मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल? अजितदादा की सुप्रियाताई ?: रोहित पवारांचे हे उत्तर.. - which one like you like as CM, what rohit pawar give answer... | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल? अजितदादा की सुप्रियाताई ?: रोहित पवारांचे हे उत्तर..

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

कर्जत जामखेडच्या उमेदवारीमुळे मुलाखतीचा केंद्रबिंदू ठरलेल्या रोहित पवारांनी नगर संदर्भात विचारलेल्या सर्व प्रश्नांना खुमासदार शैलीत समर्पक उत्तरे दिली. तर काहींची उत्तरे खुबीने टाळताना कर्जत जामखेडच्या विकासाचा अजेंडा स्पष्ट केला.

संगमनेर ः राजकीय पार्श्वभूमी असलेल्या युवा नेत्यांना सामाजिक जीवन व राजकारणी म्हणून आलेले विधानसभेतील अनुभवाबाबत, आघाडीचा गायक अवधूत गुप्ते यांनी अत्यंत चतुराईने खुमासदार प्रश्न विचारून बोलते केले. अडचणीत टाकणारे प्रश्न आल्यानंतर युवा आमदारांनी चतुराईने त्याला दिलेली बगल व समर्पकपणे त्या प्रश्नाची दिलेली उत्तरे सर्वांची दाद मिळवून गेले. दिलखुलास शैलीतून आमदार रोहित पवार यांनी उपस्थितांची मने जिंकली.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्या वतीने मेधा महोत्सवात आज सकाळच्या सत्रात राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग व खाण राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार रोहीत पवार, धीरज देशमुख, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील या युवा राजकारण्यांची मुलाखत संवाद तरुणाईशी या उपक्रमात घेण्यात आली. विधानसभेत निवडून गेलेले, महाराष्ट्राचे भविष्य घडवण्याची क्षमता असलेले उच्चशिक्षीत आमदार हेच राज्याचे उद्याचे नेते असल्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रास्ताविकात सांगितले.

कर्जत जामखेडच्या उमेदवारीमुळे मुलाखतीचा केंद्रबिंदू ठरलेल्या रोहित पवारांनी नगर संदर्भात विचारलेल्या सर्व प्रश्नांना खुमासदार शैलीत समर्पक उत्तरे दिली. तर काहींची उत्तरे खुबीने टाळताना कर्जत जामखेडच्या विकासाचा अजेंडा स्पष्ट केला. ते म्हणाले, मी नगर जिल्ह्यातील आमदार असल्यामुळे माझे सर्वांवर सारखेच प्रेम आहे त्यामुळे संगमनेर की प्रवरानगरवर जास्त प्रेम आहे याचा प्रश्नच नाही. मी कर्जत जामखेडला विकासाचे असे मॉडेल बनवणार आहे की माझ्यावर घराणेशाहीचा आरोप कोणी करू शकणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तीस वर्षांपासून कर्जत जामखेडमध्ये विकास नव्हता तेथे विकासाची संधी होती याशिवाय तेथील जनता पाठीशी असल्याने माझा विजय झाला. माझ्या आईचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. तिने दिलेली सेवेची जबाबदारी मला पार पाडायची आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार रिटायर होतील असे अनेक जणांना वाटत होते, पण हार मानायची नाही शेवटचा माणूस केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे काम करायचे हा त्यांचा जीवनमार्ग आहे, त्यामुळे पवार साहेब आमचे आदर्श आहेत. मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल सुप्रिया सुळे की अजित पवार या प्रश्नाला उत्तर देताना, याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार ठरवतील ते मान्य असेल. सत्यजित तांबे की सुजय विखे कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत या प्रश्नावर सुजय विखे यांचे नाव न घेता त्यांनी, एकाने स्वभाव बदलण्याची गरज आहे तर दुसऱ्याने काम सुरु ठेवण्याची असे उत्तर दिले. यावर खुलासा करताना हा नगर जिल्हा आहे. हा सोपा नाही, मला काय म्हणायचे आहे ते लोकांना समजले अशी मल्लीनाथी त्यांनी केली. बारामतीने जन्म दिला असला तरी लढायला कर्जत जामखेडने शिकवल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे मन मोठे म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, भाजपचे मन इतके मोठे नव्हते असा चिमटाही त्यांनी काढला.

उद्योग व राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना महिलांची खाती मिळतात हा समज महाविकास आघाडीने खोटा ठरवल्याचे सांगत, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. निवडणूक सर्वत अवघड परीक्षा असते, घराणेशाहीमूळे राजकारणात यशस्वी होता येते असे नाही. प्रत्येक गोष्ट शिकावीच लागते. करुन दाखवले असे सांगण्याजोगे काम आगामी पाच वर्षात करावे लागेल असेही त्या म्हणाल्या.

मला आदित्य म्हणा, साहेब उपाधी लावू नका असे सांगत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आम्ही तरुण आमदार राज्यासाठी काही करू इच्छितो. पूर्वीचे मंत्री, नेत्यांची दडपणे झुगारुन युवा पिढी मनातले प्रश्न विचारते आहे. शपथविधी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याने आईचे नाव घेतले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वारसा लाभलेले आमदार धीरज देशमुख यांनी वडील कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नसल्याची खंत होती मात्र राजकारणात आल्यानंतर त्यांचे कुटुंब किती मोठे होते ते समजल्याने त्यांच्या विषयीचा अभिमान अधिक वाढल्याचे सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त आणी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट महाविकास आघाडीच्या सर्व युवा आमदारांनी पाहिले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर विलासराव देशमुख यांच्या स्नेहाच्या आठवणीही सांगितल्या. मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल आदित्य ठाकरे की रोहित पवार या प्रश्नावर हे महाराष्ट्राने ठरवायचे आहे. अडीच वर्षाचा फॉर्म्युला लागू केल्यास दोघेही मुख्यमंत्री होतील या त्यांच्या वक्तव्याला आदिती तटकरे यांनी दुजोरा दिला. नेमका कोणी धीर धरावा उदयनराजे की संजय राऊत या प्रश्नाला उत्तर देताना राजे श्रद्धास्थान असल्याने त्यांना मुजरा, मात्र बाकीच्यांनी धीर धरावा असे त्यांनी सांगितले. ऋतुराज पाटील व आमदार झिशान सिद्दीकी यांनीही विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.

संबंधित लेख