who are you sanjay raut ? blog | Sarkarnama

संजय राऊत, तूम्ही कोण ? 

प्रकाश पाटील 
गुरुवार, 16 जानेवारी 2020

ज्या कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर ठाकरे सरकार आहे. त्याच पक्षाच्या दिवंगत नेत्या इंदिरा गांधींविषयी वादग्रस्त विधान संजय राऊत करतात. दुसरीकडे उदयनराजेंकडे वंशज असल्याचा पुरावा मागता. प्रत्येकवेळी इतिहास उखरून वाद घालण्याची गरज होती का ? सत्ता आहे म्हणून आपण काहीही बोलले तर जनता खपवून घेते असा कोणी समज करून घेऊ नये.

गेल्या चार-पाच दिवसापासून महाराष्ट्रात वादग्रस्त विधानांचा धुरळा उडाला. त्याची सुरवात झाली राजधानी दिल्लीत. जय भगवान गोयल याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याने विशेषत: महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला.

राज्यातील एकही जिल्हा आणि गल्लीबोळ असे नव्हते की जिथे निषेधाचा सूर निघाला नाही. खरेतर वादाला फोडणी दिली ती भाजप नेत्याने. शिवाजी महाराजांशी तुलना कोणाशीच होऊच शकत नाही. 

शिवाजी महाराज मराठी माणसाचा श्‍वास आहे. रयतेच्या राजांविषयी म्हणूनच कोणी कितीही महारथी असो सांभाळून बोलले पाहिजे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे सहन केले जात नाही. नगरचा भाजपचा नगरसेवक श्रीपाद छिंदम यांने जे अकलेचे तारे तोडले होते त्याची किंमत त्याला मोजावी लागली.

ज्या गोयलने ही तुलना केली त्याला त्याचे पुस्तक माघारी घ्यावे लागले. या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्ली कार्यालयात होते. तेथे पक्षाचे नेते जातात काय ? हे सर्व संतापजनकच होते. आपले चुकले हे सांगण्याचे धाडस धाकविण्याऐवजी इतिहासाची पाने चाळण्यात धन्यता मानण्यात भाजप नेत्यांनी वेळ दवडला. 

महाराष्ट्रात आज जे काही सुरू आहे त्याला कारणही भाजप आणि त्याचे गोयल हे नेतेच कारणीभूत आहेत. या पुस्तकानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भूूमिका घ्यावी असे आव्हान दिले. त्यामुळे वादाला फोडणी मिळाली.

त्यानंतर दुसऱ्यादिवशी भाजपचे माजी खासदार उदयनराजे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला. गोयलांबरोबरच ते राऊत आणि शिवसेनेवर घसरले. शिवाजी महाराजांचा प्रत्येकवेळी उपयोग करताना आम्ही वारस म्हणून कधी विचारले का ? असा सवाल केला. 

उदयनराजेंच्या हल्लाबोलानंतर तर राऊत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांना वंशज असल्याचा पुरावा मागितला. शिवाय मुलाखत देताना इंदिरा गांधी या कुख्यात गुन्हेगार करिमलाला भेटायला यायच्या, दाऊद इब्राहिम तसेच अजित पवार यांना "स्टेपनी' म्हणत अनेक विषयाला स्पर्श केला. ही मुलाखत ऐकताना वाद निर्माण होणार हे स्पष्टच होत होते.

राऊत हे जे काही बोलत होते त्याचे त्यांना भान राहिले नाही. ते खासदार आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी थोडं दमाने घ्यायला हवे होते. राऊत यांना लोकशाहीत आपली मते मांडण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य निश्‍चितपणे आहे. पण, ते जे काही खरे-खोटे सांगतील त्याचे सर्वानी स्वागत करावे असे होत नाही. 

उदयनराजे हे शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज आहेत हे जगजाहीर आहे. असे असताना तुम्ही त्यांच्याकडे पुरावे मागणारे कोण ? तुम्हाला अधिकार कोणी दिला ? असे प्रश्‍न विचारले जाऊ लागले. उदयनराजेंप्रमाणे अजित पवार यांना स्टेपनीची उपमा दिली. याचे तरी कसे समर्थन करायचे. 

तुमचे नेते उद्धव ठाकरे कोणाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत याचे भानही तुम्हाला राहिले नाही. आपण आणि आपला पक्ष जेव्हा भाजपबरोबर होता. त्यावेळी तुमच्या लेखनीला नेहमीच धार चढायची. आज ज्या कॉंग्रेसवर आपण स्तुतीसुमने उधळत आहात. त्या कॉंग्रेसच्या म्हणजेच सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर शेलक्‍या आणि शिवराळ भाषेत टीका करणारे तुम्हीच होता.

मात्र आज आपण त्याच कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सरकारमध्ये आहात. तरीही बिनधास्तपणे इंदिरा गांधीवर बोलता. कॉंग्रेसने इशारा देताताच आपण दिलगिरी व्यक्त करून ते विधांन मागे घेतले. कारण सत्तेला धोका निर्माण झाला असता. राऊत यांनी एकाच वेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना नाराज केले आहे. 

कॉंग्रेसला राऊत आणि शिवसेना घाबरली असे म्हणावे लागेल. मात्र दुसरीकडे उदयनराजे यांच्याविषयी संताप आणणारे वादग्रस्त विधान करतात आणि ते विधान मागे घेत नाही हे ही योग्य नाही. वास्तविक ते पत्रकार, संपादक, लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे कोणतेही विधान करताना बिनधास्तपणे करून चालणार नाही तर दहा वेळेला विचार करायला हवे इतकेच. 

यानिमित्ताने काही मुद्दे उभे राहतात.... 
1 उद्धव ठाकरे यांचे सरकार अस्थिर करण्याचा संजय राऊत यांचा विचार नसेलही पण,त्यांच्या अशा विधानांनी सरकार आणखी मजबूत होणार नाही, हे नक्कीच ! 

2 उदयनराजे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका करण्याचा अधिकार जरूर आहे, मात्र, तोंडाला येईल ते बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. 

3. संजय राऊत यांच्या भावाला मंत्री केले नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत का ? 

4 दाऊदला दम दिल्याचे ते म्हणतात, जर तसे असेल तर कधी आणि कुठे ते भेटले. कोणत्या कारणाने दम दिला. स्वत: दम देण्यापेक्षा ते पोलिसांकडे का गेले नाहीत ? हा ही प्रश्‍न आहे. 

सत्ता आहे म्हणून आपण काहीही बोलले खपवून घेतले जाईल असा कोणी समज करून घेऊ नये. सत्तेचा कोणी अमरपट्टा घेऊन आले नाही हे विशेषत: सत्ताधाराऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. भाजपने कमी बोलण्याबाबत दिलेल्या सल्ल्याविषयी त्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा ! शेवटी तुम्हाला एक प्रश्‍न विचारावासा वाटतो, संजय राऊत, तूम्ही कोण ? 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख