मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर अपघाताला जबाबदार कोण? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हेलिकाॅप्टर अपघातातून बचावले. मात्र हा अपघातामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेची अशी हेळसांड कशी होऊ शकते? हेलिकाॅप्टरची वेळीच दुरूस्ती करण्यापासून कोणी रोखले होते? हेलिपॅड गर्दीच्या ठिकाणी कसे केले गेले? याची उत्तरे मिळायलाच हवीत.
मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टर अपघाताला जबाबदार कोण? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मोठ्या अपघातातून बचावले. साऱ्याच दुर्देवी योगायोगांचा आज संगम झाला होता. त्यांचे हेलिकॉप्टर हे निलंग्यातून उडताना क्रॅश झाले. मुख्यमंत्र्यासह इतर प्रवाशांना दुखापत झाली नाही. हे नशीबच मानायला हवे. मात्र दर वेळी नशिबावर भार देऊन कसे चालेल?

साऱ्याच सरकारी यंत्रणांचे पितळ यातून उघडे पडले. या अपघातानंतर सोशल मिडियातून उमटलेल्या काही प्रतिक्रिया तर मान खाली घालाव्या अशा होत्या. एखाद्या दुर्घटनेच्या विकृतीकरण करून आपले अस्तित्त्व सोशल मिडियात दाखवून देण्याची मूर्खपणाची लाटच आली आहे. त्याविषयी नंतर लिहिता येईल. पण काही प्रश्‍नांची उत्तरे या अपघाताच्या निमित्ताने मिळायला हवीत. तरच पुढची खबरदारी घेता येतील.

राज्याच्या मुख्य पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेबाबतची अशी हेळसांड ही कोणत्याही सुज्ञ व्यक्तिला मान्य होण्यासारखी नाही. अपघाताच्या प्राथमिक माहितीवर आधारीत हे प्रश्‍न आहेत. सखोल चौकशीत आणखी काही पैलू पुढे येऊ शकतात किंवा आताची प्राथमिक वाटणारी माहिती ही वस्तुस्थितीला धरून नव्हती, असेही नंतर स्पष्ट होऊ शकते. 

आणखी एक बाब स्पष्ट करायला हवी. अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला धीर आणि संयम महत्त्वाचा आहे. अपघातातून बचावल्यानंतर ते स्वतःहून स्पष्टीकरणासाठी पुढे आले आणि अफवांचा बाजार बंद पाडला. हा अपघात कसा घडला, याबाबत त्यांना वाहिन्यांवरून प्रश्‍न विचारला गेला. त्यांनी त्याबाबत अधिक माहिती न देता हे सारे पुढे चौकशीत स्पष्ट होईल, अशीच भूमिका त्यांनी घेतली. 

हेलिकॉप्टरची देखभाल नीट झाली नव्हती का? 

पुढे आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टपमध्ये पंधरा दिवसांपूर्वीही बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना गडचिरोलीचा दौरा मोटारीतून करावा लागला होता. नक्षलग्रस्त जिल्ह्यात मोटारीतून व्हीआयपी मंडळींना प्रवास करणे किती धोकादायक आहे, याचा अनुभव छत्तीसगडमध्ये आला होता. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दोनदा बिघाड होत असेल तर त्याच्या मेन्टेनन्सकडे दुर्लक्ष होते का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा प्रश्‍न उपस्थित केला. त्यात नक्कीच तथ्य आहे.

संबंधित पायलटनेही हेलिकॉप्टरची दुरूस्तीची गरज असल्याची वेळीच सांगितले होते. ते कोणी गंभीरपणे घेतले नाहीत का?  मग मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काय करत होती? त्यांनी याकडे लक्ष का दिले नाही? आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. त्यानंतर व्हीआयपींच्या हेलिकॉप्टर विषयीचे निकष `डीजीसीए`ने अधिक कडक केले आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाले का? 

हेलिकॉप्टर जुनी झाली आहेत का? 
महाराष्ट्र सरकारकडील दोन हेलिकॉप्टर जुनी झाली आहेत. त्यांची वारंवार देखभाल करावी लागते. नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी 100 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे, असेही पुढे आले आहे.

राज्य सरकारने त्याची खरेदी केली तर मिडीयातून टीका होईल आणि शेतकरी उपाशी असताना तुम्ही हेलिकॉप्टर कसे खरेदी करता, असा तर्कहीन सवाल काही मंडळी उपस्थित करू शकण्याचा धोका वाटला. त्यामुळे ही खरेदी लांबणीवर पडली, असेही सांगण्यात येते. 

आपल्याकडची मंडळी कशावरही प्रश्‍न उपस्थित करू शकतात. गेल्या वर्षी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे हे मराठवाड्यात दुष्काळी दौऱ्यावर असताना हेलिपॅडसाठी पाणी वापरले म्हणून बातम्या झाल्या. आता हेलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण करताना मोठा धुळीचा लोळ उठतो. तो कमी करायचा असेल तर पाणी शिंपडणे गरजेचे आहे. धुळीच्या लोटामुळे पायलटला पुढचे दृश्‍य दिसले नाही तर किती अनर्थ होईल. मात्र दोन टॅंकरचे पाणी वापरल्यावरून मिडियाने इतका गदारोळ केला की सोय नाही.

त्यामुळे गेल्या वर्षी बीडमधील एका दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी मोटारीने प्रवास केला. याचा परिणाम असा झाला की साऱ्या यंत्रणेवर ताण आला. तीन जिल्ह्यातील शेकडो पोलिसांना बारा ते चौदा तास रस्त्यावर उभे राहावे लागले. वाहतूक खोळंबली. त्याचा त्रास जनतेला भोगावा लागला. हेलिपॅडसाठी टॅंकरचे पाणी वापरले म्हणून "हेड लाइन' होत असेल तर हेलिकॉप्टरसाठी शंभर कोटी खर्च केले म्हणून काही जण नक्की ओरडतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्यच आहे, हे आजच्या अपघातातून दिसून आले.  गरज असेल तर अशी हेलिकॉप्टर खरेदी करावीत. 

हेलिपॅड लोकवस्तीत होते का? 

मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर निलंग्यात ज्या ठिकाणी उतरले तेथे आजुबाजूला लोकवस्ती दिसत आहे. ते एका शाळेचे मैदान आहे. हेलिपॅडची जागा ठरविण्याचे काही निकष नाहीत का? ते लोकवस्तीपासून दूर नको का? दुर्देवाने काही प्रकार घडता तर लोकवस्तीचेही नुकसान झाले असते.

याबाबतच्या निकषांचे पालन हेलिपॅडची जागा ठरविताना का झाले नाही? हेलिपॅड निश्‍चित करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, एसपी, बांधकाम विभागाची असते. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही जागा कशी निवडली?

या जागेपासून जवळच विद्युत वाहिन्या जात आहेत. मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर हे विजेच्या खांबाला धडकले. शेजारीच ट्रान्सफॉर्मर असलेला खांब आहे. या खांबातून एचटी आणि एलटी अशा दोन्ही लाइन गेलेल्या आहेत. मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरचे पाते हे एचटी लाइनला धडकले. त्यामुळे ही लाइन तातडीन ट्रीप होऊन वीजपुरवठा बंद पडला. मात्र हेच पाते एलटी लाइनला घासले असते तर सप्लाय बंद झाला नसता. उलट शॉर्ट सर्किट होऊन मोठा अनर्थ घडला असता, असे वीज अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या अपघाताची संभाव्य तीव्रता लक्षात घेता हेलिपॅडची जागा किती धोक्‍याची होती, हे लक्षात येते. 

आता या प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवर आपली सरकारी यंत्रणा काही उत्तरे शोधणार का? जेथे व्हीआयपींचे जीवन असुरक्षित आहे. तेथे आपल्यासारख्या सामान्य माणसाचे काय, असा प्रश्‍न जनतेला पडला आहे. त्याचे उत्तर मिळेल का? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com