Who controlsNagar corporation ? Gandhi, Jagtap Or Rathod ? | Sarkarnama

नगर महापालिकेचे कारभारी कोण ?  गांधी, जगताप की राठोड? 

मुरलीधर कराळे
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

नगर महापालिकेचा कारभारी कोण हे या निवडणुकीने ठरणार असल्याने  सत्ता खेचून आणण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत.

नगर :  शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. वरिष्ठ पातळीवरून युती होण्याचे चिन्ह दिसत नसून येत्या दोन दिवसांत तर तशी शक्यताही नाही. त्यामुळे नगर महापालिकेत शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी - काॅंग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार, हे निश्चित झाले आहे.

 शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप व भाजपचे खासदार दिलीप गांधी या तिघांच्याही दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असून, तिघेही आगामी काळात विधानसभा व लोकसभेचे उमेदवार आहेत. नगर महापालिकेचा कारभारी कोण हे या निवडणुकीने ठरणार असल्याने  सत्ता खेचून आणण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेना व भाजपमध्ये युतीची शक्यता असल्याने उमेदवार देण्यात दोन्ही पक्षाने काहीसा उशिर केला. आधी शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर केली. नंतर दुसऱ्याच दिवशी दुसरी यादी प्रसिद्ध करून आता युती होणार नाही, असेच संकेत दिले. त्यानंतर भाजपनेही आपले प्रभागनिहाय उमेदवार देवून स्वबळावर लढण्याचे निश्चित केले. दरम्यानच्या काळात दोन्ही पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांना पळवापळवी सुरू झाली. असे असले, तरी भाजप आणि शिवसेना या पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार देवून स्वबळाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वबळावर निवडणूक लढविताना अंतर्गत गटबाजीला तिलांजली देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपमधील पक्षांतर्गत असलेला गांधी गट व आगरकर गट यांची मोट बांधण्याचा प्रयत्न प्रा. शिंदे यांनी केला आहे. दोन्ही गटांची समजूत घालून एका ताकदिनीशी लढण्याचे नियोजन केले. महापालिकेत उमेदवारी देताना दोन्ही गटांचे मेळ घालत उमेदवारी दिली असल्याने हा वाद निवडणुकीपुरता का होईना शमविण्यात प्रा. शिंदे यशस्वी झाल्याचे समजते. त्यामुळे सध्या निवडणुकीचे सर्व सुत्रे खासदार दिलीप गांधी, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे आहेत.

दुसरीकडे शिवसेना मात्र माजी आमदार अनिल राठोड यांच्या एक छत्राखाली लढत आहे. राठोड घराण्यात आम्ही एकही मोठे पद घेणार नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणार, या राठोड यांच्या घोषणेमुळे कार्यकर्ते बांधले गेले. स्वतंत्रपणे लढत असल्याने प्रत्येक प्रभागांत उमेदवारी देताना बहुतेक कार्यकर्त्यांना संधी मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे.

काॅंग्रेस व राष्ट्रवादीने मात्र जागा वाटप करून रिंगणात उडी घेतली आहे. राष्ट्रवादीला ४०, तर काॅग्रेसने २२ जागा घेतल्या आहेत. या आघाडीत कम्युनिष्ठ पक्ष व युनायटेड रिपब्लिकन पक्षही सहभागी झाला आहे. दोन्ही पक्षांनी तीन-तीन अशा जागा घेवून आघाडीत सहभाग नोंदविला आहे. आघाडीचे सर्व सूत्रे काॅंग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना जिल्हाबंदी करण्याच्या नोटिसा दिल्या असून, त्यांचे म्हणणे एेकण्यासाठी सुनावणी सुरू आहे. उद्या (मंगळवारी) याबाबचा निकाल जाहीर करून बहुतेकांना जिल्हाबंदी केली जाणार आहे.तसेच अर्ज दाखल करण्याची मुदतही दोन दिवसांवर असल्याने येत्या तीन-चार दिवसांत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख