लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणारा आमदार कोण?

...
who is the mla supporting accused in nashik
who is the mla supporting accused in nashik

नाशिक : दरी-मातोरी येथील फार्महाऊसमधील दोन डीजेचालक युवकांवरील अत्याचारप्रकरणी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शनिवारी (ता.18) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या गुन्ह्यातील संशयितांना पाठीशी घालणाऱ्या आमदारांना गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यासंबंधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सर्वपक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात येणार आहे. सरकारी विश्रामगृहात झालेल्या बैठकीसाठी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, राष्ट्रवादीचे संतोष सोनपसारे, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ऍड. तानाजी जायभावे, सुरेश मारू, माजी पोलीस अधिकारी डॉ. संजय अपरांती, कविता कर्डक, दीपक डोके, राजेंद्र बागूल, किरण मोहिते, प्रशांत खरात, निरंजन टकले, अरुण काळे, प्रा. दर्शन पाटील आदींसह अत्याचार झालेल्या दोन तरुणांचे कुटुंबिय उपस्थित होते.

बैठकीमध्ये घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. दरी-मातोरी येथील शिवगंगा या फार्महाऊसमध्ये गेल्या गुरुवारी (ता.9) रात्री मुख्य संशयित संदेश काजळे याच्या वाढदिवसानिमित्ताने "पार्टी' करण्यात आली. यावेळी डीजेचालक दोघांना अमानुष मारहाण करत त्यांच्यावर लैंगिंक अत्याचार करण्यात आला.

याप्रकरणी नाशिक तालुका पोलीसांत ठार मारण्याचा प्रयत्न, लैंगिंक अत्याचार आणि "ऍट्रॉसिटी'÷अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. मोर्चाला शनिवारी (ता. 18) सकाळी अकराला गोल्फ क्‍लब मैदानापासून सुरवात होईल. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येईल. मंगळवारी (ता. 14) सकाळी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून भेट घेऊन निवेदन देण्यात येईल, असेही बैठकीत ठरवण्यात आले.

आमदाराच्या घरातून संशयिताला अटक

गुन्ह्यातील संशयित निखील पवार यास शहरातील एका आमदाराच्या घरातून अटक करण्यात आली. तसेच या आमदाराने एका पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. त्यामुळे या गुन्ह्यात संबंधित आमदारासही सहआरोपी करण्यात यावे. त्याचप्रमाणे घटनास्थळी गोळीबार झालेला असतानाही त्याचा फिर्यादीमध्ये जाणीवपूर्वक टाळल्याप्रकरणी व गुन्हा दाखल होऊ नये म्हणून दबाव आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी, नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात येणाऱ्या निवेदनात सदरची मागणी केली जाईल, असे श्री. आहेर, सौ. कर्डक, डॉ. अपरांती, श्री. मोहिते यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com