीलवार ऐकून घेत असले तरी सोनियाजींकडे मात्र सगळे तपशील तसेच्या तसे पोहोचवत नसत. महाराष्ट्रातली परिस्थिती बिकट होऊन विलासराव शापाचे धनी होऊ लागले की अहमदभाई प्रामाणिकपणे सगळी परिस्थिती सोनियांच्या कानी घालत. सोनियाजी विलासरावांची उचलबांगडी करण्याच्या निर्णयाला येतोहेत असं दिसलं की अहमदभाईच विलासरावांना मोठ्या चतुराईनं संकटातून सहिसलामत बाहेर काढत असतं, असा राणेंचा दावा आहे.

राणे एवढ्यावरच थांबले नाहीत. अहमदभाई आणि विलासराव या दोघांची ही आपापसांतील व्यवस्था कशाच्या आधारावर करून घेतली होती, ते मला थोड्याशा तपासानंतर समजलं. दुर्देवाने तो तपशील पुस्तकात देण्यासारखा नाही, असेही राणेंनी लिहिले आहे.

मुंबईवर 26 जुलै 2008 रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर विलासराव पायउतार झाले. त्यावेळी माझी मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली होती. या घोषणेच्या आधी राणे हे सोनिया गांधींना रात्री एक वाजता भेटले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता त्यांच्या नावाची घोषणा करण्याचे ठरले. पण प्रत्यक्षात वेगळेच घडले. याचा साद्यंत वृत्तांत राणेंनी लिहिला आहे.

``माझ्या खोलीत टिव्हीवर घडामोडी पाहू लागलो. विलासराव सगळी ताकद एकवटून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावर बसवायच्या कामाला लागले होते. तरीही अहमद पटेलांनी घोषणेच्या काही मिनिटे आधी मला फोन करून शरद पवारांना सोनिया गांधींकडे शिफारस करण्याची विनंती करा, असा निरोप दिला. मी पवारांना फोनही केला. माझ्या मुख्यमंत्री पदासाठी तुमच्याकडून शब्द गेला तर मी तुमचा आभारी राहीन, असा फोन केला. हे ऐकून पलीकडे शरद पवार हे हसायलाच लागले. ते मला म्हणाले, ``राणे, तुम्हाला वेड्यात काढताहेत हे लोक. ते म्हणाले, ``मी तुमच्याशी बोलत असतानाच काॅंग्रेसचा एक माणूस मला एक लिफाफा देवून
गेलाय. त्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाणांच नाव स्पष्टपणे दिसतयं. निर्णय कधीचाच झालेला दिसतोय.... ``
   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com