प्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? - परशुराम उपरकर यांचा सवाल

चिखलफेक आंदोलनामधील आमदार नीतेश राणे व स्वाभिमानचे कार्यकर्ते यांची छळवणूक करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर वेगवेगळे फंडे वापरत आहेत. गृहराज्यमंत्री पदाचा अवाजवी वापर करीत आहेत. हाच वेळ त्यांनी महामार्ग दुरुस्ती कामासाठी दिला असता, तर जनतेचा त्रास कमी झाला असता - परशुराम उपरकर
प्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? - परशुराम उपरकर यांचा सवाल

कणकवली :  प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार, असे आश्‍वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आहेत कुठे? असा प्रश्‍न मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे उपस्थित केला. खड्डेमय हायवेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्डयात घातले, अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्याकडे वेळच वेळ आहे, अशीही टीका त्यांनी केली. 

उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ''राज्य सरकार सर्वसामान्यांच्या बाजूने असायला हवे. पण हे सरकार ठेकेदार व अधिकाऱ्यांचीच तळी उचलून धरत आहे. कणकवली शहरातील हायवे खड्डयांप्रश्‍नी मनसेसह सर्वच पक्षांनी आंदोलने केली. राजकीय पक्ष बाजूला ठेवून संपूर्ण कणकवली तालुक्‍यातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली.  परंतु या समस्येकडे बांधकाममंत्र्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले तर मुजोर हायवे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मात्र तत्परता दाखवली जातेय.''

त्यापेक्षा खड्डेमुक्‍तीसाठी वेळ द्या
चिखलफेक आंदोलनामधील आमदार नीतेश राणे व स्वाभिमानचे कार्यकर्ते यांची छळवणूक करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर वेगवेगळे फंडे वापरत आहेत. गृहराज्यमंत्री पदाचा अवाजवी वापर करीत आहेत. हाच वेळ त्यांनी महामार्ग दुरुस्ती कामासाठी दिला असता, तर जनतेचा त्रास कमी झाला असता, असे उपरकर म्हणाले.

किती अधिकारी, ठेकेदार गेले ब्लॅकलिस्टमध्ये....
बैठकांना गैरहजर राहणारे अधिकारी तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार, असे गेली साडे चार वर्षे पालकमंत्री सांगत आहेत. त्यानंतर महामार्गासह प्रमुख जिल्हा मार्गाची दुरवस्था झाली. तर महसूलसह सर्वच खात्यात भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे आजपर्यंत पालकमंत्र्यांनी किती अधिकारी व ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले ते जाहीर करावे, असे उपरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com