which portfolio will get jayant patil | Sarkarnama

जयंत पाटील दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणार की दुसऱ्यांदा गृहमंत्री होणार?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

...

इस्लामपूर : वाळवा तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. सातव्यांदा आमदार झालेल्या आणि राज्याच्या राजकारणात सोळा वर्षे तीन खात्यांचे मंत्रिपद भूषवलेल्या आमदार जयंत पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली खरी. पण, त्यांना नेमके कोणते मंत्रीपद मिळणार याबाबत वाळवा तालुक्‍यात प्रचंड उत्सुकता आहे. श्री. पाटील यांना "हेवीवेट' खाते मिळणार यात शंका नसली तरी नेमके कोणते खाते? याविषयी चर्चा आहे.

राज्यात झालेल्या राजकिय उलथापालथीत शिवसेनेच्या सोबतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या इस्लामपुरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांनी 72 हजारांचे मताधिक्‍य घेत आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर राज्यात जे पक्षाला आणि कॉंग्रेस आघाडीला यश मिळाले त्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जात आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्यावतीने ज्या दोन मंत्र्यांनी शपथ घेतली, त्यात ते आघाडीवर होते.

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर राजकारणात प्रवेश केलेल्या जयंत पाटील यांना वाळवा तालुक्‍यातील जनतेने गेली 35 वर्षे इस्लामपूर मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. देश पातळीवर नेतृत्व करणाऱ्या शरद पवार यांनीही त्यांच्यावर विश्वास टाकत सुरवातीला अर्थ खाते, नंतर ग्रामविकास आणि काही काळासाठी गृह खात्याची जबाबदारी सोपवली. सलग नऊ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे.

त्यानंतर ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना त्यांनी देशपातळीवर सलग काही वर्षे महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून दिला. जी जबाबदारी मिळाली ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. किंबहुना खात्याला नवी ओळख निर्माण करून देण्याचे काम केले.
राज्याच्या सत्ताकरणात जी नवी समीकरणे उदयाला आली त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. पवार यांच्या पाठोपाठ जयंत पाटील यांना महत्त्वाचे स्थान असल्याचे दिसले. त्याच तुलनेत त्यांना नेतृवाची संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्ते बाळगून आहेत.

पुन्हा अर्थ किंवा गृह ?

जयंत पाटील यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. सध्या ती शक्‍यता धूसर बनलीय. परंतु त्यांना अर्थ किंवा गृहमंत्री म्हणूनही संधी मिळेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. किंबहुना त्यांना अर्थमंत्रीपदच मिळेल, असा अंदाज आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख